Sunday, November 9, 2014

जातिव्यवस्थेचे आंतरविच्छेदन - दै. दिव्य मराठीच्या ९ नोव्हेंबर २०१४च्या अंकातील रसिक पुरवणीत प्रसिद्ध झालेला लेख.





ख्यातनाम समाजशास्त्रज्ञ हिरा सिंग यांच्या रिकास्टिंग कास्ट : फ्रॉम द सेक्रेड टू द प्रोफेन या पुस्तकाची समीक्षा मी दै. दिव्य मराठीच्या ९ नोव्हेंबर २०१४च्या अंकातील रसिक या रविवार पुरवणीत केली होती. त्या लेखाची टेक्स्ट वेबलिंक, जेपीजी फाईल व त्या पानाची वेबलिंक सोबत दिली आहे. तो लेखही खाली दिला आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/…/MAG-article-on-book-revie…
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/…/r…/244/09112014/0/4/
--------
जातिव्यवस्थेचे आंतरविच्छेदन
---
- समीर परांजपे
sameer.p@dbcorp.in
---
जातिव्यवस्था हे हिंदू धर्माचे व्यवच्छेदक लक्षण ठरले आहे. जातींमुळेच हिंदू धर्मातील एकजीवत्वाला तडे गेलेले आहेत. सहिष्णू म्हणून गौरवल्या जाणा-या हिंदू धर्मात जातिव्यवस्थेमुळे जे सामाजिक, आर्थिक, राजकीय, वैचारिक स्तर निर्माण झाले, त्यामुळे धर्मात एक प्रकारचा ताठरपणा आला आहे. त्यातून हिंदू धर्मात कट्टरपंथी, समाजविद्वेषी विचारांनाही धग मिळाली आहे. जातिव्यवस्थेच्या या विविध पैलूंचे योग्य प्रकारे आंतरविच्छेदन ‘रिकास्टिंग कास्ट : फ्रॉम द सेक्रेड टू द प्रोफेन’ या पुस्तकात करण्यात आले आहे. हे पुस्तक लिहिणारे हिरा सिंग हे ख्यातनाम समाजशास्त्रज्ञ आहेत. कॅनडातील टोरंटो येथील यॉर्क विद्यापीठामध्ये समाजशास्त्र हा विषय शिकवितात. त्यांनी याआधी दिल्ली विद्यापीठ, तसेच कॅनडातील विलफ्रिड, व्हिक्टोरिया, न्यू ब्रुन्सविक या विद्यापीठांमध्येही समाजशास्त्र विषयाचे अध्यापन केले आहे. जमिनीवरील हक्क व राजकीय सत्ता नेमकी कोणाकडे असावी, हे ठरविण्याच्या संघर्षातून जातिव्यवस्थेचा उगम झालेला आहे, असा हिरा सिंग यांचा दृष्टिकोन आहे. तर मुख्य प्रवाहातील समाजशास्त्रज्ञ हे जातिव्यवस्थेचा अभ्यास करताना हिंदू धर्मातील धार्मिक रूढी, परंपरांवर अधिक भर देतात. आंतरजातीय असमानता त्यांना फार महत्त्वाची वाटत नाही. नेमकी याच ठिकाणी हिरा सिंग यांच्या वेगळ्या प्रतिपादनास सुरुवात होते. जातिव्यवस्थेची पाळेमुळे आर्थिक आणि राजकीय अनुक्रमाच्या पार्श्वभूमीवर तपासून घेणे आवश्यक आहे. जातिव्यवस्था ही हिंदू धर्माची निर्मिती नाही, असे ठोस प्रतिपादन या पुस्तकात करून हिरा सिंग मुख्य प्रवाहातील समाजशास्त्रज्ञांच्या मतांना सुरुंग लावू पाहतात. आपले समान वर्गहित साध्य होत नसेल, तर एखाद्या जातसमूहातील लोक नीटसपणे संघटित होताना दिसत नाहीत. मात्र विविध जाती, तसेच उपजातींतील लोक आपले वर्गहेतू साध्य होत असतील तर राजकीयदृष्ट्या तुलनेने लवकर संघटित होताना दिसतात. अशा सामाजिक वर्तनामुळे जातींमधील जागृती ही वर्गजागृतीचेच दुसरे रूप असते, हा भारतात बाळगण्यात येणारा समज खोटा ठरतो. या पुस्तकामध्ये (१) जातींचा अभ्यास - संकल्पना, भौतिक स्थिती आणि इतिहास (२) पुरोहित आणि राजा : स्थिती आणि सत्तेतील गैरव्यवस्था (३) वर्ण ते जात : राजकीय, आर्थिक, धार्मिक वाटचाल (४) जात आणि तळागाळातील समाजाचा अभ्यास - अभिजन वर्गाची विचारसरणी (५) भूमी, जात, वंश यांच्या दृष्टिकोनातून जातींमधील असमानता (६) करारनामा, धर्म आणि जात - हिंदू धर्म आणि जातीविषयीची दोन मिथके अशी एकूण सहा प्रकरणे आहेत. त्यातून हिरा सिंग यांनी आपली वैचारिक मांडणी केली आहे.
जात म्हणजेच वर्ग, अशी मांडणी डाव्या विचारांच्या समाजशास्त्रज्ञांकडून होत असली तरी त्यातून काही ठोस हाती लागेल, असे हिरा सिंग यांना वाटत नाही. जात हा भारतीय समाज व इतिहासासाठी महत्त्वाचा घटक आहे. या विषयावर बुर्झ्वा तसेच स्युडो डाव्या विचारवंतांनी उदंड चर्चा केली आहे. मात्र जातीविषयी मुख्य प्रवाहातील समाजशास्त्रज्ञांनी केलेल्या विश्लेषणाला हिरा सिंग यांनी सैद्धांतिक किंवा तात्त्विकतेचे लेबल लावलेले नाही. हिरा सिंग या संदर्भात असे म्हणतात की, ऐतिहासिक जडवाद व द्वंद्वात्मकता यांचा सिद्धांत मार्क्स व एंगल्सने मांडला. त्याच्या आधारे श्रमिक वर्गाने क्रांतिकारी आचरण कसे करावे, याचे विश्लेषण ‘कम्युनिस्ट पक्षाच्या जाहीरनाम्यात’ या दोघांनी केलेले आहे. या विश्लेषणावर विचारवंतांनी चौफेर हल्ले चढविले. मार्क्सच्या विचारांचा जगभरातील श्रमिकवर्गात होणारा प्रसार रोखता न आल्याने, या विचारवंतांनी मार्क्सच्या विचारांना आतून सुरुंग लावण्याचे प्रयत्न केले. त्यासाठी बुर्झ्वा विचारवंतांनी काही सैद्धांतिक संकल्पनांचा आधार घेतला होता.
जातिव्यवस्थेविषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या विचारांतही मूलभूत फरक होताच. या दोन महापुरुषांच्या जातीविषयक दृष्टिकोनापेक्षा डाव्या विचारवंतांचे विश्लेषण हे अगदी निराळे आहे. हिंदू धर्म जिवंत राहण्यासाठी जातव्यवस्था आवश्यक ठरत गेली, अशी मांडणीही काही उजव्या विचारवंतांनी केली. हिरा सिंग यांना उजव्या विचारवंतांची ही विधाने मान्य नाहीत. हिंदू धर्म हा जातींना जन्म किंवा पुनर्जन्म देऊ शकत नाही, असे हिरा सिंग यांना वाटते. वर्गाचा अंत केल्याशिवाय जातीचा अंत होणार नाही, अशी धारणा या पुस्तकात प्रकट होताना दिसते. राजकीय, आर्थिक, धार्मिक अधिकारांचे असमान वाटप ही कल्पनारम्यता आहे. जाती व वर्गाची आर्थिक पाळेमुळे व त्यांचे राजकीय महत्त्व हे ओळखूनच भारतीय समाजाचा विचार करणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक स्रोतांचे जात व वर्गांना असमान वाटप झाले आहे, ही वस्तुस्थिती लक्षात घेतली तर मध्यमवर्गीयांच्या जाणिवांचा अंत म्हणजे जातिव्यवस्थेचा अंत नाही. त्यामुळे जातिव्यवस्थेचा अंत हा घटक मानसिक नसून ती भौतिक घटना आहे, हे मार्क्स व एंगल्सचे विधान हिरा सिंग यांना पटत नाही.
मार्क्सवादाची एक तात्त्विक बाजू अशी आहे की, जी बहुतांश डावे विचारवंत लक्षात घेताना दिसत नाहीत, किंवा त्या पैलूला फार महत्त्व देत नाही. उत्पादन तसेच त्याच्याशी संबंधित प्रक्रियेमध्ये श्रम‌विभागणीच्या दृष्टिकोनातून जातिव्यवस्था ही वैचारिक अभिव्यक्तीचे रूप घेते. त्यामुळे सरंजामशाही समाजामध्ये जातिव्यवस्थेचा प्रश्न सोडविणे हे वाटते तितके सोपे काम नाही. मार्क्सच्या विचारांमधील ही जाणीव डाव्या विचारवंतांनी लक्षात न घेतल्यानेच त्यांनी जात व वर्ग यांचा अन्योन्यसंबंध लावण्यात नेहमीच गल्लत केली आहे, असा नेमका सूर हिरा सिंग यांनी या पुस्तकात लावला आहे. वर्ग हा सामाजिक संबंधांचा भाग असतो. त्यात उत्पादनविषयक सामाजिक संबंधही गुंतलेले असतात. वर्ग आणि वर्गसंघर्ष हा पूर्णपणे आर्थिक स्वरूपाचा असतो. मॅक्स वेबरने वर्ग, स्थिती, पक्ष यांचे सुंदर वर्गीकरण आपल्या लिखाणात करून ठेवले आहे. जात हा वर्गाच्या विरोधात उभा ठाकलेला घटक आहे, असे त्याचे मत आहे. वर्गसंघर्ष हा सामाजिक प्रश्नांपेक्षा आर्थिक स्वरूपाचा अधिक असतो. फ्रेंच राज्यक्रांती तसेच इंग्लंडमधील चळवळी या वर्गसंघर्षांचा परिपाक होत्या. ब्रिटिशांच्या गुलामीत असलेल्या भारतातील संस्थानांमध्ये १९१० ते १९४० या कालावधीत झालेल्या शेतक-यांच्या चळवळी या आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक स्वरूपाच्या होत्या. हे शेतकरी जमिनीसाठी, राजकीय प्रतिनिधित्वासाठी, उच्च सामाजिक दर्जासाठी, तसेच सांस्कृतिक समानतेसाठी चळवळी करीत होते. जात व वर्ग यांच्या भौतिक व प्रतीकात्मक सीमारेषा नष्ट करण्यासाठी या सामाजिक चळवळी झाल्या. ही सर्व वस्तुस्थिती लक्षात घेतली की, जात-धर्म यांच्यातील अन्योन्यसंबंध तसेच जातिअंताचा विचार सुस्पष्टपणे वाचकासमोर येतो. जातिव्यवस्थेची यापूर्वी पुरेशी न आकळलेली ही रूपे जाणून घेण्यासाठी हिरा सिंग यांचे हे पुस्तक आवर्जून वाचायलाच हवे.
* पुस्तकाचे नाव - रिकास्टिंग कास्ट : फ्रॉम द सेक्रेड टू द प्रोफेन
* लेखक - हिरा सिंग
* प्रकाशक - सेज पब्लिकेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड
* पृष्ठसंख्या - २८७
* मूल्य - ७९५ रुपये

No comments:

Post a Comment