Saturday, May 3, 2014

वेट लाँस प्रोग्रँम थ्रू पाँवर एक्सरसाईज अँड पाँवर योगा - वैशाली मतकरी हिच्या करिअरबद्दल लिहिलेला दै. लोकसत्ताच्या विवा पुरवणी - ११ जून २०१० रोजीचा लेख.


लेखाचा मूळ भाग



लेखाचा उर्वरित भाग




दै. लोकसत्ताच्या विवा पुरवणीमध्ये मी ४ जून २०१० ते आँक्टोबर २०१० या कालावधीत यंग अचिव्हर नावाचे सदर चालवित असे. सर्वसामान्यांपेक्षा करिअरमध्ये वेगळी व चमकदार कामगिरी करणार्या युवतींचा या सदरात परिचय करुन देण्यात आला होता. दै. लोकसत्ताच्या ११ जून २०१०च्या विवा पुरवणीतील यंग अचिव्हर काँलममध्ये प्रसिद्ध झालेला हा दुसरा लेख. त्याची जेपीजी फाईल वर दिली आहे. वैशाली मतकरी या कुशल व्यायाम प्रशिक्षिकेची ही कहाणी आहे.


वेट लाँस प्रोग्रँम थ्रू पाँवर एक्सरसाईज अँड पाँवर योगा


-         समीर परांजपे
-         paranjapesamir@gmail.com


सकाळी ८.५३ची लोकल पकडायची आहे... आँफिस गाठायचे असते सकाळी साडेनऊ वाजता. त्यात हा ठाणे ते सीएसटी प्रवास...लेडिज डब्यातली ती कचकच. सकाळी लवकर उठून दोन्ही वेळचा स्वयंपाक करा...मुलांचे डबे तयार ठेवा...त्यांना शाळेसाठी तयार करा...एक ना दोन हजार कामे...पुन्हा संध्याकाळी तोबा गर्दीच्या लोकलमध्ये स्वत:ला कोंबा...धक्के खात घरी या...स्वत:कडे लक्ष द्यायला वेळ आहे कुठे? हे प्रातिनिधीक मनोगत आहे प्रत्येक नोकरदार स्त्रीचे...एक वेळ शहरे, गावे बदलतील...वाहतुकीची साधने बदलतील पण साता जन्माला पुरुन उरलेली ही घाईगर्दी काही टळणार नाही...ज्या महिला नोकरी, व्यवसाय करीत नाहीत...गृहिणीचे कर्तव्य इमानेइतबारे पार पाडतात त्यांचाही दिनक्रम असाच घरच्या कामांनी गजबजलेला असतो. नोकरदार असो वा नसो महिलांना स्वत:कडे पाहाण्यास, आरोग्याची काळजी घेण्यास पुरेसा वेळ असा मिळतच नाही...सदोदित दुसर्यांसाठी रहाटगाडग्याला जुंपून घ्यायचे हीच तर त्यांची जीवनशैली. कोणीही कितीही माँडर्न असो किंवा धनिक का असेना, महिलांची जीवनशैली थोड्याफार फरकाने सारखीच असते.
आरोग्य उत्तम राखण्यासाठी रोज व्यायाम केला पाहिजे असे एखाद्या महिलेला सांगितले तर ती पहिला प्रश्न विचारणार की घरचे व नोकरीचे सांभाळू की स्वत:चे लाड पुरवत बसू?  याला उत्तर असे की, मुळात असा नकारात्मक विचार करणे चुकीचे आहे. आजच्या ओढगस्तीच्या जीवनाता शरीर सुदृढ राहाण्यासाठी कोणत्याही प्रकारचा व्यायाम हा करायलाच हवा. त्याने आपल्या शरीरातील उर्जा टिकून राहाते. मग हे करण्यासाठी जिम्नॅशिअममध्ये जायचे का? की घरच्या घरी योगासने करायची? या प्रश्नाचे उत्तर ज्याला जसे जमेल तसा त्याने व्यायाम करावा हे आहे. आता इथे गरज पडते जिम ट्रेनरची. त्यातही आता स्पेशलायझेशन आहे. महिला व पुरुषांसाठी वेगवेगळे जिम ट्रेनर असतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली केला जाणारा व्यायाम शास्त्रशुद्ध असतो. जिम ट्रेनर हा करिअरसाठी एक उत्तम पर्याय आहे. वैशाली मतकरीची या क्षेत्रातील कामगिरी बघितली की हे तुम्हालाही पटेल.
वैशाली मतकरी ही पूर्वाश्रमीची वैशाली धोकटे, तिची आई रोहिणी धोकटे यांचे करिअरही वेगळ्या वाटेवरचे आहे. १९७०च्या दशकातील गोष्ट आहे. माहिमच्या सिटीलाईट जवळील प्रसिद्ध तळवलकर जिममध्ये रोहिणीताई नोकरी करीत. त्यावेळी घरोघरी जाऊन आपल्या व्यायामशाळेची माहितीपत्रके वाटणे, लोकांना व्यायामाचे महत्व पटवून देणे अशी महत्त्वाची कामे त्या करीत. जिम्नॅशिअममध्ये येणार्या महिलांना वेळप्रसंगी मार्गदर्शन करावे लागे. रोहिणीताईंची कामातील तन्मयता बघून तळवलकर जिमच्या मधुकर तळवलकरांनी त्यांना तुम्ही महिलांना व्यायामाचे प्रशिक्षण द्याल का असे विचारले. रोहिणी धोकटे यांनी त्यास होकार दिल्याने त्यांना तळवलकरांनी जिम ट्रेनरचे रितसर प्रशिक्षण दिले. त्यावेळेपासून तळवलकर जिममध्ये येणार्या महिलांना व्यायामाचे प्रशिक्षण देण्याची जबाबदारी रोहिणीताईंनी उचलली. एकदम वेगळ्या क्षेत्रात त्यांनी आपले करिअर केले. वैशाली लहानपणापासून आई कार्यरत असलेल्या वेगळ्या क्षेत्राकडे कुतुहलाने पाहात होती. वैशाली रुईया काँलेजची विद्यार्थीनी. वैशाली एसवायबीएमध्ये शिकत होती. त्या वर्षी तिची आई काही कामानिमित्त लंडनला गेली होती. त्यामुळे तळवलकर जिममध्ये तीन महिने फिमेल जिम ट्रेनरची जागा रिकामी होती. तशी वैशाली नेहमीच संध्याकाळी आईबरोबर जिममध्ये जात असे. तिथे कसे काम केले जाते याची तिला बर्यापैकी माहिती झाली होती. तीन महिने आपण हे ट्रेनरचे काम करुया असे तिच्या मनाने घेतले. मधुकर तळवलकर, प्रशांत तळवलकर यांच्याकडून योग्य ते प्रशिक्षण घेतल्यानंतर तळवलकर जिममध्ये येणार्या महिलांना वैशाली व्यायामाचे धडे देऊ लागली. तसे हे काम तिने काही महिन्यांसाठीच स्वीकारले होते. पण म्हणतात ना लहानपणापासून पाहिलेल्या एखाद्या गोष्टीचा कळत-नकळत मनावर प्रभाव पडत असतो. वैशालीला जिम इन्स्ट्रक्टरचे काम मनापासून आवडले होते. तिने विचारांती याच क्षेत्रामध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला.
वैशालीला पहिल्यापासून विविध खेळांची आवड होती. रुईया काँलेजमध्ये शिकत असताना ती बॅडमिंटन टीममध्ये होती. काँलेजच्या महिला क्रिकेट टीमची कॅप्टन होती. हिंदु काँलनीतील दादर भगिनी समाजामध्येही ती बँडमिंटन खेळायची. तिच्यात अजून एक विशेष गुण होता तो म्हणजे अभिनयाचाय मोरुची मावशी, भ्रमाचा भोपळा, पाऊलखुणा या व्यावसायिक नाटकांमध्ये तिने कामेही केली होती. १९८७-८८चा सुमार असेल. एका बाजूला काँलेज शिक्षण सुरु होते तर दुसर्या बाजूला वैशालीचे जिम इन्स्ट्रक्टर म्हणून करिअर आकाराला येत होते. तिची कामाप्रती असलेली निष्ठा व तन्मयता पाहून तळवलकरांनी एक मोठी जबाबदारी तिच्या खांद्यावर टाकली. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा जुहू येथे बंगला आहे. त्याच्याच जवळपास तळवलकर जिमची शाखा होती. १९८८-८९ साली वैशाली तिथे हेड जिम इन्स्ट्रक्टर म्हणून रुजू झाली. जुहू हा सेलिब्रिटींचा एरिया असल्याने तिला अनेक नामवंत लोकांना व्यायामाचे प्रशिक्षण देता आले. त्यामध्ये अनिल कपूरची पत्नी सुनिता, तब्बू, भाग्यश्री पटवर्धनची आई, सदाशिव अमरापूरकर यांच्या पत्नी अशा अनेकांचा समावेश होता. १९९३ साली वैशालीचा राजेश मतकरींशी विवाह झाला. राजेश हा स्वत: उत्तम हाँकीपटू आहे. प्रख्यात नाटककार रत्नाकर मतकरी यांचा राजेश हा पुतण्या. त्यामुळे साहजिकच वैशाली रत्नाकर मतकरींची चुलत सून झाली. वैशाली आधीच नाटकात कामे करीत होतीच, त्यानंतरही नाटकाशी असलेली तिची नाळ अशी कायम राहिली. विवाहानंतर तिने तळवलकर जिमच्या मुलुंड शाखेत काम करायला सुरुवात केली. नवर्याच्या नोकरीतील बदलीमुळे बेळगाव दोन वर्षे तिचे वास्तव्य झाले. बेळगावमध्ये राहात असलेल्या जागेत एक गॅरेजही होते. त्या गॅरेजमध्ये योग्य बदल करुन वैशालीने तिथे एक छोटेसे जिम सुरु केले. या जिमचे उद्घाटन रत्नाकर मतकरी यांच्या हस्तेच झाले होते. १९९४ ते १९९६ अशी दोन वर्षे हे जिम चालले. सुमारे ४० मेम्बर होते त्यात. १९९६ साली वैशाली ठाण्यास राहावयास आली. त्यात तिने घरात व्यायामाचे क्लासेस सुरु केले. वेट लाँस प्रोग्रँम थ्रू पाँवर योगा असे या क्लासेसचे स्वरुप होते. या क्लासेसना चांगला प्रतिसाद मिळू लागला. त्यानंतर वैशाली मतकरीने ठाण्यात अनेक ठिकाणी जागा रेन्टने घेऊन क्लासेस चालविले. तिथे प्रत्येक ठिकाणी तिला उत्तम प्रतिसाद मिळाला. मुख्य म्हणजे तिच्या शिकविण्याच्या पद्धतीमुळे ती नावाजली गेली. आता ती पर्सनल जिम इन्स्ट्रक्टर म्हणून काम करते. संबंधित व्यक्तीच्या घरी जाऊन तिला पाँवर योगाद्वारे व्यायामाचे प्रशिक्षण देते. ज्येष्ठ नागरिकांसाठीही तिने व्यायामाचे महत्त्व पटवून देणारा कार्यक्रम तयार केला आहे. सामाजिक कार्याचीही तिला आवड आहे.
एकदा माणूस एखादी गोष्ट शिकला की, त्या क्षेत्रात अत्याधुनिक गोष्टी काय आल्या आहेत, नवीन संशोधन काय झाले आहे याची माहिती घेण्याची उत्सुकता न दाखविता आहे त्याच स्वरुपात गोष्टी रेटून नेण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो. या प्रकारच्या लोकांपेक्षा वैशाली मतकरी वेगळी आहे. जिम व योग या क्षेत्रामध्ये जे जे नवीन प्रवाह आले आहेत त्याचा तिने पद्धतशीर अभ्यास केला आहे.

वैशाली म्हणते `जिम इन्स्ट्रक्टर या व्यवसायाचा फायदा असा की, इतरांना फिट ठेवताना स्वत:लाही आपण फिट ठेवू शकतो. सध्याचे जीवन अत्यंत तणावाचे झाले आहे. तणावामुळे अनेक विकार होऊ शकतात. स्थुलपणा ही पण अनेकांसाठी मोठी समस्या बनते. उपवर मुली, विवाहित महिला यांना वजन कमी करायचे असते. त्यासाठी मग कोणी जिममध्ये जातो, कोणी योगासने करतो. कोणताही व्यायाम करा पण तो नियमित व दररोज करणे आवश्यक आहे. योगशास्त्र व्यायामाच्या दृष्टीने अधिक उत्तम आहे. वैशालीने मुंबई विद्यापीठातून योगशास्त्रात पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. लीना मोगरे यांचा योगाबद्दलचा एक कोर्सही तिने केला आहे. व्यायाम व आता विशेष पाँवर योगाबाबत नवनवीन माहिती मिळविण्यावर तिचा सतत भर असतो. उत्तम शिक्षण घेतलेले असून रुटिन करिअर न करता जिम इन्स्ट्रक्टर म्हणून स्वत:ला घडविणे ही प्रक्रिया तशी सोपी नाही. वैशाली म्हणते की, जिम इन्स्ट्रक्टर क्षेत्रात महिलांना खूप मोठी संधी आहे. इथे अधिक मेहनत घेतली तर उत्तम करिअर घडविता येते. वैशालीनेही तेच केले आहे...







No comments:

Post a Comment