Sunday, August 24, 2014

कोंडीत सापडलेले शरीफ सरकार ! - दै. दिव्य मराठीच्या २४ अाॅगस्ट २०१४च्या रविवारच्या रसिक पुरवणीत प्रसिद झालेला लेख.



पाकिस्तानातील सध्याच्या स्थितीवर भाष्य करणारा मी लिहिलेला लेख दै. दिव्य मराठीच्या २४ अाॅगस्ट २०१४च्या रविवारच्या रसिक पुरवणीत प्रसिद्ध झाला अाहे. त्या लेखाची लिंक व टेक्स्ट पुढे दिले आहेत.
http://divyamarathi.bhaskar.com/.../MAG-article-on...
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/.../244/24082014/0/4/


------------
कोंडीत सापडलेले शरीफ सरकार !
---
- समीर परांजपे
paranjapesamir@gmail.com
-------
पाकिस्तानमध्ये गेल्या वर्षी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पाकिस्तान मुस्लिम लीग- नवाझ (पीएमएल-एन) या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळून त्या पक्षाचे प्रमुख नवाझ शरीफ पंतप्रधानपदी विराजमान झाले. ही पहिलीच निवडणूक अशी होती की, आधी पाच वर्षे कारभार केलेल्या सरकारने लोकशाही मार्गाने नव्या सरकारकडे सत्तासूत्रे सोपविली. शरीफ यांचा विजय डोळ्यात खुपणारे दोन असंतुष्ट आत्मे पाकिस्तानात सध्या धुमाकूळ घालत आहेत. त्यातील एक आहे पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचा प्रमुख व माजी क्रिकेटपटू इम्रान खान व दुसरे आहेत पाकिस्तानी अवामी तहरीक (पीएटी) या पक्षाचे प्रमुख मौलवी ताहिर-अल- काद्री.
शरीफ यांना सत्तास्थानावरून हुसकावून पाकिस्तानला ख-या अर्थाने ‘आझादी’ मिळवून देण्यासाठी पीटीआय व पीएटी या दोन पक्षांनी स्वतंत्रपणे दोन मोर्च्यांचे आयोजन केले होते. त्यामुळे इस्लामाबादमध्ये कायदा-सुव्यवस्थेची स्थिती कायम राहण्यासाठी ते शहर लष्कराच्या ताब्यात गेल्या 1 ऑगस्टपासून पुढील तीन महिने देण्याचा निर्णय नवाझ शरीफ सरकारने घेतला होता. त्याची निर्भर्त्सना पाकिस्तानी पीपल्स पार्टी (पीपीपी) या प्रमुख विरोधी पक्षाने केली होती. नवाझ शरीफ यांच्या सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी गेल्या 18 ऑगस्टपासून पाकिस्तानातील सर्व विरोधी पक्ष व नागरिकांनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू करावी, असे आवाहन इम्रान खान याने केले होते. पण त्याचा पक्ष वगळता पाकिस्तानातील एकाही विरोधी पक्षाने त्याला प्रतिसाद न दिल्याने इम्रान खान एकाकी पडला. त्यातच आपले स्वार्थी हेतू साध्य करण्यासाठी इम्रान खान राज्यघटनेचा भंग होईल अशी कृत्ये करण्यासाठी पाकिस्तानी जनतेला भडकवत आहे, असा आरोप पाकिस्तान पीपल्स पार्टीचे सह-अध्यक्ष असीफ अली झरदारी यांनी करून इम्रान खान याला अपशकून केला होता. मौलवी ताहिर-अल-काद्री हे नवाझ शरीफ यांचे एक महत्त्वाचे विरोधक. त्यांचे वास्तव्य असते कॅनडामध्ये, पण ते सध्या पाकिस्तानमध्ये परत आले आहेत. त्यांच्या पीएटी पक्षाचे चौदा कार्यकर्ते लाहोर पोलिसांबरोबर जून महिन्यामध्ये झालेल्या चकमकीत ठार झाले होते. या कार्यकर्त्यांचा खून केल्याच्या आरोपावरून नवाझ शरीफ यांना अटक करण्यात यावी व शरीफ यांची पंतप्रधानपदावरून हकालपट्टी करून पाकिस्तानात हंगामी सरकार स्थापन करण्यात यावे, अशी मागणी या काद्री महाशयांनी केली होती. या संदर्भात न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर झालेल्या सुनावणी प्रसंगी लाहोर सत्र न्यायालयाने पंतप्रधान नवाझ शरीफ, त्यांचे बंधू व पंजाबचे मुख्यमंत्री शहाबाझ व अन्य 19 जणांवर खुनाचा आरोप दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्याला लाहोर उच्च न्यायालयात पंजाब सरकारने आव्हान दिले आहे. दुस-या बाजूस आपले उद्योगसाम्राज्य विस्तारण्यासाठी नवाज शरीफ हे राष्ट्रीय संपत्तीचा गैरवापर करत आहेत, असा इम्रान खानने आरोप केला. 2013मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत अनेक गैरप्रकार करून नवाझ शरीफ यांनी विजय मिळवला असल्याचा आक्षेप इम्रान खान व मौलवी ताहिर-अल-काद्री हे वारंवार घेत असून शरीफ सरकारविरोधात दोघांनीही 14 ऑगस्ट रोजी लाहोरपासून इस्लामाबादच्या दिशेने दोन स्वतंत्र मोर्चे काढले. 17 ऑगस्ट रोजी हे मोर्चे इस्लामाबादमध्ये धडकले. जितका गाजावाजा झाला होता तितक्या प्रचंड संख्येने दोन्ही पक्षांचे समर्थक आपापल्या मोर्च्यांत सहभागी झाले नव्हते. इम्रान खान याच्या पीटीआय पक्षाचा मोर्चा लाहोरहून निघाल्यावर इस्लामाबादच्या दिशेने येत असताना पंजाब प्रांतातील गुजरनवाला या भागात नवाझ शरीफ यांच्या पीएमएल(एन) या पक्षाच्या सुमारे 400 पक्ष कार्यकर्त्यांनी या मोर्चावर दगडफेक केली, तसेच इम्रान खान याच्या गाडीच्या दिशेने गोळीबारही केला. या घटनेचाही इम्रान खान याने शरीफविरोधी वातावरण तापवण्यासाठी व्यवस्थित उपयोग करून घेतला होता. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) व पाकिस्तानी अवामी तहरीक (पीएटी) या दोन्ही पक्षांना पाकिस्तानी जनतेमध्ये फारसा पाठिंबा नाही. इम्रान खान आपला राजकीय दबदबा वाढविण्यासाठी गेली काही वर्षे प्रयत्नशील आहे, पण त्याला त्यात यश आलेले नाही. मौलवी ताहिर-अल-काद्री यांचीही तीच कथा आहे. नवाझ शरीफ यांना सत्तेवरून घालविणे वाटते तितके सोपे नाही. आपल्या राजकीय कारकीर्दीतील पूर्वीच्या टप्प्यात केलेल्या चुका पुन्हा न करण्याचे राजकीय शहाणपण शरीफ यांनी गेल्या एक वर्षात दाखविले आहे. पाकिस्तानी लष्कराशी वितंडवाद होईल इतकी परिस्थिती ताणू न देता ते सावधपणे आपला कारभार हाकत आहेत. भारत-पाकिस्तानचे संबंध फारसे सलोख्याचे नसल्याबद्दल नवाझ शरीफ यांनी अलीकडेच पाकिस्तानी राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीमध्ये बोलताना खंत व्यक्त केली होती. हे संबंध सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न करायला हवेत, असेही ते म्हणाले होते. पाकिस्तानात सत्ता हाती असलेले पक्ष भारताशी सलोखा राखण्याची भाषा करतात व ज्यांना सत्ता मिळवायची असते ते भारतद्वेषाची भाषा करून पाकिस्तानी जनमानस भडकावतात, असा आजवरचा अनुभव आहे. नवाझ शरीफ हे विरोधात असताना त्यांनीही भारताविरोधात विखारी प्रचार केला होता. असे वर्तन करणा-यांत बेनझीर भुत्तो, आसिफ अली झरदारी यांचाही समावेश आहे. इम्रान व काद्री हेही आपल्या भाषणांना भारतविरोधाची फोडणी देण्यास चुकलेले नाहीत. नवाझ शरीफ सरकार हे भारताच्या कलाने वागते, असा आरोपही इम्रान खान याने अलीकडेच केला होता!
पाकिस्तानमध्ये समोरासमोर युद्ध करण्याची हिंमत नसल्यानेच त्याने भारताविरुद्ध छुपे युद्ध आरंभले आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच केला. कारगिलच्या दौ-यादरम्यान त्यांनी केलेल्या भाषणातील हे वक्तव्य आहे. त्यानंतर काही दिवसांतच काश्मीरमधील फुटीरतावादी गटांच्या नेत्यांची पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बसीत यांनी भेट घेतली होती. त्याचा निषेध म्हणून भारत-पाकिस्तान या देशांच्या परराष्ट्र सचिवांमध्ये 25 ऑगस्टपासून सुरू होणारी चर्चा भारताने रद्द केली. त्यामुळे नवाझ शरीफ यांच्यापुढील समस्यांमध्ये आणखी भर पडली आहे. प्रसारमाध्यमे जितका बागुलबुवा करत आहेत तितकी नफरत नवाज शरीफ यांच्याविषयी आज तरी पाकिस्तानी जनतेत दिसत नाही, हे वास्तव आहे. इम्रान खान व मौलवी ताहिर-अल-काद्री यांचा उल्लेख पाकिस्तानच्या राजकीय अवकाशातील अशनी, असा केला जातो. त्यांनी पाकिस्तानच्या राजकीय भूमीवर जोरदार टक्कर देऊन आपले मोठे राजकीय नुकसान होऊ नये, यासाठी नवाझ शरीफ काही डावपेच लढवत आहेत. दुस-या बाजूस पाकिस्तानचे भारताशी संबंध आणखी ताणले जाऊ नयेत, म्हणून शरीफ यांना सतर्कही राहावे लागणार आहे. नवाझ शरीफ यांच्यापुढील ही आव्हाने खचितच सोपी नाहीत.

No comments:

Post a Comment