Friday, May 2, 2014

ठणठणपाळने`विनोदी' लेखनशैली दिली! - दै. नवशक्ति ( १७ आँगस्ट १९९४ )


मुलाखतीचा मूळ भाग



मुलाखतीचा उर्वरित भाग.


मराठी सारस्वतांचे अग्रणी जयवंत दळवी यांनी १४ आँगस्ट १९९४ रोजी वयाच्या ७० वर्षात पदार्पण केले होते. लौकिकार्थाने हे वय म्हणजे निवृत्तीचे परंतु जयवंतरावांच्या बहुप्रसवा लेखणीला त्यावेळीही विरामाचे स्वप्न पडले नाही. मराठी साहित्यातील विनोदाला नवीन वळण देणारे, कादंबरी व नाट्यलेखनात स्वत:चे घराणे निर्माण करणारे ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी हे कायमच मराठी साहित्य समीक्षकांनाही नवनवीन खाद्य पुरवत आले होते. दळवींच्या ग्रंथभाराला अडगळगीतले सामान म्हणणारे काही सिद्धांतवादी समीक्षकही येथे आहेत. अशा बहुअर्थाने चर्चित असलेल्या जयवंत दळवींची बहुतांशी पुस्तके प्रकाशित करणारे मॅजेस्टिक प्रकाशनचे विद्यमान संचालक व कै. केशवराव कोठावळे यांचे सुपुत्र अशोक कोठावळे यांची भेट घेतली. प्रकाशकांच्या नजरेला भावलेले जयवंतराव हा आमच्या `मॅजेस्टिक गप्पांचा विषय होता. ही मी घेतलेली मुलाखत दै. नवशक्तिमध्ये १७ आँगस्ट १९९४ रोजी छापून आली होती. त्या मुलाखतीची जेपीजी फाईल वर दिली आहे.


ठणठणपाळने`विनोदी' लेखनशैली दिली!

-         समीर परांजपे
-         paranjapesamir@gmail.coom



प्रश्न – मॅजेस्टिक प्रकाशन व जयवंत दळवी यांच्या सुखी संसाराची सुरुवात कशी झाली? मध्यस्थी `ललितची होती का?
अशोक कोठावळे – १९६३ सालची गोष्ट आहे. तेव्हा ललित मासिकाचा जन्मही झालेला नव्हता. मॅजेस्टिक प्रकाशनने त्यावर्षी एका कादंबरी स्पर्धेचे आयोजन केलेले होते. त्या स्पर्धेत जयवंत दळवींच्या `चक्र या कादंबरीला पहिले बक्षिस मिळाले होते. मग हीच कादंबरी मँजेस्टिकतर्फे प्रकाशित करण्यात आली. या घटनेपासून मॅजेस्टिक व जयवंतराव दळवी यांच्या सुखी संसाराला सुरुवात झाली असे म्हणता येईल. १९६४ साली मराठी साहित्यातील घडामोडींचा आढावा घेणारे `ललितहे मासिक सुरु झाले. ग्रंथप्रेमी मंडळाच्या पुरस्काराने चालविलेल्या ललितमध्ये जयवंतरावांनी `ठणठणपाळ या टोपण नावाने साहित्यिकांची विनोदी अंगाने खिल्ली उडविणारे लिखाण करण्यास सुरुवात केली. त्यावरुन `ठणठणपाळ`आणखी ठणठणपाळ अशी दोन पुस्तकेही मॅजेस्टिक प्रकाशनने काढली. थोडक्यात जयवंतरावांचा पहिल्यापासून ललितला स्नेह लाभला होता.
प्रश्न –  चक्र या कादंबरीमुळे मॅजेस्टिकचे नाव सरकार दरबारी गौरवाने घेतले गेले. पण चक्र व मधु मंगेश कर्णिकांची माहिमची खाडी या कादंबर्यांतील साम्य बघून दळवींची कथाकल्पना मधु मंगेश कर्णिकांनी उचलली असा आक्षेप काही समीक्षकांनी घेतला होता.
अशोक कोठावळे – या समीक्षकांना काही कळत नाही. चक्र व माहिमची खाडी या कादंबर्या एकाच काळात लिहिल्या जात होत्या हे खरे आहे. मॅजेस्टिकने चक्र प्रकाशित केल्यानंतर मधु मंगेश कर्णिकांची माहिमची खाडी ही कादंबरी एका वर्षाच्या अंतराने प्रसिद्ध झाली. चक्र व माहिमची खाडी या दोन कादंबर्यांमध्ये मुंबईतील झोपडरट्टीच्या विश्वाचे दर्शन असले तरी दळवी आणि कर्णिकांचे अनुभव विश्व वेगळे आहे हे समीक्षक विसरले. अशा समीक्षकांना फालतू वाद निर्माण करुन स्वत:च प्रसिद्धी मिळवायची असते. चक्र व माहिमची खाडी या कादंबर्या खूप गाजल्या. दळवी व कर्णिकांमध्ये दुरावा निर्माण करु पाहाणार्यांच्या लेखण्या आपोआप थंडावल्या.
प्रश्न –  `ललित मासिकामधील ठणठणपाळ या सदराने मराठी साहित्यविश्वाला नवे काय दिले?
अशोक कोठावळे – जयवंतरावांच्या लेखणीला स्वत:ची एक नजाकत आहे. खाजगी बैठका आपल्या मिश्किल स्वभावाने रंगविणारे जयवंत दळवी आपले लेखनही बैठक रंगविल्याप्रमाणेच करतात. ललितमधील ठणठणपाळ म्हणजे अशीच एक साहित्यिक बैठक झाली होती की जी हमखास रंगत असे. विनोदी शैलीत मराठी साहित्यजगतातील घडामोडींचा वेध घेणारे लिखाण करणे शक्य आहे ही दृष्टी प्रथम जयवंतरावांच्या ठणठणपाळ सदराद्वारे मिळाली. १९६४ साली सुरु झालेले हे सदर दळवींनी पुढे जवळजवळ वीस वर्षे चालविले. १९८३ साली केशवराव कोठावळे गेल्यानंतर पुढे जयवंतरावांनी ठणठणपाळ लिहिणे थांबवून त्याऐवजी अलाणेफलाणे हे नवीन सदर सुरु केले. विनोदी अंगाने साहित्यिक जगतातील माणसांची खिल्ली उडविता येते हे जयवंत दळवींनी सप्रमाण सिद्ध केल्यानंतर त्याच स्वरुपाच्या लेखनाची परंपरा सांगणारे दोन-तीन लेखक पुढे तयार झाले. १९८३ साली ललितमधील ठणठणपाळ बंद झाल्यानंतर त्याच स्वरुपाचे दुसरे सदर दुसर्याकडून लिहून घेण्याचा विचार मनात आला. त्याची परिणती म्हणून सुभाष भेंडे यांनी पितळी दरवाजा या सदराद्वारे साहित्यिकांची खिल्ली उडविणे सुरुच ठेवले. तेही सदर बंद झाल्यानंतर आनंद पुणेकर या टोपण नावाने सध्या एक तरुण लेखक त्याच प्रकारचे आनंदीआनंद हे सदर ललितमध्ये लिहित आहे. म्हणजे ठणठणपाळचा प्रभाव जनमानसावर किती होता व आहे हे तुमच्या सहज लक्षात येईल.
प्रश्न – ललितच्या एकंदर आराखड्यात ठणठणपाळचे स्थान कोणते राहिले.
अशोक कोठावळे – मराठी वाचकांमध्ये ललित मासिक लोकप्रिय होण्यात ठणठणपाळचा सिंहाचा वाटा होता हे सत्य आहे. २० वर्षे या सदरातून साहित्यिकांच्या फिरक्या घेण्यात आल्या. पण त्या घेता घेता काही साहित्यविषयक विचार गांभीर्याने मराठी सारस्वत व वाचकांपर्यंत ठणठणपाळने पोहोचविले होते. ठणठणपाळने केलेल्या नर्म शैलीतील विनोदी टिकेने त्याकाळात केवळ दोन-तीन साहित्यिकच रागावल्याचे मला स्मरते. ठणठणपाळने आपल्या विषयी लिहावे असेच बहुतांश साहित्यिकांना वाटत असे. व त्या उत्सुकनेतेही ललित मोठ्या प्रमाणावर वाचला जात असे. ठणठणपाळ हे सदर म्हणजे कै. केशवराव कोठावळे व जयवंतराव दळवी यांच्या असीम स्नेहाचे प्रतिकच होते म्हणाना.
प्रश्न – मॅजेस्टिक प्रकाशनने दळवींची सर्वाधिक पुस्तके छापली आहेत हे खरे आहे काय?
होय. कथासंग्रह, कादंबर्या, नाटके, विनोदी लेखन इ. सर्व लेखनप्रकार समर्थपणे हाताळणार्या जयवंत दळवींची ७१ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यापैकी मॅजेस्टिकने दळवींचे तीन कथासंग्रह, २२ कादंबर्या, १३ नाटके, विनोदी साहित्याची तीन पुस्तके तसेच इतर लेखनापैकी ४ पुस्तके अशी मिळून एकंदर ४५ पुस्तके प्रकाशित केली आहेत. या पुस्तकांत `पु. ल. : एक साठवण हे जयवंत दळवींनी संपादित केलेले पुस्तकही असून ते चोखंदळ वाचकांना खूप आवडले होते.
प्रश्न – मॅजेस्टिकच्या एका पार्टीत जयवंतराव दळवी व एका मराठी वर्तमानपत्राचे संपादक यांच्यात झालेले भांडण हा खरेतर ठणठणपाळ या सदराचाच विषय होता.
अशोक कोठावळे – खरे आहे. सदर संपादक (म्हणजे दै. लोकसत्ताचे तत्कालीन संपादक माधव गडकरी) महोदय व जयवंत दळवी यांच्यात या पार्टीत झालेल्या भांडणामुळे मॅजेस्टिक प्रकाशनाला काही धक्के बसलेही असते. पण त्या प्रसंगानंतर जयवंत दळवींनी मला दूरध्वनीवरुन सांगितले की, माझे त्या संपादकांशी फिस्कटलेले असले तरी अशोक, तू मात्र त्या संपादकाशी तुझे व्यावसायिक संबंध पूर्वीसारखेच ठेव. त्यामुळे मॅजेस्टिकच्या संबंधीचा माझा प्रेमभाव कमी होण्याचे काही कारण नाही. जयवंतरावांनी मला दिलेल्या या सल्ल्यातच त्यांच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो. १९८३ साली केशवराव कोठावळे गेल्यानंतर मी प्रकाशन संस्थेची धुरा हाती घेतली. तेव्हा मला सर्वाधिक मार्गदर्शन लाभले ते जयवंतराव दळवी यांचेच. जयवंत दळवी हे मांसाहारप्रिय. आमच्या घरी जेवायला आले की, सुके व सोलकढी यांचा भरपूर आस्वाद घेतल्यानंतर या पदार्थांची स्तुती करण्यातच त्यांची रसना मग्न असायची. अर्थात याचे श्रेय मी माझ्या आईला देतो. गेली दोन वर्षे जयवंत दळवी आजारी असतात. त्यामुळे त्यांचे येणे-जाणे कमी झाले आहे. पण तरीही दळवींचे मॅजेस्टिकवरील लक्ष तिळभरही कमी झालेले नाही. याचे कारण दळवींचे हात घेणार्यापेक्षा देणार्याचे जास्त आहेत. म्हणून ते दोन्ही हातांच्या ओंजळींनी भरभरुन प्रेम मॅजेस्टिक परिवाराला देत आले आहेत.


No comments:

Post a Comment