Saturday, August 16, 2014

भाभांचे कलासमृद्ध अवकाश! - वृंदावन दंडवते - शब्दांकन - समीर परांजपे - दै. दिव्य मराठी १७ अाॅगस्ट २०१४. रसिक पुरवणी


मी शब्दांकन केलेला वृंदावन दंडवते यांचा लेख अाज दै. दिव्य मराठीच्या १७ अाॅगस्ट २०१४च्या रसिक पुरवणीत प्रसिद्ध झाला अाहे. त्या लेखाच्या दोन लिंक्स व जेपीजी फाईल. वृंदावन दंडवते हे ज्येष्ठ साहित्यिक व एनसीपीए या संस्थेचे माजी असिस्टंट डायरेक्टर (प्रोग्रॅम) असून एनसीपीएचे प्रवर्तक जमशेद भाभा यांच्या २१ अाॅगस्ट रोजी असलेल्या जन्मशताब्दी दिनानिमित्त त्यांनी हा लेख लिहिला अाहे. वृंदावन दंडवते हे विख्यात चित्रकार, साहित्यिकही असून त्यांनी तीन पुस्तके प्रकाशित झाली अाहेत. माजी केंद्रीय मंत्री मधु दंडवते यांचे ते कनिष्ठ बंधू अाहेत.
http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-article-of-vrindavan-jogdand-about-jamshed-bhabha-divya-marathi-rasik-4715072-NOR.html
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/magazine/rasik/244/17082014/0/2/
------

स्मरणगाथा : भाभांचे कलासमृद्ध अवकाश!
- ------------
वृंदावन दंडवते | Aug 17, 2014, 05:00AM IST
---
भारतातील विविध भाषांतील नाटके, भारतीय नृत्य, संगीत, चित्रकला यांचे कार्यक्रम एनसीपीएमध्ये करण्याबरोबरच पु. ल. देशपांडे यांनी आपल्या कारकीर्दीत मराठी मनाची नाळ एनसीपीएशी जुळावी म्हणूनही खास प्रयत्न केले...
जमशेद भाभा. भारताच्या अणुकार्यक्रमाचे जनक डॉ. होमी भाभा यांचे हे धाकटे बंधू. पण जमशेद भाभा यांची याहून रेखीव व ठळक ओळख आहे ती म्हणजे, मुंबईतील नॅशनल सेंटर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए) या राष्ट्रीय स्तरावरील ख्यातकीर्त संस्थेचे प्रवर्तक म्हणून. टाटा उद्योगसमूहाच्या विविध कंपन्यांमध्ये महत्त्वाची पदे भूषवत असतानाच समूहाच्या माध्यमातून समाजात कलात्मकतेचा, सामाजिक जबाबदारीचा दृष्टिकोनही जपला जावा, यासाठी जमशेद भाभा कमालीचे आग्रही होते. त्यांच्या या मताला जे. आर. डी. टाटा यांचा संपूर्ण पाठिंबा व सहकार्य होते. त्यातूनच एनसीपीए या संस्थेची कल्पना सत्यात उतरली.
जमशेद भाभा हे स्वत: उत्तम चित्रकार होते. भारतीय तसेच पाश्चात्त्य कलांचे भोक्ते होते. भारताच्या प्राचीन, अर्वाचीन, आधुनिक नृत्य, नाटक, संगीत आदी कलांचे योग्य प्रकारे जतन, संवर्धन, सादरीकरण लोकांसमोर झाले पाहिजे, या विचाराने त्यांना झपाटलेले होते. 1969चा तो काळ होता. ऑल इंडिया रेडिओचे तत्कालीन डायरेक्टर जनरल डॉ. नारायण मेनन यांना भाभांनी आग्रहाने बोलावून एनसीपीएच्या संचालकपदी नियुक्त केले होते. त्याशिवाय एनसीपीएच्या सल्लागार मंडळावर पु. ल. देशपांडे, विजया मेहता, डॉ. कुमुद मेहता, सत्यजित रे, रविशंकर यांच्यासारख्या कलाक्षेत्रातील एकाहून एक दिग्गजांना आमंत्रित केले होते. मुंबईतील वॉर्डन रोड येथील भुलाभाई देसाई मेमोरियलची वास्तू पाडून तिथे ‘कांचनजुंगा’ इमारत उभी राहिली होती. त्याच इमारतीत ‘एनसीपीए’ ही संस्था बाळसे धरू लागली. कांचनजुंगाच्या दुसर्‍या मजल्यावर सुमारे सव्वाशे माणसांची आसनव्यवस्था असलेले मिनीऑडिटोरियम होते. तेथे गायन, नृत्य, नाटके असे कार्यक्रम होऊ लागले. कांचनजुंगा इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील जागेत ‘रंगायन’ या संस्थेच्या नाटकांची तालीम होत असे. ‘रंगायन’मध्ये मी सक्रिय असल्याने ओघाने अगदी सुरुवातीपासून ‘एनसीपीए’च्या वाटचालीचा साक्षीदार होण्याचे भाग्य मला लाभले. फिल्म अर्काइव्हजच्या सहकार्याने ‘एनसीपीए’ संस्थेने फिल्म सोसायटी सुरू केली होती. परंतु गायन, नृत्य, नाटके या परफॉर्मिंग आटर््सचे माहेरघर बनलेल्या एनसीपीएला आता स्वत:च्या भव्य वास्तूचे वेध लागलेले होते.
1972मधली ही गोष्ट आहे. सरकारने मुंबईतील नरिमन पॉइंट येथे एनसीपीएला सात एकरांचा भूखंड द्यायचा निर्णय घेतला. त्यानंतर एनसीपीएने समुद्रात स्वखर्चाने भराव टाकून त्यातून निर्माण झालेला सरकारमान्य भूखंड संपादित केला. या भूखंडावर एनसीपीएने सर्वात प्रथम एक मिनीथिएटर बांधले. ‘कांचनजुंगा’ येथे जे कलाविषयक कार्यक्रम होत असत, ते आता एनसीपीएच्या मालकीच्या स्वत:च्या जागेत होऊ लागले. या मिनीथिएटरनंतर एनसीपीएच्या प्रांगणात टाटा थिएटर उभारणीस सुरुवात झाली. अमेरिकेतील जगद्विख्यात वास्तुविशारद फिलिप जॉन्सन यांनी टाटा थिएटरचा आराखडा बनविला होता. या थिएटरचे अ‍ॅकॉस्टिक डिझाइन सिरिल हॅरिस या अमेरिकी तज्ज्ञाने केले होते. टाटा थिएटरची रचना खूपच वेधक होती. अर्धवर्तुळाकार असलेल्या या सभागृहामध्ये पडदा नव्हता. तसेच प्रेक्षकांसाठी कमळाकृती आसनव्यवस्था होती. टाटा थिएटरच्या उद्घाटन समारंभाला मोगुबाई कुर्डीकरांचे गाणे रंगले होते.
1980 मध्ये मी एनसीपीएमध्ये कार्यक्रम अधिकारी (प्रोग्रॅम ऑफिसर) म्हणून रुजू झालो. या संस्थेतर्फे ‘एनसीपीए जर्नल’ हे कलाविश्वातील घडामोडींना वाहिलेले नियतकालिक प्रसिद्ध केले जात असे. डॉ. कुमुद मेहता या नियतकालिकाच्या संपादक होत्या. मी स्वत: गाणे शिकत होतो, चित्रकार होतो, नाटकांमध्ये सक्रिय होतो. हे माहीत असल्याने कुमुद मेहता यांनी मला एनसीपीएमध्ये कार्यक्रम अधिकारी होण्याबद्दल सुचविले होते. या पदासाठी माझी मुलाखत साक्षात जमशेद भाभा यांनीच घेतली होती. एनसीपीएतील 1980 ते 1996 पर्यंतच्या माझ्या सेवाकाळात पु. ल. देशपांडे, डॉ. विजया मेहता यांनी संस्थेचे कार्यकारी संचालक म्हणून केलेले कार्य मला खूप जवळून पाहता आले. कालांतराने मी एनसीपीएतून असिस्टंट डायरेक्टर (प्रोग्रॅम) या पदावरून सेवानिवृत्त झालो. एनसीपीएमध्ये होणार्‍या कार्यक्रमांचा समाजातल्या सर्व स्तरांतील कलासक्त लोकांना आस्वाद घेता आला पाहिजे, यावर जमशेद भाभा यांचा प्रारंभापासून कटाक्ष होता. संचालक डॉ. नारायण मेननही त्याच मताचे होते. भारतातील विविध भाषांतील नाटके, भारतीय नृत्य, संगीत, चित्रकला यांचे कार्यक्रम एनसीपीएमध्ये करण्याबरोबरच पु. ल. देशपांडे यांनी आपल्या कारकीर्दीत मराठी मनाची नाळ एनसीपीएशी जुळावी म्हणूनही खास प्रयत्न केले. लावणीपासून ते मराठी काव्यवाचन, देवगाणी कार्यक्रम, नाट्यसंगीत, मराठी नाटकांचे प्रयोग आवर्जून संस्थेत सादर होऊ लागले. पुढे डॉ. विजया मेहता या कार्यकारी संचालक असताना ही परंपरा तितक्याच समर्थपणे सुरू राहिली. संगीताच्या कार्यक्रमांना डॉ. अशोक रानडे यांच्या अमूल्य संशोधनाचा स्पर्श झालेला होता. त्या काळी आम्ही दर महिन्यात होणार्‍या विविध कार्यक्रमांची पत्रिका तयार करीत असू. ही पत्रिका जमशेद भाभा नेहमी डोळ्याखालून घालत. त्यातील कार्यक्रमांविषयी संबंधित पदाधिकार्‍यांशी चर्चा करीत. कार्यक्रमात त्यांना काही बदल हवे असतील, तर तशा सूचनाही करीत. पाश्चात्त्य व पौर्वात्य कलाप्रकारांचा आस्वाद एनसीपीएच्या माध्यमातून कलारसिकांना घेता यावा, म्हणून जमशेद भाभा यांनी ‘ईस्ट-वेस्ट एन्काउंटर’ ही संकल्पना मॅक्समुल्लर भवनच्या सहकार्याने सलग चार वर्षे राबविली. जमशेद भाभा यांना पाश्चिमात्य संगीतातही रुची होती. त्यामुळे इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स या संस्थेच्या माध्यमातून देशोदेशीचे उत्तम गायक, वादक हे आपली कला सादर करण्यासाठी एनसीपीएमध्ये आवर्जून येत असत. जमशेद भाभा सुमारे पाच वर्षे संगीत नाटक कला अकादमीचे अध्यक्षही होते. कलाविषयक कार्यक्रमांच्या सादरीकरणाबरोबरच जतनाकडेही जमशेद भाभा यांचे विशेष लक्ष होते. त्याचसाठी त्यांनी परफॉर्मिंग आर्ट्सचे खास ग्रंथालय एनसीपीएमध्ये स्थापन केले. या ग्रंथालयात अनेक गायक, वादकांची ध्वनिमुद्रणे तसेच व्हिडिओ चित्रफिती संग्रह करून ठेवलेल्या आहेत. देश-विदेशातील कलांचा संगम भारतात व्हावा, असे स्वप्न घेऊन जगणारे जमशेद भाभा 30 मे 2007 रोजी कालवश झाले. एक समृद्ध सांस्कृतिक वारसा मागे ठेवून एका कलाध्यायाची समाप्ती झाली...
शब्दांकन : समीर परांजपे
ashavrinda@gmail.com

No comments:

Post a Comment