Friday, May 2, 2014

काव्यमणी मोरोपंत - दैनिक लोकसत्ता (१० जानेवारी १९९३)



कविवर्य मोरोपंत पराडकरांचे निर्वाण झाल्याच्या घटनेला १९९३ साली दोनशे वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त प्राच्य विद्या संस्थेच्यावतीने ठाण्यामध्ये १० आँक्टोबर १९९९३ रोजी केकावली या काव्यावर सुप्रसिद्ध साहित्यिक आणि पत्रकार विद्याधर गोखले यांचे भाषण आयोजित करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर मी दैनिक लोकसत्तामध्ये १० जानेवारी १९९३ रोजी हा लेख लिहिला होता. त्या लेखाचा जेपीजी फोटो वर दिला आहे.


काव्यमणी मोरोपंत



-         समीर परांजपे
-         paranjapesamir@gmail.com

-          
संस्कृत ही मराठी भाषेची जननी आहे. संस्कप्रचूर मराठी भाषेला स्वत:चा असा एक पांडित्यपूर्ण डौल आहे. परंतु अशी मराठी भाषा सर्वसामान्यांच्या नित्यव्यवहारात वापरली जात नसल्याने संस्कृतप्रचुर मराठीतील साहित्यही आता कालौघात जमा होत चाललेले आहे. १७व्या शतकातील कविवर्य मोरोपंतांची काव्यसाधनाही आता विस्मरणात जात चालली आहे. पण त्याने मोरोपंतांच्या अलौकिक काव्यप्रतिभेच्या उंचीला किंचितही उणेपणा आलेला नाही.
कोल्हापूर येथील पन्हाळगड हा अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. सन १७३९मध्ये कोकणातून पन्हाळगडावर आलेल्या पुराणिक रामाजीपंत पराडकर यांच्या घरात मोरोपंतांचा जन्म झाला. पराडकर घराण्याला मराठा सरदार बाबुजी नाईक यांचा आश्रय लाभलेला होता. रामाजीपंतांचा वेद, उपनिषदे व संस्कृत साहित्याचा चांगला अभ्यास होता. प्रवचने करताना ते पौराणिक कथांचे दाखले अत्यंत कुशलतेने व रसाळपणे श्रोत्यांसमोर सादर करीत. जन्मजात काव्यस्फूर्ती लाभलेल्या लहानग्या मोरोपंताला पराडकरांच्या घरातील या सांस्कृतिक वारशाचा फायदाच झाला. घरात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या पोथ्या, तसेच संस्कृत नाट्यकृतींची बाडे यांच्या वाचनाने मोरोपंतांच्या उमलत्या काव्यप्रतिभेला प्रगल्भतेची धार आली. पेशवाईच्या काळात वेदपाठशाळांचे मोठे प्रस्थ होते. वेदशास्त्रसंपन्न शास्त्री या पाठशाळांतून तत्कालीन विद्यार्थ्यांना संस्कृत भाषेचे उत्तमोत्तम पाठ देत असत. मोरोपंतांचे शिक्षण केशव पाध्ये व बाबा पाध्ये या संस्कृत पंडितांच्या देखरेखीखाली झाले. मोरोपंत अस्सल वाचनवीर होते. १७४२ ते १७५१ या कालावधीत म्हणजे वयाची पंचवीशी ओलांडण्यापूर्वीच कविवर्य मोरोपंतांनी ब्राह्मोत्तरखंड, कुश-लवचरित्र, हरिश्चंद्राख्यान यासारखे अनुवादपर ग्रंथ लिहिले होते. मोरोपंतांच्या भाषाशैलीचा चिकित्सक अभ्यास केला असता असे दिसेल की, संस्कृत भाषेच्या अध्ययनामुळे मोरोपंतांच्या लेखनातून उतरलेली मराठी भाषा समासप्रधान होती. पौराणिक ग्रंथांचे वाचन व मनन अधिक झाल्याने मोरोपंतांनी या ग्रंथांमधील कथानकांवर आधारितच काव्य लिहिण्यास प्राधान्य दिले हे खरे असले तरी हे सर्व काव्य सर्वसामान्यांसाठीच आहे ही दृष्टी कविवर्य मोरोपंतांनी बाळगली होती. त्यांनी लंबीचवडी व कंटाळवाणी रचना करण्याचे नेहमीच टाळले. त्यांचे अक्षरही वळणदार होते. लेखनसमाधी लागल्यानंतर मोरोपंतांना कशाचेही भान उरत नसे. एकदा बैठक जमली की, शरीराला सुटणार्या कंडेने अथवा काही कारणांनी लेखनात व्यत्यय येत असे. त्यामुळे मोरोपंतांनी तांब्याचा एक पंजा तयार करुन घेतला होता. हा धातूचा पंजाते डाव्या हातात धरुन ते शरीराला कंड सुटलेल्या भागावर फिरवित असत. याचा उद्देश हाच की लेखनात व्यत्यय निर्माण होऊ नये. तांब्याचा पंजा आज मुंबई विद्यापीठाने आपल्या संग्रही ठेवलेला आहे.
मोरोपंतांनी वयाच्या ४२व्या वर्षी (सन १७७१)मध्ये `आर्यभारत हा ग्रंथ लिहिण्यास सुरुवात केली. व  तब्बल दहा वर्षांच्या कालावधीनंतर हा ग्रंथराज पूर्ण केला. मोरोपंतांच्या संपूर्ण साहित्यकृकृतींमध्ये `आर्यभारतला नेहमीच अग्रमान दिला जातो. त्यानंतर भागवती प्रकरणे व मंत्रभागवत हे ग्रंथ मोरोपंतांनी लिहिले. १७८६ साली हरिवंश, गंगावकीलसारखी स्फुट काव्ये, मंत्रनारायण इ. ग्रंथरचनाही त्यांनी केल्या. मोरोपंतांच्या एका ग्रंथाचे नाव आजही सर्वांच्या तोंडी आहे तो ग्रंथ म्हणजे, `केकावली. केकावलीची भाषा अत्यंत रसाळ व भक्तिरसाने परिपूर्ण अशीच आहे.
स्व. डाँ. नांदापूरकरांनी मोरोपंतांच्या भाषाशैलीबाबत व विशेषत: त्यांच्या `आर्यभारत या ग्रंथाविषयी आपल्या `मुक्तमयुराची भारते या ग्रंथामध्ये उत्तम विश्लेषण केलेले आहे. पंतांच्या आर्यभारतची मुक्तेश्वरांच्या भारताशी ढोबळ तुलना जरी केली तरी मोरोपंतांच्या शैलीतील सुबकता व आटोपशीरपणा लक्षात येतो, असे डाँ. नांदापूरकरांचे प्रतिपादन आहे.
मोरोपंतांचे आठव्या पिढीतील वंशज व प्रख्यात संस्कृत भाषाकोविद डाँ. मो.दि, पराडकर यांनीही मोरोपंतांच्या काव्याचे रसग्रहण केलेले आहे. ते म्हणतात की, भागवत वाचनाचा मोरोपंतांच्या मनावर दृढ परिणाम झाला होता. त्यांचे हृदय भक्तिरसपूर्ण बनून गेले होते.
हरिपाद्युग्मस्मरणप्रवणे भगवज्जनदिव्यकथा श्रवणे,
चतुरे रसिके समये क्रमणे सुख अन्य नसेचि भव भ्रमणे,
ही मोरोपंतांची मनोमन धारणा होती. हरिध्यानासक्त झालेल्या मोरोपंतांना भगवंताचे गुणगान न केले तर इतरथा आयुष्य जाते वृथा असे प्रामाणिकपणे वाटत होते. त्यामुळे मोरोपंतांचे मन प्राचीन कथा व विचारांमध्येच रमले व त्यांचाच त्यांनी उच्चार केला.
मोरोपंतांच्या सर्व साहित्याचा विचार करता स्वत:च्या मृत्यूच्या काही वर्षे आधी लिहिलेले केकावली हे काव्य पंतांनी स्वत:च्या नेहमीच्या भाषाशैलीची बंधने ओलांडून लिहिल्यासारखे वाटते. मोरोपंतांच्या सर्व काव्यात आढळणारा समासांचा उपयोग केकावली लिहिताना कमी प्रमाणात केलेला आढळतो. केकावलीच्या भाषाशैलीवर कोणालाही संस्कृतप्रचुरतेचा आरोप करता येणार नाही. याच कारणास्तव आजही शालेय अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकात केकावलीचा समावेश अवश्य करण्यात येतो. मोरोपंत केवळ पौराणिक कथांतच रमले. तत्कालीन ऐतिहासिक घटनांवर मोरोपंतांनी कोणतीही टिका किंवा भाष्य केल्याचे आढळून येत नाही असे काही अभ्यासकांचे म्हणणे आहे. याचा प्रतिवाद करताना डाँ. मो. दि. पराडकर म्हणतात की, मोरोपंतांच्या काळातील मराठी वीरांचे ताजे व त्यांच्या दृष्टीने नुकतेच घडून गेलेले पराक्रम त्यांना आमच्याप्रमाणे अद्भूतरम्य वाटले नाहीत यात नवल नाही. पंतांच्या काळात शिवाजीच्या चरित्रावर कोणी महाकाव्य लिहिले नाही म्हणून त्या काळातील सर्व कवींना दोष देणे योग्य होईल का? पंतांना काव्य लिहिण्याची प्रेरणा देणार्या सदाशिव, पांडुरंग पाध्येंसारख्या मंडळींनीसुद्धा त्यांना मराठ्यांच्या इतिहासावर काव्य लिहिण्यास सांगितले नाही हे लक्षात घ्यावयास हवे. तात्पर्य त्या काळी घडत असलेला मराठ्यांचा इतिहास समाजाच्या मनात अद्भूत कथांच्या रुपाने बिंबला नव्हता. अशा स्थितीत मोरोपंतांसारख्या कवीने भगवद् गुणगानाचा संकल्प केला हे योग्यच म्हणावे लागेल (महाराष्ट्र दर्शन, २६ जानेवारी १९६७, पृष्ठ क्रमांक ४१-४२)
मोरोपंतांचे मराठी जनांवर अनंत उपकार आहेत. संस्कृतबद्ध ग्रंथ मोरोपंतांनी मराठीत अनुवादित करुन मराठी भाषेची साहित्यलेणी आणखीनच सुशोभित केली. मोरोपंतांच्या असामान्य काव्यप्रतिभेला कुर्निसात.


No comments:

Post a Comment