Friday, May 2, 2014

`स्मृतिचित्रांच्या’ पलीकडचे टिळक - आपलं महानगर ( २४ फेब्रुवारी २००१)

लेखाचा मूळ भाग




लेखाचा उर्वरित भाग






ना. वा. टिळकांच्या काव्यप्रतिभेची `स्मृतिचित्रेमध्ये ओळख असली तरी त्यात अभ्यासपूर्णता नाही. रेव्हरंड टिळकांच्या मराठी कवितांनी साहित्याला नवे परिमाण दिले. त्याचा अभ्यास करुन अनेकांनी ग्रंथ लिहिले. ना. वा. टिळकांची अनेकांशी पत्रव्यवहार होता. त्यांनी स्फुटलेखन केलेले होते. त्याच्या सर्वांगीण अभ्यासातून नारायण वामन टिळकांचे चित्रण त्यांचे नातू अशोक टिळक यांनी `चालता-बोलता चमत्कार या कादंबरीत केलेले आहे. रेव्हरंड टिळकांचे चरित्र लिहिण्यापेक्षा त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांचा वेध `कादंबरीच्या रुपाने घेणे हे जास्त आव्हानात्मक होते. ते आव्हान अशोक टिळकांनी समर्थपणे पेलले आहे.   या कादंबरीचे परीक्षण मी आपलं महानगर या सायंदैनिकाच्या २४ फेब्रुवारी २००१च्या अंकात सलील श्रोती या टोपण नावाने केलेल्या लेखनात केले होते. या लेखाची जेपीजी फाईल वर दिली आहे.


`स्मृतिचित्रांच्या पलीकडचे टिळक


-         समीर परांजपे
-         paranjapesamir@gmail.com


धन्य खरा मी बाट्या झालो
अभिमानाच्या हातून सुटलो
झालो मी अवघ्यांचा झालो
देवाच्या नियमा अनुसरलो
ज्यांच्या हृदयी ईश्वर दाटे
ते अवघे बाट्ये बाट्ये
-         रेव्हरंड ना. वा. टिळक
-         १९ व्या शतकामध्ये प्रबोधनाच्या गोंडस आवरणाखाली हिंदू व ख्रिश्चन नेत्यांमध्ये परस्परांच्या धर्मांची लक्तरे काढण्याची जी घाणेरडी मोहिम उघडण्यात आली होती, त्या गदारोळात ज्या सत्शीलांचा जीव मेटाकुटीला आलेला होता, त्यापैकी एक असलेल्या रेव्हरंड ना. वा. टिळकांची तगमग वरील पदातून व्यक्त होते. हजारो वर्षे अस्पृश्यांना सडत ठेवणार्या हिंदू धर्माचे शुद्धीकरण व्हावे म्हणून प्रार्थना समाज, परमहंस सभा, आर्य समाज, ब्राह्मो समाज या संस्था झटत होत्या. सनातनी हिंदू धर्माची मक्तेदारी मिरवत  विष्णुबुवा ब्रह्मचारी, कृष्णशास्त्री, विष्णुशास्त्री चिपळूणकरांसारखे धर्मलंड ख्रिश्चन मिशनर्यांवर आगपाखड करत होते. तर ब्रिटिश साम्राज्यवादाचा आधार घेत, नीती-अनीती यांचा वापर करुन ख्रिश्चन मिशनरी या देशातील सवर्ण, अस्पृश्यांचे धर्मांतर घडवून आणत होते. या दंभस्फोटामध्ये शुद्ध वैचारिक भूमिकेतून ख्रिश्चन धर्म स्वीकारलेले रेव्हरंड नारायण वामन टिळक, पं. रमाबाई या व्यक्ती तत्कालीन सुधारणावाद्यांमध्ये आदर्श होते. चित्पावन ब्राह्मण असलेल्या लोकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याबद्दल सनातन मंडळींनी त्यांचा प्रचंड छळ मांडला होता. पण कालौघात सनातन्याचे दंभ जळाले. पण ना. वा. टिळक, पं. रमाबाईंचे विशुद्ध चारित्र्य आणि साहित्य मात्र टिकून राहिले आहे.
-         रेव्हरंड नारायण वामन टिळक हे मराठी साहित्यामध्ये ललामभूत ठरलेले व्यक्तिमत्व आहे. लक्ष्मीबाई टिळकांनी `स्मृतिचित्रे या आत्मचरित्रात स्वत:च्या दृष्टिकोनातून आपले पती ना. वा. टिळकांचे सारे जीवन मर्मज्ञतेने उभे केले आहे. `स्मृतिचित्रेने स्त्रीवादी आत्मचरित्रांना मोठी ताकद मिळवून दिली आहे. असे असले तरी ना. वा. टिळक संपूर्ण दर्शन आपल्याला घडले होते का? या विचाराने त्यांचे पुत्र देवदत्त व नातू अशोक देवदत्त टिळक या दोघांनाही अस्वस्थ केलेले होते. देवदत्त टिळकांनी आपल्या पित्याचे चरित्र लिहिण्याचे केलेले प्रयत्न थिटे पडले. पण देवदत्त टिळकांनी जपून ठेवलेल्या अनेक आठवणी, टिळकांची सुमारे २०० पत्रे, ना. वा. टिळकांच्या दोन-तीन अपुर्या रोजनिश्या, तत्कालीन वृत्तपत्रांचे काही अंक, मासिके, ज्ञानोदय, रंगभूमी, बालबोधमेवा यातील साहित्य आणि स्वत: ना. वा. टिळकांशी संबंधित व्यक्तींच्या घेतलेल्या शेकडो मुलाखती यांतून रेव्हरंडांचे नातू अशोक टिळक यांनी खर्डा तयार केला. त्यातूनच ना. वा. टिळकांचे चरित्र सांगणारी `चालता-बोलता चमत्कार ही कादंबरी निर्माण झाली.
`चालता-बोलता चमत्कार या कादंबरीची सुरुवात दापोलीपासून होते. नारायण टिळकांचे वडील वामनराव घरचे देशपांडे होते. वामनराव उग्र प्रकृतीचे तर पत्नी जानकी सुशांत. सरकारी नोकरीत रुळलेले वामनराव दूर मुक्कामी गेल्यानंतर आईच्या पदराखाली वावरणार्या नारायणाचा आणि कुटुंबाचा दिवस सुखासमाधानात जाऊ लागला. वामनरावांचा निसं:गपणा, विक्षिप्तपणा याने मेटाकुटीस आलेल्या जानकीने अखेर इहलोकाचा निरोप घेतला. नारायण पोरका झाला. चारी वाटा मोकळ्या झाल्या. एका घालमेलीच्या क्षणी कुटुंबीयांना मागे ठेवून एकलेपणानेच नारायणाने घर सोडले. भ्रमंती करता करता नारायण नाशिकात येऊन ठेपला. काही काळ शास्त्रीबुवांकडे संस्कृत अध्ययन करण्यात वेळ घालविला. पण काही दिवसांनी पुन्हा मामाने नारायणाला स्वत:च्या घरी नेले.
विद्याभ्यासाचा तुटलेला संबंध पुन्हा जुळून आला. आपल्या जन्मजात कवित्वाने आणि ओजस्वी संभाषणाने नारायण वामन टिळक चारचौघांत उठून दिसू लागला. याच काळात नारायणरावांची लक्ष्मीबाईंशी जन्मजन्मांतरीची गाठ पडली. नाराय़णरावांच्या आयुष्यात भ्रमंती ही सुरुच होती. पोटाच्या खळगीचा क्रूस वाहात नारायणराव पुण्याहून नागपूरला आले. तेथे मुख्याध्यापक वामन दाजी ओकांच्या शाळेत मास्तरकी करता करता विद्यार्थीप्रिय शिक्षकही झाले. याच काळात लक्ष्मीबाईंच्या हूडपणावर त्यांचे बारीक लक्ष असायचे. लक्ष्मीने लिहा-वाचायला शिकावे यासाठी त्यांची तगमगही चाले. या खटाटोपांमध्ये नारायण टिळकांमधला कवीही फुलत होता. तसेच वैराग्यही खुणावत होते. संन्यास घेतलेला हा `नारायणबाबा सुमारे दीड वर्ष लक्ष्मीला बाजूला सारुन घराबाहेर भटकत होता. दाढी वाढवून, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घालून जगसंचार करीत होता. हा वादळवारा पुन्हा आपल्या घरट्यात स्थिरावला. पण कवेतून कधी निसटून जाईल याचा ठाव लक्ष्मीबाईंनाही नसायचा.
१८८४ साली मुंबईतील प्रार्थना समाजात नारायणराव टिळकांनी `सत्य या विषयावर व्याख्यान दिले. अमोघ वाणीमुळे अनेक सोबती भोवती गोळा झाले. लक्ष्मीबाईही मुंबईच्या नव्या संसारात रमून गेल्या. याच मुदतीत नारायणरावांनी `आनंदराव अर्थात पाशबद्ध स्वदेशाभिमानी हे संगीत नाटक लिहून काढले.
मग या चरणा सोविल कोणती ललना
मुख्यधर्म पुशिला हो रमणा
हे या नाटकातील पद सर्वतोमुखी झाले होते. नारायणराव टिळकांमधील कवी अजूनही अस्वस्थ होता. काव्यरत्नावलीच्या धर्तीवर काव्यकुसुमांजली हे मासिक काढल्यानंतरच नारायण टिळक शांत झाले होते. `रसज्ञहो घ्या कुसुमांजली ही, आणू कोठून मणिमाला, भक्ती मात्र पाहोत सुज्ञ हो पदरी घ्या मज दीनाला अशी वाचकांची आळवणी ते करु लागले.
नारायणराव टिळक आणि लक्ष्मीबाईंच्या सहजीवनाचे चित्रण `स्मृतिचित्रेमध्ये आलेले असल्याने ख्रिश्चन धर्माचा अंगिकार केल्यानंतर नारायणरावांमध्ये झालेले परिवर्तन हा मुद्दा `चालता-बोलता चमत्कारच्या आधारे ठळकपणे रेखाटणे योग्य ठरेल. `गुज सांगाया कोण मिळेल मायेचे या भाववृत्तीत असताना राजनांदगावला रेल्वेने जाताना एका इंग्रजाची अवचित भेट झाली. औपचारिक चर्चेनंतर ख्रिश्चन धर्मग्रंथ नारायणराव टिळकांना त्याने भेट दिला. निवांत क्षणी बायबल वाचताना, येशू ख्रिस्ताच्या दयाळूपणाने त्यांचे मन व्यापून गेले. त्या तिरीमिरीत मुंबईला येऊन १० फेब्रुवारी १८९५ रोजी टिळकांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केले. या धक्क्याने राजनांदगावी मुक्कामाला असलेल्या लक्ष्मीबाई व त्यांचे माहेरचे लोक भलतेच हादरले.
रेव्हरंड टिळकांनी वसई प्रांतामध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रसार आपल्या सहकार्यांसह सुरु केला. `ख्रिस्त माझा तारणहार, मला वाटे प्रिय फार अशा मराठीतील गोड पदांनी  ते वसईकरांची मने आकृष्ट करु लागले. याच सुमारास आपला मुलगा देवदत्त याच्याशीही दोस्ती जमवायचे सत्र नारायणरावांनी सुरु केले. `प्रिय बाळा रे रम्य किती तव लीला, दे पूर मनी प्रेमाला या रचनेने त्यांनी देवदत्ताच्याही मनाचा ठाव घेतला. ब्राह्मण कुळातील या ख्रिश्चनाच्या अंगावर धर्मप्रसाराची नवी जबाबदारी पडली. नारायणरावांचा मुक्काम वाईच्या मिशन कंपाऊंडमध्ये हलला. त्यानंतर नगरच्या ईश्वर-विज्ञान-परिज्ञान शालेत प्रा. नारायण वामन टिळक आफली ईश्वरसेवा रुजू करु लागले. नगर-वाई अशा मुक्कामांमध्ये ख्रिश्चन धर्मप्रसाराचे कामही वाढले.
आपल्या कार्यासाठी रेव्हरंड टिळकांनी `ख्रिस्ती मासिक सुरु केले. पत्रकारितेची न फिटलेली हौस पुरवण्यासाठी `ख्रिस्ती नागरिक हे नियतकालिकही काढले. आता राहुरीमध्ये ख्रिस्ती धर्मप्रसाराचे काम वाढत होते. लक्ष्मीबाई, दत्तूही रुळला होता. ऐक्यसभा जोमाने पार पडत होत्या. नारायणराव टिळक आपल्या कवित्वाने जनसभा भारुन टाकत. जळगावला २ आणि ३ मार्च रोजी भरलेल्या पहिल्या मराठी कविसंमेलनाचे अध्यक्षपद नारायणराव टिळकांकडे चालून आले. याच दरम्यान `ख्रिस्तायन महाकाव्य रचण्याचा घाटही नारायणरावांनी घातला.
१८९६, १९०२च्या दुष्काळांवर ताण करणारा दुष्काळ १९१३-१४ साली अवतरला. रेव्हरंड टिळकांनी अहमदनगर प्रांतामध्ये `माझा शेजारी कोण?’ ही अभिनव मदत योजना राबविली. ख्रिश्चन धर्मप्रसाराच्या या कारकिर्दीत आपल्या धर्मांतराची हकीकत १८९४-९५च्या एका डायरीत नारायणरावांनी लिहून ठेवली होती. या डायरीचा उपयोगा त्यांचा नातू अशोक टिळक यांनी `चालता-बोलता चमत्कार ही कादंबरी लिहिताना केला आहे. येशूचा सच्चा अनुयायी आता शेवटच्या प्रवासाला लागला होता. आय़ुष्यभराच्या दगदगीने शरीर थकले होते. ९ मे १९१९ रोजी रेव्हरंड टिळक ख्रिस्तवासी झाले.
चालता बोलता चमत्कार या कादंबरीमध्ये कल्पनाविरहित सत्यवर्णन आहे. कादंबरीच्या भाषेचा बाज एकोणीसाव्या शतकातील मराठीचा आहे. लक्ष्मीबाई टिळकांची `स्मृतिचित्रे वाचल्यानंतर या कादंबरीमध्ये नवीन वाचण्यासारखे काय असणार आहे? असा प्रश्न उद्भवणे स्वाभाविक आहे. `स्मृतिचित्रेमध्ये लक्ष्मीबाई टिळकांनी ना. वा. टिळकांचे रेखाटलेले चित्र हे पत्नीच्या भूमिकेतून उभे केलेले आहे. त्यात तितकीशी तटस्थता नाही. ना. वा. टिळकांच्या काव्यप्रतिभेची `स्मृतिचित्रेमध्ये ओळख असली तरी त्यात अभ्यासपूर्णता नाही. रेव्हरंड टिळकांच्या मराठी कवितांनी साहित्याला नवे परिमाण दिले. त्याचा अभ्यास करुन अनेकांनी ग्रंथ लिहिले. ना. वा. टिळकांची अनेकांशी पत्रव्यवहार होता. त्यांनी स्फुटलेखन केलेले होते. त्याच्या सर्वांगीण अभ्यासातून नारायण वामन टिळकांचे चित्रण त्यांचे नातू अशोक टिळक यांनी `चालता-बोलता चमत्कार या कादंबरीत केलेले आहे. रेव्हरंड टिळकांचे चरित्र लिहिण्यापेक्षा त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांचा वेध `कादंबरीच्या रुपाने घेणे हे जास्त आव्हानात्मक होते. ते आव्हान अशोक टिळकांनी समर्थपणे पेलले आहे. रेव्हरंड टिळकांच्या चमत्कृतीपूर्ण आयुष्याचा वेध घेताना या कादंबरीत त्यांचे वडील, लक्ष्मीबाई आणि त्यांच्या माहेरकडील माणसे यांच्या व्यक्तिरेखा धूसर झाल्याचे जाणवते. मात्र टिळकांच्या ख्रिश्चनधर्म परायणतेचा आणि मराठी कवित्वाचा भाग अशोक टिळकांनी ठळकपणे चितारलेला आहे. `स्मृतिचित्रांच्या प्रभावातून या कादंबरीद्वारे बाहेर पडावे हीच तळमळ बहुधा असा तोल सांभाळण्यामागे असू शकेल. `चालता-बोलता चमत्कार या वास्तववादी कादंबरीचे मराठी साहित्य प्रांगणात खरे तर जोमदार स्वागत व्हायला हवे होते. ते तसे झाले नाही. हा दोष अशोक टिळकांचा नसून अपरिपक्व मराठी वाचकांचा आहे. म्हणून रेव्हरंड टिळकांचीच भूमिका उल्लेखून समारोप करतो.
वाढे कोलाहल हा शतगुण, जे जे बसतील मौना बिलगून,
ऐकवीत ते त्या सकला, जे ठाऊक माझे मजला.
पुस्तकाचे नाव – चालता-बोलता चमत्कार,
लेखक – अशोक टिळक
प्रकाशक – पाँप्युलर प्रकाशन,
किंमत – ४५० रुपये.



No comments:

Post a Comment