Tuesday, December 2, 2014

चळवळ्या नार्वेकर (रंगकर्मी, लेखक, दिग्दर्शक चळवळ्या श्रीनिवास नार्वेकर याच्याबद्दल काहीबाही....)



चळवळ्या नार्वेकर
(रंगकर्मी, लेखक, दिग्दर्शक चळवळ्या श्रीनिवास नार्वेकर याच्याबद्दल काहीबाही....)
----
हवेत च कर आणि हवे तेच कर
अशा दोन जमाती असतात, काही तरी करु पाहाणार्यांच्या.
त्यापैकी पहिली जमात नुसती हवेतच इमले बांधत असते.
दुसरी जमात आपल्याला हवे तेच व तसेच करतानाही जमिनीशी नाते घट्ट ठेवून आपले मेणाचे किंवा शेणाचे जे काही असेल ते घर बांधते.
या हवे तेच कर जमातीमध्ये श्रीनिवास नार्वेकर मोडतो.
तो मुंबईतील गिरगावचा असला तरी वयपरत्वे सावंतवाडीमध्ये गेला...माणूस मोठा झाला की, कोकणात जातो. कोकणात तसा प्रत्येक माणूसच मोठा पण हा त्यांच्यातही मोठा...स्वकर्तृत्वाने..हे शेवटचे जास्त महत्वाचे आहे.
निखळ कलारसिक असलेल्या, सिनेमा, नाटक यांची उत्तम पारख व जाणकारी राखणार्या रमाकांत नार्वेकर यांचे हे सुपुत्र लहानपणी भयंकर भूमिकांमध्ये वावरायचे.
दरो़डेखोर, जुलुम अशा कुलदीप पवार नायक असलेल्या चित्रपटांमध्ये नायकाच्या बालपणीची भूमिका श्रीनिवासने केलेली. त्यामुळे त्या भूमिका मोठ्या होऊन किती भयंकर कामे करतात हे सांगायला नको...
पण हा लहानपणी भयंकर भूमिका करणारा मुलगा पुढे अभ्यंकर चुकलो अभयंकर झाला.
एका ध्येयाने पछाडलेला ( अखिल जगात कोकणातच सर्वात जास्त संख्येने विविध प्रकारची भूते-खेते आहेत. त्यातील कोणत्याने याला पछाडले माहित नाही.) श्रीनिवास मग सावंतवाडीच्या कर्मभूमीत विविध रंग उधळू लागला म्हणजे नाट्यरंगांबद्दल बोलतोय मी...
सावंतवावाडीला असताना त्याने तिथे अर्धवेळ वार्ताहर म्हणून पत्रकारिता केली. (आणि आता त्याच्यावर हे लिहिणारा तर अर्धवट पत्रकार आहे.)
त्यानंतर नाट्यविलास नावाची संस्था काढून एकांकिकांचा संसार मांडला. त्या एकांकिका तो वेळप्रसंगी लिहित होता. दिग्दर्शित करीत होता. किंवा इतरांनी लिहिलेल्या एकांकिकांना दिग्दर्शनाचा साज चढवत होता.
सावंतवाडीसारख्या मुंबईपासून लांब असलेल्या ठिकाणी राहून नाट्यविलास वगैरे करणे तसे सोप्पे नाही.
अस्सल कोकण्याचे स्वप्न असते मुंबईत येऊन काहीतरी करणे....
पण या श्रीनिवासला ही स्वप्ने पडली नाहीत इतका तो तिथल्या जांभा दगडाशी व लाल मातीशी एकरुप झाला होता.
नाट्यहौस पुरवता पुरवता त्याने बालरंग नावाची संस्था काढली. लहान मुलांसाठी बालनाट्ये, तसेच शिबिरे असे भले जंगी उपक्रम सुरु केले. त्यानंतर बालरंग नावाचे मासिक काढून दीड-दोन वर्षे चालविले.
त्यानंतर गुढकथा लिहिण्याचा त्याला नाद लागला. या दाढी राखणार्यांचे तसेही सगळे गुढ असते. मग तो श्रीनिवास असेल, समीर सुर्वे असेल नाहीतर नरेंद्र मोदी...ही माणसे मोठी आहेत हे आपल्याला कळत असते, पण तरीही ती आपल्यासारखीच वाटत राहातात.
श्रीनिवासला दाढी असली तरी तिच्यात तिनका वगैरे काही नाही. सगळे सरळसोट...कोकणी माणूस...काय होणार दुसरे? गुढकथा लिहिण्यात प्रगती इतकी की त्याचे पुस्तक आले. रत्नाकर मतकरी खुश या कथांमुळे श्रीनिवासवर....
त्यानंतर त्याची नऊ इ-बुक्स आली. बुकगंगा यांनी दोन प्रकाशित केली तर विक्रम भागवत यांच्या सृजन पोर्टलवर ७ इ-बुक्स प्रसिद्ध झाली आहेत आजवर त्याची....श्रीनिवासला कार्यकर्ता तसेच लेखक म्हणून अनेक पुरस्कार मिळाले आहेत. धडपड्या रंगकर्मीचा असा गौरव होणे उचितच असते. वर्तमानपत्र, मासिके, इ-मासिकांमधून जागतिक चित्रपट, राजकीय-सामाजिक विषयांवर श्रीनिवासने सटायरिकल स्तंभ लेखन केले आहे. त्याने लोकमत वृत्तपत्रात चालविलेल्या सदराचे सृजन'तर्फे इ-बुक प्रकाशित झाले.
कविता, साहित्य सर्वांपर्यंंत पोहोचावे यासाठी अभिवाचनाचे कार्यक्रमही करतो तो...
असे बरेच काही त्याच्या पोतडीत आहे. अरे हो सांगायचे राहिले जादूगार बनून त्याने जादूचे खेळही रसिकांसमोर सादर केले होते....
त्याच्या पोतडीत काय काय आहे याचा सगळाच तपशील इथे सांगत बसत नाही...त्यातील आशय व विषय महत्वाचा...
हा दाढीवाला मला २००२ सालानंतर भेटायला लागला. दादर पूर्वेच्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात मी काहीबाही वाचायला जायचो. तर तिथे श्रीनिवास खूप सारे वाचत बसलेला असायचा.
रामायण मालिकेतील साधूची भूमिका करणारा कलाकार रोज ग्रंथसंग्रहालयात येऊन बसतो असे त्यावेळी मी कोणाला तरी सांगितले होते.
संघर्षाचे दिवस असूनही त्याबाबत कधीच कटुता दिसली नाही त्याच्या तोंडी...
कोकणी माणूस...सहनशील असणारच...
मुद्दा हा की, आपल्या अटीवर तो नाटके, एकांकिका, चित्रपट, मालिका करीत राहिला....तद्दन व्यावसायिक होणे, पाणी घालून कलाकृती पातळ करणे त्याला जमले नाही....म्हणून मोठे यश जे व्यावहारिक दुनियेला हवेहवेसे वाटते ते मिळण्यास वेळ लागतोय याची त्याला खंतही नाही.
मस्तमौला आहे तो....
त्याची अलीकडेच गाजलेली मालिका म्हणजे भेटी लागी जीवा
त्याच्याशी गप्पा मारताना तो अशा काही जीवघेण्या गप्पा मारतो की त्या भेटीत या गोष्टी मनाला लागतातच...
त्याला सिनेमा, नाटक, मालिंकामधील खोटेपणाची चीड आहे. तो कोकणी माणूस म्हणजे गुणसूत्रांमधूनच घेऊन आलेल्या वैशिष्ट्याप्रमाणे चळवळ्या असल्याने सतत नाटकाविषयी वेगळा विचार करत बसतो. सध्या आवाजाची संस्कृती सर्वांना नीट कळावी व त्यांनी ती अंगिकारावी म्हणून व्हाँइस कल्चरचे उत्तम प्रशिक्षणवर्गही घेतो...
मेडिकलपासून ते लिगल पर्यंत अनेक कंपन्यांच्या मजकूराचा अनुवाद करणे, अनेक जाहिरातींसाठी काँपीरायटिग करणे हे कुटिरोद्योग चालू असतात जगण्यासाठी ज्या दिडक्या लागतात त्यासाठी...महाराष्ट्रातील जे इंग्रजीतून मराठी किंवा मराठीतून इंग्रजी सहजसुंदर अनुवाद करणारे अव्वल दर्जाचे अनुवादक आहेत त्यात हे नार्वेकर महाशय आहेत. सध्या महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता वृत्तपत्रात अनेक बिल्डिंग प्राँजेक्टच्या जाहिराती येतात. त्यात त्या प्रकल्पांचा माहिती देणारा सुंदर मजकूर असतो. त्या मजकुराचे लेखन म्हणजे काँपीरायटिंग श्रीनिवासनेच केलेले असते.
बाकी उरलेला वेळ त्याचा कुटीलउद्योगात जातो. ते म्हणजे चित्रपट, नाटक. मालिका वगैरेंचे लेखन करण्यात...
त्याच्या आजवरच्या वाटचालीतील महत्वाचे मार्गदर्शक म्हणजे नाटककार प्र. ल. मयेकर...मुंबईच्या व्यावसायिक कलाक्षेत्रात नार्वेकरांचा श्रीनिवास नंतर कधीतरी प्रवेशता झालाच असता पण मयेकरांमुळे त्याचा हा प्रवेश लवकर झाला. मयेकरांबद्दल बोलताना तो हरखून जातो....ते त्याच्या डोळ्यातही दिसते.
एकांकिका, नाटक, चित्रपट, मालिका अशी विविध माध्यमे हाताळणारा श्रीनिवास नार्वेकर हा तत्ववादी आहे. त्यामुळेच त्याला परखडपणाचे वैभव लाभले आहे. त्या बळावरच ज्ञान मिळवून तो जागतिक चित्रपटांविषयी काँलम लिहू शकतो. असे दोन-तीन काँलम त्याने आधी वर्तमानपत्रात लिहिले आहेत.
अशा अनेक गोष्टी एकाचवेळी करुनही तो मनाने जितका नाटकाचा राहिला आहे. तेवढाच मालिका. चित्रपटांचाही राहिला आहे. चळवळ्या श्रीनिवास नार्वेकरला स्वस्थ बसवत नाही. अकाली पांढरी झालेली दाढी, डोक्यावरचे पांढरे केस यामुळे तो खूप स्काँलर वाटतो. मला बोलायला भ्या वाटते आणि त्याच्या विषयी अधिक लिहायला....
पण श्रीनिवास तू असाच चळवळ्या राहा...कारण असे लागते कुणीतरी धाक दाखविणारे...
तुझे उत्कर्षाचे दिवस आता सुरु झालेत (त्याच्या सहचारिणीचे नाव उत्कर्षा असे आहे). त्याची पत्नी डॉ. उत्कर्षा बिर्जेचे त्याच्याविषयीचे खास मत तिने ही पोस्ट वाचल्यानंतर दिले ते असे `ऑलटाईम परफ़ॉर्मर आहे तो ! कथा कविता गीत संगीत चित्र शिल्प ...काही असूदे त्याला रंगमंचीय अविष्कारच दिसत असतो !(तोही गिमिक्स विरहित !!)...पंतप्रधानांना पत्र ,Hana ची सूटकेस यांची रंगावृत्ती... कोकणी कवितांवर सादर केलेले रंगाविष्कार , voice culture .. यातली त्याची 'व्हिजन' मीही सहकर्मी म्हणून अनुभवलीय...अनुभवतेय म्हणून सांगावं वाटलं इतकंच !`. श्रीनिवासला या उत्कर्षांच्या दिवसात अधिक यश त्याच्या कामाच्या मेहनतीतून नक्कीच मिळणार यात शंकाच नाही.
श्रीनिवास तू आहेस तसाच मला आवडतोस. अशीच नाटके करत राहा...म्हणजे नाटकी वागणार्यांना त्यात कोणतीही भूमिका मिळणार नाही....चळवळ्या नार्वेकर असे तुला गावात म्हणत असतील...ते मी तुला इथे म्हणून घेतो. तुला शुभेच्छा.
- समीर परांजपे

No comments:

Post a Comment