Friday, April 24, 2015

जसं दिसलं तसं! - मला विविध क्षेत्रांत आलेल्या छोट्या छोट्या अनुभवांचे हे संकलन.


जसं दिसलं तसं! ( मला विविध क्षेत्रांत आलेल्या छोट्या छोट्या अनुभवांचे हे संकलन.)
---
- समीर परांजपे
---
तो तरुण, यशस्वी बिल्डर व समान बिंदू
-----
लहानपणीचे संदर्भ मोठेपणी अचानक भेटले की थोरच वाटते.
दादरला ज्या चाळीत लहानपण गेले तिथे पहिल्या मजल्यावर ११ कुटुंबे राहायची.
आमच्या खोलीच्या तीन खोल्या पुढे टाकून एक कुटुंब राहायचे. ते देशावरचे होते.
त्यांच्याकडे देशावरील एका गावाहून एक युवक राहायला आला होता.
तीन ते चार वर्षेच होता तो.
तो रोज सकाळी ८ ला बाहेर पडायचा. ते रात्री १० ला परतायचा.
ज्यांच्याकडे राहायचा त्यांच्याकडे जेवल्यानंतर आपला बाडबिस्तरा घेऊन चाळीतील पहिल्या मजल्यावरच्या लांबरुंद कॉमन व्हरांड्यातच रात्री झोपायचा. पुन्हा सकाळी त्याचा दिनक्रम सुरु व्हायचा.
त्यावेळी लहानगा मी आणि तो युवक यांची गट्टी जमली होती. त्यावेळी कारण कळत नव्हते. पण त्या गट्टीमध्ये विलक्षण आत्मीयता त्याच्याकडे होती हे नंतरही जाणवत राहिले.
तीन-चार वर्षांनी तो आमच्या चाळीतून दुसरीकडे राहायला गेला. त्याची फारशी माहिती त्यानंतर कधीच मिळाली नाही.
त्यानंतर आम्हीही दादर सोडले. तरीही तो युवक माझ्या लक्षात राहिला होता.
मध्ये अनेक वर्षे गेली.
मीही शिक्षण आटपून, करिअरचे टप्पे ओलांडत दैनिक लोकसत्तामध्ये पत्रकार म्हणून रुजू झालो होतो.लोकसत्ताच्या लालबाग कार्यालयात त्यावेळचे संपादक कुमार केतकर यांच्या केबिनमध्ये एक दिवशी मी माझ्या पानावरील बातमीसंदर्भात काही कामासाठी गेलो असताना त्यांच्याकडे कोणी पन्नाशीचे गृहस्थ बसले होते.
केतकर मला म्हणाले की, बस तू ही....
आणि त्या गृहस्थांची ओळख करुन दिली की, हे महाराष्ट्रातील नामवंत बिल्डर, डेव्हलपर रामचंद्र दिघे (या गृहस्थांचे मी इथे मुळ नाव दिलेले नाही). मी ही त्या व्यक्तीशी औपचारिक ओळख करुन घेतली.
माझे केतकरांकडील काम संपल्यानंतर केबिन बाहेर आलो. पण रामचंद्र दिघे यांचा चेहरा काही नजरेसमोरुन हलेना...
यांना आपण पाहिलेय कुठेतरी....
मी खूप आठवू लागलो....आणि आठवले...
मी पुन्हा केतकरांच्या केबिनमध्ये गेलो...
रामचंद्र दिघे तिथे बसलेच होते. मी संपादकांची परवानगी घेऊन दिघेंना नम्रपणे विचारले की, तुम्ही पूर्वी कधी दादरच्या अमुकअमुक चाळीत तीन-चार वर्षे राहायला होतात का? तिथे तुम्ही व्हरांड्यात बाहेर रात्री झोपत होतात. खूप कष्ट केले होतेत..
दिघे माझ्याकडे बघतच राहिले. ते म्हणाले तुला हे कसे माहिती?
म्हटले तुम्ही त्या चाळीत ज्या लहान मुलाचे खूप लाड करायचात तोच मी समीर...
दिघे केतकरांच्या समोरच बसले होते. ते तडक उठले आणि त्यांनी मला अतिशय जिव्हाळ्याने शेकहँड केला.
आणि संपादकांना म्हणाले, सर माझे खरे संघर्षाचे दिवस पाहाणारा माणूस जर इथे आत्ता कोणी असेल तर तो समीरच आहे...
दिघेंनी मग विचारले की, तुझी अमुकअमुक नातेवाईक रमा (lतिचेही मुळ नाव इथे दिलेले नाही) ती काय करते आता ...
मी म्हटले, रमाचे लग्न होऊनही आता वीस वर्षे झाली. अमेरिकेत असते. सुखात आहे.
ते छानसे हसले.
मग चाळीतल्या त्या दिवसांची सर्व आठवण काढून आम्ही एकमेकांचा निरोप घेतला.
हा सगळा अचानक प्रसंग मी रात्री घरी गेल्यावर आईला सांगितला.
तर ती म्हणाली अरे वा रामचंद्र तुला भेटला हे छानच की.
मी म्हटले रमाचीही आठवण काढली.
तेव्हा आई खुदकन हसली, अरे वेड्या तो रमाच्या प्रेमात होता. पण त्यावेळी ती त्याला नाही म्हणाली. पण पहिले प्रेम माणूस विसरत नाही. रामचंद्र त्याला अपवाद कशाला असेल...म्हणून त्याने हळुच तुझ्याकडे तिची चौकशी केली. त्यात एक निर्मळपणा होता...
ओहहह. म्हणजे रमाचा नातेवाईक म्हणून माझे रामचंद्र खूप लाड करायचे तर पूर्वी....असे गंमतीने वाटून गेले. तसे मी रामचंद्रना एकदा म्हणताच त्यांनी माझ्या पाठीत हलकेच एक गुद्दा मारला होता आणि मीही कळवळल्याचे नाटक केले होते.
मग वेळोवेळी रामचंद्र विविध कारणांनी लोकसत्ता कार्यालय, विविध सभासमारंभात भेटत राहिले...आणि मग थोड्या गप्पा होत राहिल्या...निघण्याच्या वेळेस मी व रमा बरे आहोत हे सांगायला मी विसरत नाही अजुनही...त्यावर रामचंद्रही गालातल्या गालात हसतात. मला बेरक्या म्हणतात...दस्तुरखुद्द रमालाही मी सांगितले एकदा तरी तीही तशीच गालात हसली.
आयु्ष्य रिंगणासारखे असते. ते गोलगोल फिरवत एका समान बिंदुला आणून सोडते.
रामचंद्र, रमा, मी, ती चाळ हे असेच समान बिंदु आहेत. ज्यांची आठवण आम्हाला समान प्रतलावर आणून सोडते.
---
हरपलेल्या वडिलांचे गवसलेले छायाचित्र
-------
मी नववीत असताना माझे वडिल वारले. त्यांचा चेहरा स्मरतो पण आठवणी फारशा नाहीत. कारण आईवडील दोघेही नोकरी करीत असल्याने त्यांनी प्रतिपाळासाठी मला आजीकडे ठेवले होते. ते दर शुक्रवारी रात्री मला घेऊन त्यांच्याकडे जायचे. पुन्हा सोमवारी सकाळी वडिल शाळेत आणून पोहोचवायचे. मग शुक्रवारपर्यंत मी पुन्हा आजीकडेच असायचो...
वडिलांचे छायाचित्र घरात असल्याने ते तसे नेहमी डोळ्यासमोर असतात. ते छायाचित्रही आहे त्यांचे वय ४३ असतानाचे. ते गेले तेव्हा त्यांचे वय ४७ होते.
वडिलांचे विशीतले वगैरे छायाचित्र वगैरे पाहाण्याचा योग मलाच काय आईलाही आला नव्हता.
माझा प्रेमविवाह झाला. पत्नीची आत्या एका मोठ्या कंपनीच्या मालकवर्गापैकी. योगायोग म्हणजे ती ज्या कंपनीची मालकीण होती, त्याच कंपनीत माझे वडिल पूर्वी साधे कामगार म्हणून कामाला होते. पूर्वी वडिलांबरोबर त्यांच्या कंपनीत सत्यनारायणाच्या पूजेला गेल्याचे स्मरत होते. पण ते गेल्यानंतर त्या कंपनीशी संपर्क तुटला होता. तो आता जावई म्हणून पुन्हा कंपनीच्या संचालकांशीच प्रस्थापित झाला. तेथे त्यांच्याकडे जाणे-येणे वाढले.
काळ आपल्या गतीने पुन्हा पुन्हा आपल्याला भेटत असतो. एकदा असेच पत्नीच्या आत्याच्या घरी गप्पा मारत बसलेलो असताना, तिच्या पुस्तकांच्या कपाटात तिच्या कंपनीच्या काही जुन्या स्मरणिका दिसल्या.
त्या चाळत असताना त्यातील मजकुराबरोबरच कंपनीच्या जुन्या छायाचित्रांवरही माझी नजर फिरु लागली. कंपनीच्या प्लांटस् चे जुने फोटो, तेथील १९६०-७०च्या दशकापासूनच्या कर्मचाऱ्यांचे ग्रुप फोटो असे बरेच काही त्या स्मरणिकांमध्ये होते.
छायाचित्रे पाहाता पाहाता एका छायाचित्रावर माझी नजर गेली व खिळलीच...
ते छायाचित्र होते १९७०मध्ये विशीत असलेल्या त्या कंपनीच्या काही कामगारांचे. त्या कामगारांचे चेहरे न्याहाळू लागलो आणि डोळे विस्फारले...त्या कामगारांमध्ये माझ्या वडिलांचे त्यांच्या वयाच्या विशीतील छायाचित्र होते. त्या वयातल्या त्यांचा फोटो बघून मी आनंदाने चित्कारलोच...पत्नीच्या आत्याची परवानगी घेऊन ती स्मरणिका काही दिवसांसाठी घरी आणली.
आणि आईसमोर गेलो...
तिला म्हटले की, एक सरप्राईज आणले आहे तुझ्यासाठी...
तिला डोळे मिटायला सांगितले क्षणभर.
तिने डोळे उघडल्यावर ते वडिलांचे आमच्यासाठी तरी दुर्मिळ असलेले छायाचित्र आईला दाखविले.
तिलाही विश्वास बसेना...एकदा...दोनदा...तीनदा...तिने ते बारकाईने बघितले...
नकळत तिच्या तोंडातून उद्गार आले....माझा सुधाकर...
माझ्या वडिलांचे नाव सुधाकर...आई कधीकधी त्यांना प्रेमाने नुसते नावाने हाक मारी.
मग तिची ती सवयच होऊन गेली.
ते छायाचित्र बघून तिच्या व माझ्या डोळ्यांत अखंड पाणी होते...
विशीतले वडिल जे आम्ही बघितले नव्हते त्यांचे छायाचित्र काही क्षण पुन्हा धुसर झाले होते डोळ्यासमोर...
तिने ती स्मरणिका बघितली. अनेकदा बघितली. आणि म्हणाली...या स्मरणिकेतील सुधाकरचे छायाचित्र असलेले पान स्कॅन करुन आपण नको सोबत ठेवूया...
मी विशीतला सुधाकर नाही बघितला पण तिशी, चाळीशीतील सुधाकरच मला जास्त प्रिय आहे...तोच माझ्या आठवणीत राहूदे...
मी ती स्मरणिका दुसऱ्या दिवशी पत्नीच्या आत्याकडे पाठवून दिली....
माझे वडिल त्यांच्या विशीत कसे दिसायचे ते आम्हाला गवसले होते. पण जे तिशी-चाळीशीतले माहित होते तेच आम्हाला अधिक प्रिय वाटले....त्यांचे विशीतील ते छायाचित्र मी पुन्हा पत्नीच्या आत्याच्या घरी अनेकदा जाऊनही पाहिले नाही...कारण....कारण तुम्हाला वर सांगितलेच आहे.
---
सुरांचा उंबरठा ओलांडताना....
-----
दादर पूर्वेला रस्त्यावर एका अंध व्यक्तीचे सुरेल बासरीवादन ऐकण्यात एक तास कसा निघून गेला हे कळलेच नाही. हे नेहमीचेच झाले आहे. मी जेव्हा त्या बासरीवाल्याच्या जवळून जातो त्यावेळी मला भारुन गेल्यासारखे होते. त्याचे सूर हे कानाला आणि मनाला अवीट गोडीची चव देतात. त्या सूरांत रस असतो, नाद असतो, लय असते आणि विलयाची आसक्तीही....मी त्या अंध व्यक्तीला विचारले की, तुम्ही इथे रस्त्यावर बासरी का वाजवत बसता? त्यांनी दिलेले उत्तर थोर होते. ते म्हणाले की, मी राहातो इथे जवळच एका झोपडीत. लहान आहे ती त्यात माझे सूर मावत नाहीत. मग येतो उघड्यावर. साद घालतो सूरांना. बासरी वाजवतो ती भीक मागून पैसे मिळविण्यासाठी नव्हे. हे असे न करता देखील माझे बरे चाललेय. मला व बासरीला निवांत वेळ हवा असतो. तो मिळतो या ऐसपैस रस्त्याच्या कडेला. यावर मला काही बोलावे सुचले नाही. मी त्यांना एकेक फर्माईश करत गेलो. ते वाजवत राहिले. रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा या अभंगात हरिप्रसाद चौरसियांनी भुंग्याच्या भ्रमणाची चाहूल देणारी बासरीची सुरावट जशी छेडली आहे तसा मी या बासरीवादकाच्या सुरांनी लपेटला गेलो. मला या अंध बासरीवादकाचे नाव-गाव काहीही माहित नाही. पण त्यांच्या शेजारी रस्त्यावर बसून ती सुरावट ऐकणे यात कमीपणाही वाटला नाही. कृष्णाची बासरी कोणी बघितलीय पण बासरीचा कन्हैया मी जरुर बघितलाय तो म्हणजे ही अंध व्यक्ती. जिला प्रणिपात करुनच मी सुरांचा उंबरठा ओलांडतो.
---
ते पाय...
----
कितीतरी दिवसांनी मी माझ्या मैत्रिणीला भेटलो.
दादरमधील एका उपहारगृहात ती दुपारच्या वेळेस वाट बघत थांबली होती.
मला कामामुळे जरा उशीर झाला तसे कळवले होते आधी.
म्हणाली, काहीही ताण घेऊन नको. ये तुझ्या सोयीने.
मी तिथे पोहोचलो.
ती एका खूर्चीत शांतपणे बसले होती.
मला वाटते तब्बल २३ वर्षानंतर
आम्ही भेटलो होतो.
एकमेकांची विचारपूस झाली.
ती आयटी कंपनीत फारच मोठ्या पदावर आहे.
त्या क्षेत्राचे अनुभव सांगण्यात रंगून गेली.
मी ही आमच्या कामाचे काही अनुभव सांगितले.
मनमोकळ्या गप्पा झाल्या.
परत भेटूया असे एकमेकांना सांगून झाले.
आता मी खूर्चीवरुन उठलो.
ती पण उठायची वाट बघू लागलो.
तर ती खूर्चीवरुन बसल्या बसल्या डावीकडे वळली.
तिथे दोन कुबड्या ठेवलेल्या होत्या.
त्या आधाराला घेऊन उभी राहिली.
मला जोरदार धक्का.
तिला मी पाहिले होते ते राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील यशस्वी धावपटू म्हणून.
आणि आता हे एकदम असे चित्र समोर आले.
माझ्या चेहेर्यावरील प्रश्नचिन्ह पाहून ती म्हणाली.
गेल्या तीन वर्षांपूर्वी तिला अमेरिकेत जोरदार मोटार अपघात झाला.
एक पाय कापावा लागला म्हणून कुबड्यांचा आधार आला...
मी हळहळलो. मला काहीच माहित नव्हते.
जे पाय प्रचंड वेगाने धावत यश आणत होते कधीकाळी
त्यांना आता मंदगतीने यशाकडे जावे लागतेय...
माझ्या मनातले विचार कदाचित ओळखून ती म्हणाली.
समीर, वाईट नको वाटून घेऊस. मी मनाने अभंग आहे हेच मोलाचे आहे.
मी तिच्या धीरोदात्ततेला सलाम करुन तेथून निघालो....
तीची टॅक्सी लांबवर जाईस्तोवर तिचे परिवर्तन डोळ्यासमोर आणत राहिलो.
---
खासगी आयुष्य उरलेले नाही...
---
एकाच दिवसातल्या या घटना...
वांद्रे पूर्वला रेल्वे स्टेशनातील तिकिट काऊंटरजवळ मित्राची वाट बघत सकाळी उभा होतो. तेवढ्यात एक परिचित भेटले. म्हणाले की, काय, मातोश्रीहून आलास वाटते...सध्या राजकीय हालचाली वेगवान आहेत...साहेब काय म्हणाले.....मी म्हटले, अहो आज सुट्टी आहे. मित्राची वाट बघतोय म्हणून इथे थांबलोय...ते म्हणाले, बस्स काय राव, तुला नसेल सांगायचे तर ठीक आहे....
त्यानंतर माझा मित्र भेटला आणि आम्ही दोघे पुस्तक बदलण्याकरिता दादरच्या एका ग्रंथालयात गेलो. तेथे ग्रंथालयाचे विश्वस्त भेटले...काय, आज राजसाहेंबांची सभा आहे, तुम्ही कव्हरेजला जाणारच असाल....मी म्हटले, अहो नाही. आज सुट्टी आहे. माझी वैयक्तिक कामे आटपतोय...विश्वस्त म्हणाले, काय सांगताय...तुम्हाला तर मागे एका सभेत बघितले होते त्यांच्या...राजसाहेब काय बोलतात त्यावर पुन्हा याल तेव्हा चर्चा करु...मी हो म्हटले आणि सटकलो...
तिथून जवळच असलेल्या शिवाजी मंदिर नाट्यगृहात आयत्या वेळी नाटक बघायला म्हणून शिरलो. तर नाटक हाऊसफुल्ल. तिकिट काऊंटरवरुन निराश होऊन परतत असतानाच नाटकाचे निर्माते समोर आले अचानक. म्हणाले की, अरे समीर, आधी माहित असते तर तुला पास दिला असता. मी जरा घुश्शातच म्हटले की, तो पास तुमच्याकडे जे बाकीचे लोक मागायला येतात त्यांना द्या. मी कोणत्याही नाटकाला, चित्रपटाला स्वत:चे तिकिट काढूनच जातो. तर तो निर्माता हसला. म्हणाला, तुझी ही सवय मला माहित आहे. पण मी अशीच गंमत केली. तो नाटक हाऊसफुल्ल असल्याने संतुष्ट होता. आम्हीही बाहेर असेच रिकामे भेटलो मग तो निर्माता नरेंद्र मोदी हा विषय काढून बसला. तिथे पंधरा मिनिटे फुकट घालविल्यानंतर मग मी व माझा मित्र रुईया नाक्यावर गेलो. तिथे काँग्रेस, शिवसेना, मनसे अशा पक्षांत असलेले अनेक मित्र आहेत. ते एकत्र आले की धुवांधार राजकीय चर्चा सुरु होते. नेमका मी पोहोचायला, ते तिथे असायला आणि ती चर्चाही सुरु असायला एकच गाठ पडली. मी चर्चेत अजिबात सहभागी न होता हो ला हो करत राहिलो. तेवढ्यात त्यातले दोघे-तिघे म्हणाले, की आमचे पक्ष वेगळे पण तक्रार एकच मिडिया खूप पक्षपातीपणे आमच्या बातम्या देते. आम्हाला सारखे झोडपते. तू मिडियावाला ना बोल ना आता यावर...मी सुट्टी असल्याने आज कशातच गुंतायचे नाही असे ठरविले होते. मी गप्प राहिलो. त्यावर त्या मित्रांनी बोलायची संधी न देता निष्कर्ष असा काढला की, बघा आता मिडियाच्या अंगाशी यायला लागल्यावर पत्रकार कसा गप्प बसतो बघा. मी रुईया नाक्यावरुन निघालो मित्रासह. दादरला तो पलीकडे गेला आणि मी लोकल ट्रेनमध्ये बसून घरी जायला निघालो. म्हटले की, आज ग्रंथालयातून जे पुस्तक घेतलेय ते एका तासाच्या प्रवासात जेवढे जमेल तेवढे वाचून काढू. मग सॅकमधून पुस्तक काढून डोळ्यासमोर धरणार तेवढ्यात पुढच्या रेल्वे स्थानकावर दुसर्या वर्तमानपत्रातले काही ओळखीचे पत्रकार मित्र आमच्या डब्यात शिरले व समोरच येऊन बसले.. चार पत्रकार भेटले की इतरांच्या कार्यालयात काय चालले आहे याचा गप्पा चवीने होतात. मला अशा गप्पांत कधीच रस नसल्याने मी गप्पच राहिलो. तेवढ्यात त्यातला एकजण म्हणालाच की, तु आज होतास कुठे? किती वेगवान घडामोडी घडल्या आज राजकीय. म्हटले अरे मी सुट्टीवर आहे...त्यावर तो म्हणाला की, पत्रकाराने सतत बातमी शोघली पाहिजे. मी काहीही बोललो नाही.
घरी आलो तर आई म्हणाली की, अमुक अमुक चॅनेलने अशी वाईट बातमी काय दाखविली. वस्तुस्थिती तर अशी आहे...मी म्हटले मी आज एकही चॅनेल बघितलेला नाही..त्यावर ती म्हणाली, पत्रकार ना तू मग अस कसे केलेस,.....त्यावर मी एकदम गप्प. जेवून झोपण्याआधी बायको म्हणाली, मुलीला निबंध लिहायचा आहे...ती म्हणाली पप्पा पत्रकार आहेत त्यांच्याकडूनच मी समजून घेईन. तिला काही मुद्दे सांग....मग मुलीला मिनीलेखच सांगितला मुद्दे म्हणून....
थोडक्यात काय पत्रकाराने चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस आपला व्यवसाय खांद्यावर घेऊन फिरावा असेच जनमानस आहे. आम्हालाही निसर्ग, समुद्र, किल्ले अशा अनेक ठिकाणी फिरावेसे वाटते. कधी कुटुंबाबरोबर कधी एकटे...किंवा मित्रांबरोबर..नाटक, चित्रपटाला जावेसे वाटते, नाहीतर गेलाबाजार नाक्यावर उभे राहून टवाळक्या करायचीही इच्छा होते....यामागे हेतू हाच असतो की रोजच्या व्यावसायिक कामाचा ताण घालवणे...एक दिवस तरी व्यावसायिक गोष्टींपासून लांब किंवा अलिप्त राहाणे पण ते नशिबात नाही. .एखादा सरकारी कारकून असेल तर त्याचे बरे असते. त्याच्या पाठी त्याचा व्यवसाय सारखा चिकटलेला नसतो. आमचे मात्र तसे होत नाही. कोणत्याही ठिकाणी जा एकतरी ओळखीचा व्यक्ती भेटतो आणि मी तिथे जणू बातमीच्या शोधात आलोय अशाच थाटात संभाषण सुरु करतो....थोडक्यात खासगी आयुष्य काही उरलेले नाही. सार्वजनिक धुणी धुत असल्यामुळे आमचेही सगळे सार्वजनिकच झालेय...आयुष्यातले खासगीपण हरवलेय......
---
काल, आज, उद्या
-------------------------------
एक दिवस सकाळी बोरिवलीतील वझिरा नाका येथील गणेश मंदिराच्या जवळून जात असताना एक आजोबा भेटले. अमेरिकेतील नासा या अवकाश संशोधन संस्थेत खूप मोठ्या पदावर काम करुन ते नुकतेच निवृत्त होऊन भारतात परतले आहेत. ते मला तिकडच्या गोष्टी सांगत होते. ते सांगतानाच आपला भारतही अवकाश संशोधनात कुठेही मागे नाही हेही ते आवर्जून सांगत होते. मग मी त्यांना का विचारले की तुम्ही देशातील अनेक संधी सोडून नासाला का गेलात?
त्यावर त्यांचे उत्तर असे होते.
त म्हणाले की, मी नासाला जाणार म्हणजे मला अधिक पैसे मिळणार हे उघडच होते. मात्र भारतात माझ्या गुणवत्तेची हवी तशी कदर होत नव्हती म्हणून मी त्या गुणवत्तेला योग्य न्याय मिळावा या झपाटलेपणातूनच देशांतर केले. पण पुन्हा मीभारतात आलोय आणि इस्रोच्या एका कामगिरीमध्ये मानद म्हणजे हाँननरी भूमिका बजावतोय...
शेवटी हे आजोबा मार्मिकपणे म्हणाले की,
बाहेरच्या देशात जाऊन मी गुणवत्ता सिद्ध केली म्हणून मी इथे आता मानद झालो.
थोडक्यात काय आपल्या संपर्कात येणार्या कोणत्याही माणसाला तो आज जे आहे त्यावरुन जोखू नका. तो भविष्यात जर अधिक गुणवान म्हणून पुढे आला तर त्याच्या हाताखालीच कदाचित तुम्हाला काम करावे लागेल.
गुढीपाडवा व नवीन वर्षाच्या प्रारंभी आपण हे निश्चित ठरवू शकतो की, जे दिसते त्या पलीकडेही काहीतरी असते. ते ओळखा म्हणजे आपण स्वत:लाही अधिक ओळखायला लागू.
---
ती एक...
---
स्टेशनवर लोकल गाडीची वाट बघत उभा होतो.
वेळ दुपारची. गाडी काही कारणाने उशीराने धावत होती.
माझेही मन त्यामुळे रेल्वे स्थानकावरच रेंगाळू लागले.
पायात जोर असूनही माणूस कधी कधी खूप हळू चालतो जणु काही शरीरानेच त्याला तसा इशारा दिला असावा. तशी काहीशी अवस्था स्थानकावरील प्रवाशांची झाली होती.
तेवढ्यात कोणीतरी हाक मारल्यासारखे वाटले म्हणून मी मान वळविली. तर समोर एक उत्स्फुर्त, सतेज चर्या उभी होती. माझी कॉलेजमधील मैत्रिण. अनेक वर्षांनी भेटत होती. त्यावेळच्याच उत्साहाने बोलायला लागली.
परस्परांची विचारपूस झाली. तेवढ्यात लोकल गाडी आली. ती मी व तिने सोडून दिली. आमच्या गप्पांची गाडी सुरु झाली.
अचानक तिचा मोबाईल फोन घणघणला. ती घाईघाईने बोलली व तितक्याच घाईघाईने निरोप घेऊन नजरेआड झाली. अनेक वर्षांनी भेटलेली ती तशीच पुन्हा गेली.
तिचा फोन नंबर वगैरे काही हाताशी नव्हते. मागायला वेळच नव्हता.
मी ही पुढची लोकल पकडली. घरी गेलो.
या घटनेला झाले चार एक महिने.
पुन्हा तेच रेल्वे स्थानक. तिथे मी व माझा कॉलेजातील मित्र असेच अनेक वर्षांनंंतर ठरवून भेटलो. परस्परांच्या घर-संसाराबद्दल काहीच माहित नव्हते.
आमच्या गप्पा रंगल्या. चार महिन्यांपूर्वी आमची ती मैत्रिण अचानक भेटली होती. त्याला ते सांगितले.
त्यावर तो काहीच बोलला नाही.
त्याला म्हटले तु भेटलास का रे तिला कधी?
त्यावर मंदसे हसला.
मी म्हटले, का हसतोस?
त्यावर तो म्हणाला, आता ती कशी भेटेल? म्हणजे ती कधीच भेटणार नाही.
म्हटले का रे?
त्यावर तो मित्र म्हणाला की, ती गेली आपल्याला सोडून दोन महिन्यांपूर्वी,,,
अरे काय सांगतोस काय? असे म्हणत मी अवाक!
हृदयविकाराच्या अकस्मात झटक्याने गेली ती...तो सांगत होता ` पण ती जाण्याच्या आधी मी भेटलेलो तिला...'
मित्राला मी विचारले म्हणजे किती दिवस आधी रे?
तो म्हणाला, ती जाण्याच्या वेळी मी तिच्यासोबतच होतो...
त्यावर मी म्हटले अरे म्हणजे तू तिच्या संपर्कात होतास खूप तर...
इतकी लाघवी मैत्रिण गेली अकाली खूप पोकळी झाली रे आपल्या आयुष्यात...
तो म्हणाला, माझ्या तर जास्त...
माझा चेहरा प्रश्नार्थक?
मी म्हणालो म्हणजे.....
तो जमिनीकडे पाहात म्हणाला, अरे ती माझी बायको होती...
----
लाइन मारणारा पोरगा, चिठ्ठी आणि लाइनवाल्या पोरीची आजी
------------
मी सातवीत शिकत असतानाची गोष्ट आहे. चाळीत आमच्या मजल्यावर एक कुटुंब राहायचे. त्यांची मुलगी देखणी होती. तिच्यावर आमच्या समोरच्या वाडीतला एक मुलगा लाइन मारत असे. तेव्हा एक दुजे के लिए चित्रपट चांगलाच गाजत होता. त्यामुळे त्या मुलाचा लव्ह फिव्हर खूपच वाढला होता. त्याने त्यातल्या त्यात होतकरु कार्टे निवडले. तो म्हणजे मीच. मला त्याने त्या मुलीला देण्यासाठी एक चिठ्ठी दिली. ती त्याच मुलीला नेऊन दे असे म्हणाला. चाँकलेट वगैरे देतो असे काही म्हणाला नाही. त्याचा राग आला होताच. तो गेल्यावर ती नुसती चिठ्ठी मी व माझ्या मित्राने वाचली. त्यात लिहिले होते, ,,,,...दादर एम्पोरियमच्या गेटवर आज संध्याकाळी पाच वाजता भेट..तुला काही सांगायचे आहे....तुझाच ...या चिठ्ठीत त्या शहाण्याने चिठ्ठी कोणाला व कोणी लिहिली याचे नाव लिहिले नव्हते. मी ती चिठ्ठी घेतली. ती चिठ्ठी मी देखण्या मुलीला दिली असती तर ती बिननावाची चिठ्ठी बघून तिला ती कोणा पोराने पाठविली आहे हे कळले असते. कारण तो लाइन मारणारा पोरगा तिलाही आवडत असे. नाक्यावर उभ्या असलेल्या त्या हिरोला बघायला तीही चाळीच्या गँलरीत येऊन उभी राहात असे हे मला माहित होते. त्यामुळे त्या देखण्या मुलीला ही चिठ्ठी मी देणार नव्हतोच. तिची ६२ वर्षांची आजी घरीच असायची. तिला ती नेऊन दिली. आणि सांगितले की तुझ्या गावाहून एक पोरगा आलेला मगाशी...तू आणि कोणीच तुमच्या घरात नव्हते. म्हणून तो ही चिठ्ठी देऊन गेलाय. म्हातारीने ती चिठ्ठी वाचली आणि संध्याकाळी पाच वाजता दादर एम्पोरियम या साड्यांच्या दुकानाच्या दरवाजाबाहेर जाऊन उभी राहिली. तिथे आमच्या समोरचा लाइनवाला पोरगा ज्याने ती चिठ्ठी दिली होती तो तर पावणे पाच वाजल्यापासूनच जाऊन उभा होता. हे मला अशासाठी माहिती की चाळीतली काही पोरे घेऊन मी सव्वाचारलाच दादर एम्पोरियमच्या एका कडेला मजा बघण्यासाठी जाऊन उभा राहिलो. पाच वाजले, साडेपाच वाजले...सहा वाजत आले....म्हातारीला अपेक्षित असा तिचा तो गाववाला येईना, आणि लाइनवाल्या पोर्याची लाइनपण येईना. दोघेही अस्वस्थ झाले. साधारण सव्वा सहा वाजता दादर एम्पोरियमच्या आडबाजूला उभे असलेले म्हातारी व लाइनवाला पोरगा हे थोडे समोरासमोर आले. त्यावर दोघांनीही तू इथे कुठे वगैरे एकमेकांना विचारले. कातावलेल्या म्हातारीने त्या लाइनवाल्याला ती चिठ्ठी दाखविली. आणि आपल्या न येणार्या गाववाल्याच्या नावाने शिव्या घालू लागली. हा लाइनवाला पोरगा ही अस्वस्थ. त्याला पळताही येईना, रडता किंवा हसताही येईना. एवढ्यात त्याला तिथे एका कोपर्यात मी व बाकीचे मित्र उभे असलेले दिसलो. हा त्या म्हातारीला बाजूला टाकून दातओठ खात आमच्या मागे धावत आला. आम्ही धुम ठोकून आपापल्या घरी गेलो. पुन्हा तो लाइनवाला पोरगा भेटला की मी विचारायचो आहे का अजून चिठ्ठी. आणि म्हातारी दिसली की विचारायचो की भेटला का मग तो गाववाला. त्यानंतर तो लाइनवाला पोरगा व ती म्हातारी जे शंख करायचे ते आठवले की अजूनही पोट दुखेल इतके हसायला येते. लहानपण खरच गमतीदार असते.
--
जग आणि ताप
सोमवारी मध्यरात्री लोकल ट्रेनमधून येताना शेजारच्या पुरुषांच्या फर्स्ट क्लासच्या डब्यात बोरिवली येईपर्यंत चार-पाच प्रवासीच होते. आमच्या सेकंड क्लासच्या डब्यात वीस-बावीस प्रवासी असतील. मी लोकल ट्रेनच्या दरवाजाला खेटून उभा होतो. माझ्या आजूबाजूलाही काही लोक उभे होते.
त्यातील दोघे-तिघे जण माझ्याकडे विचित्र नजरेने बघायला लागले. एकदा ते माझ्याकडे बघत, एकदा ते फर्स्ट क्लासच्या डब्याकडे बघत. त्यांच्या या विचित्र नजरा कळायला मला फार वेळ लागला नाही. त्याचे झाले असे होते की, फर्स्ट क्लास डब्यातून प्रवास करणारा एक पोलिस सब-इन्स्पेक्टर सारखा माझ्याकडे बघत होता. इतका निरखून बघत होता की ते सगळ्यांनाच लक्षात आले होते. एकदा तो त्याच्या डब्यातून माझ्या दिशेने आला, त्याने हाक मारली पण माझे लक्षच नव्हते कारण माझ्या कानात हेड फोन होता व मी समान्था फॉक्सचे नशीले गाणे ऐकत होतो. जसजसे बोरिवली येऊ लागले तसे माझ्या डब्यातील शेजारच्या लोकांची चुळबुळ वाढली. त्यातील एकाने मला जवळ येऊन सांगितले की, तो सबइन्स्पेक्टर तुला हाका मारतोय....
मलाही कळेना हा आहे तरी कोण....
बोरिवली आले....मी प्लॅटफॉर्म नं. १ वर उतरलो. तेव्हा तो सबइन्स्पेक्टरही फर्स्ट क्लास डब्यातून खाली उतरला. आता माझे सारे लक्ष त्याच्याकडेच होते. तो एकदम रुबाबात जवळ अाला.
मला नीट न्याहाळले...
आणि जोरजोरात हसायला सुरुवात करुन म्हणाला....साल्या सम्या....आहेस कुठे....कॉलेज संपल्यानंतर किती वर्षांनी भेटतो आहेस....
माझा कोंडलेला श्वास आता मोकळा झाला. मी काहीच झाले नाही असे दाखवून त्याला त्याच्यासारखेच जोरजोराने हसून दाद दिली.
त्याच्या पाठीवर थाप मारुन म्हटले...अरे जगतापा....तु होय...
मग आम्ही खूप गप्पा मारल्या. जवळजवळ दोन तास...
हा जगताप म्हणजे रणजीत जगताप...
माझ्याबरोबर कॉलेजला वर्गात होता. एकत्रच बी. . झालो आणि गर्दीत पांगलो...ती भेट झाली पुन्हा अनेक वर्षांनी...
अगदी पोलिसी खाक्याने.....जगताप तू धन्य आहेस....
--
वेडात `मराठे' वीर दौडले सात...
-----------------------------------
`म्यानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात.' कुसुमाग्रजांचे हे अजरामर गाणे. नऊ-दहा वर्षांच्या त्या मुलाने दादरला लहानपणी ते शिवजयंतीच्या उत्सवात ऐकले. त्याला ते आवडले. त्याने मनात घोळविले. त्या गाण्याचा वेगळाच अर्थ त्याला गवसला. तो आपल्या आजोळी राहात होता. घरी आल्यावर येता-जाता हे गाणे तो मोठमोठ्याने तो म्हणू लागला. विशेषत: `वेडात मराठे वीर दौडले सात' ही ओळ जास्तच मोठ्याने. घरातल्यांनी पहिल्यांदा कौतुकाने ऐकले. पण सारखी सारखी तीच ओळ ऐकून मग त्याच्याकडे विचारणा केली `काय रे इतकी ही ओळ आवडली तुला?' त्यावर तो निरागसपणे म्हणाला, `हो ही ओळ आपल्या घरातल्यांसाठीच आहे.' इतके म्हणायचा अवकाश की घरातल्यांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. त्याच्या आईने त्याला असा धपाटा दिला की अजूनही ही ओळ म्हणताना त्याला त्या धपाट्याचा धसका जाणवतो. याची तीन कारणे
() त्या मुलाच्या आईच्या माहेरचे आडनाव होते मराठे. आजोबा, आजी व त्यांच्या पाच मुली असा एकुण सात मराठेंचा परिवार.
() आपला नातूच आपल्याला अजाणतेपणी वेडा म्हणतो हे त्यांनी का बरे ऐकून घ्यावे?
() तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नाही मीच होतो...
--
धार आणि निर्धार
---
पुण्यात आज डेक्कन जिमखान्यावर फुटपाथवर विक्रीसाठी मांडलेली पुस्तके बघत असताना एक मुलगी ओळख दाखविण्यासाठी दर्शविताना हसतात तसे हसली. ती कोण हे माझ्या लक्षात येईना म्हणून मीही औपचारिकता म्हणून स्मितहास्य करुन पुन्हा पुस्तकांमध्ये डोके घातले. थोड्या वेळाने ती मुलगी येऊन म्हणाली की तु मला ओळखले नाहीस...मी खूप गंभीरपणे सांगितले की सॉरी पण नाही ओळखले...त्यावर ती म्हणाली अरे आपण लंडनला हिथ्रो एअर पोर्टवर दोन वर्षांपूर्वी भेटलो होतो. एकाच विमानातून सहप्रवासी म्हणून एकत्र आलो होतो. असे म्हटल्यावर माझ्या डोक्यात एकदम उजेड पडला. मुळची ही मराठी मुलगी पण जन्म इंग्लंडमध्ये झालेला ती पुण्यात कशाला येईल, शिवाय खरे सांगायचे तर त्या विमान प्रवासानंतर मी त्यातले बरेचशे तपशील विसरुनही गेलो होतो. तिने त्या आठवणी जागविल्यानंतर मी आधी साँरी म्हटले आणि विचारले की पुण्यात काय करतेस तू....तिने सांगितले ते ऐकून मला धक्काच बसला. अत्यंत उच्चशिक्षीत या मुलीने महाराष्ट्रातील दुर्बल गटांसाठी काम करण्याचे ठरविले असून ती गेली दीड वर्षे राज्याच्या आदिवासी भागांमध्ये खूप चांगले समाजकार्य गाजावाजा न करता करते आहे. मी ते ऐकून शरमलो अशासाठी की ही अक्कल आपण महाराष्ट्रातच राहूनही आपल्याला कधी सुचली नाही यामुळे. ती मुलगी मला म्हणाली की माझे नाव कुठेही येऊ देऊ नकोस, माझ्यावर काही वृत्तपत्रात लिहूही नकोस. मी तिची विनंती मान्य केली. मात्र तिची ध्येयनिष्ठा पाहून मी नक्कीच प्रभावित झालोय व आता तिला कधीच विसरणार नाही कारण तिने आयुष्यभर महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात राहूनच समाजकार्य करण्याचे मनोमन ठरविलेय. अशीही निर्धाराने जगणारी माणसे आजकालही अस्तित्त्वात आहेत तर...................
---
`स्मिता'हास्य लोपले!
प्रख्यात अभिनेत्री व चित्रपट निर्मात्या स्मिता तळवलकर यांचे ५ ऑगस्ट २०१४ रोजी पहाटे मुंबईत निधन झाले. निधनाची बातमी ऐकून मन बेचैन झाले होते. ते भूतकाळात त्यांच्या स्मृतिंमध्ये हरवून गेले. स्मिताताईंच्या तीन आठवणी कायम मनात घर करुन आहेत माझ्या.
() स्मिता तळवलकर या पुण्याच्या हुजुरपागा शाळेच्या माजी विद्यार्थीनी. या शाळेच्या माजी उपमुख्याध्यापिका सुशीलाताई बापट या माझ्या नातेवाईक. त्या १९४०च्या दशकातल्या राष्ट्रीय कबड्डीपटू देखील होत्या. सुशीलाताई यांना अाम्ही एबी मावशी या घरगुती नावाने हाक मारायचो. त्यांना भेटण्यासाठी पुण्यात बापट वाडीतील त्यांच्या घरी मी नेहमी जात असे. ही घटना फार जुनी नाही. २००७ सालातील असेल. असेच एकदा सुशीलाताईंकडे सकाळी गेलो असताना त्या म्हणाल्या, आता माझी एक माजी विद्यार्थीनी येणार आहे. थोड्या वेळाने पाहातो तर साक्षात स्मिता तळवलकर आपल्या शिक्षिकेस भेटण्यासाठी आवर्जून आल्या होत्या. त्या दोघींच्या गप्पा रंगू लागल्या. मी फक्त श्रोत्याचे काम करीत होतो. थोड्या वेळाने सुशीलाताईंनी स्मिता तळवलकर यांच्याशी माझी ओळख करुन दिली. मी स्मिताताईंना पहिल्यांदाच भेटत होतो. त्यावेळी स्मिताताईंनी माझी विचारपूस केली. मी पत्रकार अाहे असे म्हटल्यावर त्या म्हणाल्या तुझे आवडते लेखक कोण? त्यावर मी उत्तरलो, की गो. नी. दांडेकर व त्यांच्या नंतरच्या पिढीतले भालचंद्र नेमाडे. स्मिता तळवलकरांचेही हे दोन्ही लेखक आवडते. तळवलकर यांनी गो. नी. दांडेकर यांच्या विषयी बर्याच आठवणी मला सांगितल्या. त्यांच्या पुस्तकांची वैशिष्ट्येही त्या मला सांगत होत्या. गो. नी. दांडेकर हे प्रभावी किर्तनकारही कसे होते याविषयी स्मिताताईंनी त्यांच्या आईकडून ऐकलेल्या आठवणीही त्यांनी समरसून सांगितल्या. आम्ही साधारण एक तास बोलत होतो. त्यानंतर त्या जायला निघाल्या. चतुरस्त्र स्मिताताईंचे त्यावेळी जवळून दर्शन झाले. सुशीला बापट या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या खास मैत्रिण. लतादिदिंच्या आठवणीही या गप्पांमध्ये सुशीलाताई व स्मिताताईंनी मला सांगितल्या. आमच्या नातेसंबंधातले श्रेष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजाभाऊ परांजपे यांचे पाहिलेले चित्रपट व त्यांच्याशी झालेली भेट याचीही याद स्मिताताईंनी या गप्पांतच आवर्जून सांगितली होती. दिग्गजांच्या सांस्कृतिक जीवनाचा एक नवा पैलू त्यानिमित्ताने मला कळला होता त्यावेळी. स्मिता तळवलकर गेल्या हे वृत्त जेव्हा कानी आले त्यावेळी मी सकाळी प्रख्यात साहित्यिका तसेच गो.नी. दांडेकर यांच्या सुपूत्री तसेच मृणाल देव-कुलकर्णी हिच्या मातोश्री वीणा देव यांना पहिला दूरध्वनी केला व ही बातमी त्यांना कळवली. बापट वाडीतील वर उल्लेखलेल्या गप्पांची आठवण मी वीणाताईंना सांगितली. त्या ही या सर्वांना ओळखत असल्याने त्यांनाही एकदम भरुन आले.
() स्मिता ताईंशी दुसरी भेट झाली ती रुईया महाविद्यालयाने सादर केलेल्या रुईया नाका या कार्यक्रमाच्या निमित्ताने. स्मिता तळवलकर या रुईया महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थीनी. रुईया नाका हा कार्यक्रम दोन वर्षांपूर्वी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेल्या दिग्गज कलाकारांनी सादर केला. त्या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी स्मिता तळवलकर महाविद्यालयात आलेल्या असताना आमची भेट रुईया नाक्यावरच झाली. तिथे डीपी हॉटेलच्या बाहेर असलेल्या झाडाखाली बसून आम्ही २० मिनिटे पुन्हा गप्पा मारल्या होत्या. त्या गप्पांमध्ये त्यांचे रुईयातील दिवस, पुण्याच्या सुशीला बापट या त्यांच्या शिक्षिका अशा आठवणी निघाल्या. त्यावेळी स्मिता तळवलकर यांच्या चर्येवर आजारपणाने आलेला थकवा काहीसा जाणवत होता. ते बघून मन चिंताग्रस्त झाले होते. आणि अखेर त्यांच्या निधनाची वाईट बातमी आलीच....
() स्मिता तळवलकर दादरला मातोश्री हाईटस या इमारतीत राहात होत्या. दादर पश्चिमेला असलेल्या डी. एल, वैद्य मार्गावर ही इमारत आहे. याच परिसरात मी लहानाचा मोठा झाल्याने व आमच्या चाळीत सतीश पुळेकर हे दिग्गज अभिनेते राहात असल्याने त्यांच्याकडे येणारे कलाकार पाहाण्याची सवय तेव्हापासून होती. स्मिताताई आमच्या इमारतीत एक-दोनदा सतीश पुळेकरांकडे आल्याचे मला चांगले स्मरते. त्या दादरकर असल्यानेही त्यांच्याविषयी वेगळा जिव्हाळा होताच.
स्मिताताई या तुमच्या तीन ठळक आठवणी सतत ताज्या राहातील माझ्या मनात...
--
निखळ (निखिल) रत्नपारखी व त्याची नाट्य(भक्ती)
----------
बेगम मेमरी, आठवण गुलाम हे नाटक बघायचे, बघायचे आहे म्हणताना काहीना काही कारणामुळे राहूनच जातेय...हे नाटक त्यातील आशय, विषय आणि सादरीकरणासाठी बघायचे आहे. नाट्यसमीक्षक रवींद्र पाथरे, नाटककार जयंत पवार यांनी या नाटकाविषयीची लिहिलेली परीक्षणे वाचल्यानंतर नाटकाविषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे. हे नाटक बघायचे आहे प्रख्यात अभिनेता, दिग्दर्शक, लेखक निखिल रत्नपारखी, त्याची सहचारिणी भक्ती रत्नपारखी, माझी बेस्ट फ्रेंड व कुशाग्र कलाकार लतिका गोरे व अन्य कलावंतांच्या नाटकातील अदाकारीसाठी...हे नाटक बघूनच निखिल व भक्ती या नाट्यवेड्या दांपत्याबद्दल लिहावे असे वाटत होते. मात्र ते होऊ शकले नाही. पण त्यामुळे काही अडत नाही. निखिल असो वा भक्ती हे काही याच नाटकामुळे माहिती झाले असे नाही.
निखिल रत्नपारखी हा मुळ पुण्याचा. नाट्य, चित्रपट, मालिका, जाहिरातींतील नेमके मुल्यवान रत्न कोणते व नुसतेच खडे कोणते याची पारख निखिलला आता चांगलीच झाली आहे. पण त्याचा हा प्रवास तसा सोपा नव्हता. तो पुण्यातील समन्वय या नाटकगटामध्ये सक्रिय झाला. तिथे त्याने राजीव नाईक लिखित साठेचं काय करायच?, विजय तेंडुलकर लिखित मसाज या नाटकांमध्ये कामे केली. कोवळी उन्हे या नावाने विजय तेंडुलकरांचे सदर एका वर्तमानपत्रात प्रसिद्ध होत असे. त्याच्यावर आधारित नाट्याविष्कार समन्वय संस्थेने निर्मिला होता. त्याचा दिग्दर्शक होता संदेश कुलकर्णी. त्यात निखिल अफलातून परफाँर्मन्स द्यायचा. त्यातील अभिनेत्याचा कस लागायचा तेव्हा. पुण्यामधील नाट्यक्षेत्रामध्ये काही एक कामगिरी बजावल्यानंतर कोणत्याही कलाकाराला मुंबईचे वेध लागतात. तसे निखिलला लागले यात नवल नाही. एक व्यावसायिक अभिनेता म्हणून कारकिर्द करण्यासाठी तो या शहराच्या रोखाने निघाला. मुंबईत एका जाहिरीतीची संकल्पना विकसित करत असताना जाहिरातीच्या निर्मात्यांना त्यात काम करण्यासाठी हवा तसा कलाकार मिळत नव्हता. त्यावेळी त्यांच्या मनात निखिल भरला. त्याने या जाहिरातीत काम केले. तिथून सुरु झाला त्याचा मुंबईतील व्यावसायिक कलाकार म्हणून खर्या अर्थाने प्रवास. सर्वाधिक जाहिरातींत झळकलेला मराठी कलाकार म्हणून निखिलची नोंद घ्यावी लागेल. थोड्याथोडक्या नव्हे तर सुमारे १५० जाहिरातींमध्ये निखिलने काम केले आहे. तो दिसायलाही गोंडस आहे म्हणून बहुतेक सार्या जाहिरात निर्मात्यांचा तो लाडका असावा. तो जाहिरातींतील लाडके व्यक्तिमत्वच बनला. कालांतराने महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्वही त्याला चित्रपटाच्या मोठ्या पडद्यावर साकारायला मिळाले. जाहिरातींसाठीच बनलाय निखिल अशी त्याची प्रसिद्धी होऊ लागली. त्याची दुसरी बाजू अशी की, जाहिरातींमध्ये खूप व्यस्त झाल्यामुळे त्याने व्यावसायिक नाटके तशी खूप कमी केली.
त्याने केलेले पहिले व्यावसायिक नाटक म्हणजे रत्नाकर मतकरी लिखित आम्हाला वेगळ व्हायचयं. या नाटकाचे निर्माते होते सुयोग संस्था. त्या नाटकानंतर तो बराच काळ व्यावसायिक नाटकांकडे वळला नाही. कारण साधे होते. तो जाहिरातींमध्ये व्यस्त होता अत्यंत.
निखिलला लेखणीचीही देणगी आहे. तो एक असा कलाकार आहे की ज्याला नाटक लिहिता येत, ते कस साकारायचे हे तो दिग्दर्शक म्हणून पाहू शकतो. आणि प्रत्यक्ष रंगमंचावर तो त्या नाटकातील भूमिकाही उत्तम वठवू शकतो. हे थ्री इन वन पॅकेज त्याने सर्वप्रथम वापरले ते टाँम अँड जेरी या नाटकात. त्याने हे नाटक लिहिले. दिग्दर्शित केले व त्यात भूमिका करुन प्रेक्षकांनाही रिझविले.असा बहुगुणी अवलिया बर्याच वर्षांनी रंगभूमीला लाभलाय. अगदी हेच त्याने पुन्हा सगळे केलेय बेगम मेमरी आठवण गुलाम या नाटकात. तो या नाटकात सर्व पात्रांबरोबर प्रेक्षकांसमोर येतो, दिग्दर्शक म्हणून स्वत:सह सर्व कलाकारांना रंगमंचावर वावरायला लावतो व लेखक म्हणून नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधतो. हे नाटक विनोदी असले तरी नाटकाचा बाज खूप वेगळा आहे असे माझ्या मित्रपरिवारातील ज्यांनी ज्यांनी बघितले त्यांनी आवर्जून सांगितले आहे. मी एक दुर्देवी जीव ज्याला हे नाटक बघण्याची संधीच अजून मिळत नाहीये.
निखिल रत्नपारखी याने काही चित्रपटांत कामे केली. त्यामध्ये ओ माय गाँड, मोड, घो मला असला हवा, तेरे बिन लादेन, नारबाची वाडी, गोळाबेरीज असे काही चित्रपट आहेत. ते बहुतेक चित्रपट मी बघितलेले आहेत.
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. . देशपांडे यांच्या जीवनावरच असलेल्या गोळाबेरीज या चित्रपटात पु. . देशपांडे यांची भूमिका निखिल रत्नपारखीनेच साकारली होती. पु. . देशपांडे यांच्या साहित्यापेक्षाही हा विनोदी चित्रपट झाला होता. या चित्रपटात नेमके कधी काय घडत राहाते याची गोळाबेरीज व्हायच्या ऐवजी गोळावजाबाकी होऊन या चित्रपटाचे क्षितिज आक्रसले आणि हा चित्रपट झारापकन (क्षमस्व झपकन) आपटला. पु. . देशपांडे यांचे साहित्य कधी असे पडले नव्हते इतका त्यांच्यावरचा चित्रपट अपयशाच्या खोल दरीत पडला. नायकाच्या भूमिकेत असलेल्या निखिल रत्नपारखीच्या या चित्रपटाविषयी नेमक्या भावना काय आहेत माहित नाही पण अशा चित्रपटांमध्ये पुन्हा त्याने काम करु नये ही विनंती. हा चित्रपट बघण्याच्या भीषण अनुभवाला सामोरे जाऊन जो सुखरुप पुन्हा चित्रपटगृहाबाहेर आला होता तो खरा भाग्यवान प्रेक्षक...मी प्लाझामधून सहीसलामत बाहेर पडलो होतो हा चित्रपट पाहून....म्हणून आज हे लिहू शकतोय...
निखिलच्या समग्र कलाकारकिर्दीचा आलेख इथे मांडणे शक्य नाही. पण तो एक मनस्वी कलाकार आहे व यशस्वी आहे. त्याच्या या यशामागे नाट्यभक्ती आहे. म्हणजे नाट्यही आहे आणि भक्ती (त्याची पत्नी) जिला आपण अभिनेत्री भक्ती रत्नपारखी म्हणून ओळखतो ती. भक्ती ही पुण्यातलीच. त्यामुळे पुणेकर मुलालाच तिची पहिली पसंती असणे स्वाभाविक होते. निखिलला वरल्यानंतर ती देखील आता मुंबईत त्याच्या समवेत येऊन आपली कलाकारकिर्द उजळ करीत आहे. मुळात भक्तीने पुण्यातील महाराष्ट्र कल्चरल सेटर या प्रायोगिक नाट्यसंस्थेतून तिने काही नाटकांत कामे केली. त्याआधी स्पर्धांमध्ये काही एकांकिकांत कामेही केली, आणखी एका नाट्यसंस्थेतून भक्तीने विजय तेंडुलकर मित्राची गोष्ट या कथेवर आधारित एकांकिकेत काम केले. होते. सवाईच्या स्पर्धेत चेतन दातारच्या नाटकातही तिने भूमिका केली. आसक्त ही संस्था आहे ना त्यांच्याबरोबर फक्त तू नावाचे नाटक एक नाटक तिने केलेल. मोहित टाकळकरने हे नाटक दिग्दर्शित केले होते. खुप वेगळा अनुभव होता हा तिच्यासाठी...भक्ती रत्नपारखीचे पहिले व्यावसायिक नाटक म्हणजे दुर्गाबाई जरा जपून. हे नाटक विजय केंकरेनी दिग्दर्शित केले होत टाँम अँड जेरी नाटकात तिने निखिलला असिस्ट केले होते. आता तिचे नवेकोरे नाटक बेगम मेमरी आठवण गुलाम हे रंगभूमी गाजवते आहे. त्या शिवाय भक्ती रत्नपारखीने कंपनी, ओ माय गाँड, देऊळ अशा काही चित्रपटांत भूमिका केल्या आहेत.माझी अभिनय कारकिर्द खूप मोठी नाही असे ती सांगत असली तरी तो तिचा विनम्रपणा आहे.
पुण्यातला कलावंत इतका नम्र असतो यावर विश्वासच बसत नाही. नाट्य, चित्रपट, मालिका क्षेत्रात अखिल स्तरावरचा कलाकार म्हणून निखिल रत्नपारखी भविष्यात आणखी पुढे यावा व त्याने जसे जाहिरात क्षेत्र व्यापले आहे (व्यापले आहे असे निखिलच्या शारीरव्यापकतेकडे बघून लिहिलेले नाही) तशी अभिनयकलेची बाकीची क्षेत्रेही आपल्या कसदार लेखन, दिग्दर्शन, अभिनयाने व्यापून टाकावीत हीच सदिच्छा. त्याची नाट्यभक्ती व सहचारिणी भक्ती या त्याच्यावर प्रसन्न आहेतच. अभिनयातील या दोन रत्नांवर पारखी नजर ठेवून लिहिल्याचा आव जरी मी आणलेला असला तरी तो काही खरा नाही....हे या दोन रत्नपारखींना बरोबर लक्षात येईल. भक्तिभावाने त्यांचा आता निरोप घेतो. नाहीतर ते माझी पारख एक रत्न (व्यंगात्मक अंगाने) अशी करतील,,,,,हाहाहा
--
सूर्व्या उगवलाय ....
----------------
किती पण कोंबडे झाका, सूर्व्या उगवलाय असे गावात कधी कधी ऐकायला मिळायचे. अर्थ नाही लागायचा तेव्हा. त्यासाठी शहराचाच दरवाजा खुला व्हावा लागला. दादर पश्चिमेला बबन चहावाला नावाचे एक मोठे प्रकरण २००७ सालापर्यंत असायचे. त्यांचे साम्राज्य रात्री नऊ ते सकाळी सात पर्यंत चालायचे. त्यांच्या साम्राज्यातले चहा प्यायला येणारे मानकरी म्हणजे नाना पाटेकर, सतीश पुळेकर आणि पत्रकारितेतले दिग्गज अंबरीष मिश्र आणि असे असंख्य मान्यवर. त्यात मी आपला कोपर्यात कुठेतरी अंग चोरुन. बबनरावांकडे चहा प्यायला संवेदना परिवार या नाटकग्रुपचे बरेचसे सदस्य यायचे. त्यांची ओळख १९९५ साली झाली. त्यात एक त्यावेळी हडकुळा असलेला, दाढीचे खुंट वाढलेला, पौराणिक नाटकात ठेवतात तसे कानावर येतील इतके डोईवरचे केस राखलेला पोरगाही होता. मराठी भाषा लालबाग, परळच्या बोलीशी जवळीक साधणारी, पण डोळे, शारीरभाव खूप काही सांगू पाहाणारे. सांगण्याचा आशय अर्थवाही होता की निरर्थक इतका काही मी त्याच्या जवळ गेलो नव्हतो. तो एकांकिका, लिहितो, दिग्दर्शित करतो, भूमिका करतो असे हळुहळु त्याच्याशी बोलायला लागल्यानंतर कळायला लागले. कधीमधी तो त्याच्या दोस्तांबरोबर रुईया काँलेजच्या नाक्यावर यायचा तेव्हा तिथेही आमच्या भेटीगाठी व्हायच्या. कारण आँफिसनंतर रात्रीपर्यंत मी नाक्यावर पडीक. आताही कधीकधी असतो...
आता एकदम ट्रान्सफर सीन.......
श्री पार्टनर हा चित्रपट...तो मी पाहिला...त्याच्या दिग्दर्शकाचे नाव पाहिले समीर रमेश सुर्वे...नाव वाचले आणि आठवू लागले हाच तो पोरगा...मी व तो बबन चहावाल्यांकडे कधीमधी भेटायचो. काहीबाही बोलायचो. मग तो संवेदना परिवारात मश्गुल, मी माझ्या नादात...होय हाच तो समीर रमेश सुर्वे. प्रख्यात साहित्यिक व. पु. काळे यांच्या प्रसिद्ध पार्टनर या कादंबरीवर श्री पार्टनर हा चित्रपट दिग्दर्शित करणारा. श्रीपार्टनर हा चित्रपट त्यातील अभिनय, कथेचा गर आणि सुज्ञ दिग्दर्शन यामुळे गाजला. आणि मग या मराठी चित्रपटसृष्टीने दखल घेतली...
सूर्व्या (म्हणजे समीर रमेश सुर्वे) उगवलाय....उपेक्षेने प्रशंसेचे कोंबडे कितीही झाकून ठेवायचे येथील अनेकांनी ठरविले तरी सूर्व्या उगवलाच...
समीर सुर्वेला बघून हा सरळमार्गी असेल असे वाटतच नाही. कायम वाकड्या मार्गाने जाणार...म्हणजे वाकड्यात नाही शिरणार. पण सरधोपट सरळ मार्ग त्याला आवडतच नाही. तो वाकड्या मार्गाने जाऊन सरळ यश खेचून आणतो पण त्यासाठी मोठी किंमतही मोजतो. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी आपल्या घरातील सोनेनाणे प्रसंगी गहाण ठेवून चित्रपट काढले इतकी त्यांना या गोष्टीची असोशी होती. फाळके यांची असोशी माहिती आहे सगळ्यांना पण सर्वस्व पणाला लावून जे चित्रपट उभे करतात त्या पूर्वजांचा समीर हा खरा वारसदार आहे. श्री पार्टनर हा चित्रपट बनविण्यासाठी सगळ्या प्रकारचे सहकार्य देऊ अशी आश्वासने देणार्यांपैकी बरेचजण मध्येच हात सोडून निघून गेले. पण समीर आपली वाट चालत राहिला. कर्जाचे मोठे डोंगर खांद्यावर पेलून त्याने श्री पार्टनर हा चित्रपट पूर्ण केला. व झळकवलाही. या चित्रपटाला जे यश मिळाले ते त्यातील कलाकार, तंत्रज्ञांचे होतेच पण यशाच्या या गौरीशंकराच्या शिखरावर बसण्याचा मान फक्त समीर सुर्वेलाच आहे.
आता तो चार्ली या ब्लँक हाँरर काँमे़डी मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणात गुंतलाय... .भरत जाधव. नेहा पेंडसे. विजय पाटकर असे अनेक दिग्गज कलाकार या चित्रपटात काम करीत आहेत....हा चित्रपट करताना येणार्या समस्यांनाही समीर हसत हसत सामोरा जातोय. हा चित्रपटही खूप वेगळा होणार आहे हे मी त्याचे चित्रीकरण, प्रोमो बघून आत्ताच सांगतो....
मराठी असो वा हिंदी चित्रपटसृष्टीचा एक उसुल आहे. अपय़शाला आईबाप नसतात, यशाला असतात...श्रीपार्टनर जोवर पूर्ण होत नव्हता तोवर समीर रमेश सुर्वे हा अश्वत्थाम्यासारखा भळभळती जखम घेऊन फिरायचा. पार्टनर पूर्ण झाला तेव्हा समीरचा आत्मा शांत झाला. चित्रपट बनविण्यासाठी काढलेल्या कर्जाचे डोंगर चढत असतानाही हा पुन्हा चार्ली चित्रपटात गुंतला. शेवटी चित्रपट करणे, बघणे, काढणे ही एक नशा आहे. त्या नशेच्या अमलात प्रेक्षक म्हणून मी राहाणार आहेच. त्याचबरोबर रसिकांवर समीर रमेश सुर्वे याचा सुरु असलेला दिग्दर्शकीय अमलही असा बराच काळ टिकू दे. समीर सुर्वे व मी काहीवेळा रुईया काँलेज नाका किंवा दादर स्टेशनला उभे राहूनही गप्पा मारल्या आहेत भररात्री. पण त्या अंधारातही माझ्या डोळ्यासमोर काजवे नव्हे तर हा सुर्व्याच चमकायचा....
मी काय लिहिणार आहे हे त्याला आधी सांगण्याचा प्रश्न नाही.. समीर रमेश सुर्वे हा मराठीतला प्रतिभावान लेखक, दिग्दर्शक आहे...त्याच्याकडे मराठी, हिंदी चित्रपटांतील मान्यवरांनी, वितरकांनी, फायनान्सरनी बारीक लक्ष द्यायला हवे. समीर सुर्वे प्रसिद्धीच्या मागे धावत नाही म्हणून चित्रपटसृष्टीतील इतर लोकांनी अशा गुणवानांच्या मागे स्वत:हून धावणे सोडून द्यायचे असा याचा अर्थ होत नाही.....या लोकांनी किमान एवढे तरी करावे, उगवलेल्या सूर्व्याकडे बघावे....
--
शेखर सरतांडेल की शेखरसर तांडेल?
----------
शेखर सरतांडेल किंवा शेखरसर तांडेल
तुम्ही शेखरच्या नावाचा असा दोन्ही प्रकारे उच्चार केलात तरी तो तुम्हाला सारखाच वाटेल.
कारण शेखर सरतांडेल म्हटले की नजरेसमोर येतो अव्वल चित्रपट दिग्दर्शक
शेखरसर तांडेल म्हटले की आठवतो रचना संसद या महाविद्यालयात फिल्म मेकिंगचा अभ्यासक्रम स्वत:च्या मेहनतीतून, निढळ्या घामातून उभा करुन विद्यार्थी घडविणारा शिक्षक.
तुम्हाला जसा तो दिसत असेल तसा तुम्ही त्याला त्या त्या प्रमाणे उच्चार करुन हाक मारु शकता.
महेश मांजरेकर यांच्या सोबत निदान, वास्तव अशा सुमारे आठ हिंदी व आई या मराठी चित्रपटांमध्ये चीफ असिस्टंट डायरेक्टर म्हणून कामगिरी बजावणारा शेखर हा हिंदी चित्रपटसृष्टीतील माहोलला एकदम सरावलेला.
इतक्या समृद्ध अनुभवानंतर शेखर स्वतंत्रपणे चित्रपट दिग्दर्शनात उतरला.
त्याने स्वत:;च्या बळावर दिग्दर्शित केलेला पहिला मराठी चित्रपट म्हणजे जोशी की कांबळे...चित्रपटाच्या शीर्षकातच सामाजिक धग आहे. अत्यंत ज्वालाग्रही विषय पण त्या चित्रपटाची कथा अतिशय नेमकेपणाने लिहिली होती प्रख्यात समीक्षक श्रीधर तिळवे यांनी. या कथेला चित्रपटाच्या रुपात आकार देताना अतिशय संयत हाताळणी शेखरने केली होती. जातीवर आधारित आरक्षण व्यवस्था हा म्हटले तर खूप चर्चेचा विषय. त्या विषयाच्या बाजूने आणि विरोधात बोलणारे यांची संख्या सम असेल. पण जातीव्यवस्थेतून निर्माण झालेल्या विषमतेवर जोशी की कांबळे चित्रपटात खूप मार्मिक भाष्य करण्यात आले होते. या चित्रपटाची कथा काय हे रहस्य येथे उलगडण्यापेक्षा तो मिळवून बघणे हे जास्त सकस अनुभव देणारे आहे. जोशी की कांबळे या चित्रपटाने अनेकांच्या डोक्याला चांगल्या अर्थाने झिणझिण्या आल्या. आणि शेखर सरतांडेल प्रगल्भ दिग्दर्शक म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत प्रस्थापित झाला.
शेखर सरतांडेल आणि माझी ओळख १९८९ साली झाली. ती ही रुईया नाक्यावर. त्यावेळी मी काँलेजमध्ये शिकत होतो. आणि शेखर हा प्युअर नाकाईट झालेला होता. तो मुळचा सिडनहँम काँलेजचा. तेथून बी. काँम. ची पदवी घेतल्यानंतर तो जे. जे. स्कूल आँफ आर्टस् मध्ये पार्टटाईम पेंटिंग व फोटोग्राफीच्या कोर्ससाठी दाखल झाला. तेथून त्याच्यातील विविध कलांना बहर आला. जे.जे. तसेच रुईयासाठी त्याने अनेक एकांकिका स्पर्धांना संगीत देण्याचे काम केले. त्यानंतर तो काही एकांकिकाच्या दिग्दर्शनातही गुरफटला. एखाद्या एकांकिकेत त्याने कामही केले. त्याची दोस्ती कँमेर्याशीही होतीच. नाटकाच्या माहोलमधून त्याने बाहेर पडून दुरदर्शनवर कँमेरामन म्हणूनही दीड एक वर्ष काम केले. त्यानंतर काही जाहिरात एजन्सीमध्येही कँमेरा हाताळला. मालिकांच्या काही कामातही तो गुंतला होता. तो सविस्तर तपशील इथे महत्वाचा नाही. महत्वाचे हे आहे की, शेखर स्वत:ला सतत तपासत होता. आपला अवकाश नेमका कुठे आहे याचा धांडोळा घेत होता.
त्यातूनच पुढे त्याला महेश मांजरेकर भेटले. व वास्तव, अस्तित्व, निदानसारख्या काही हिंदी चित्रपटांमध्ये महेश यांचा चीफ असिस्टंट डायरेक्टर बनून शेखर स्वत:लाच सापडत गेला.
ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांची देवकी ही कथा. या चित्रदर्शी कथेवर चित्रपट बनविण्यासाठी काही मान्यवरांनी कर्णिक यांच्याकडे कथा मागितली होती. पण काही कारणाने त्या कथेवर चित्रपट होण्याचे योग येत नव्हते. शेखर सरतांडेलला ही कथा भावली. त्याने या कथेचा स्क्रीनप्ले तयार करुन तो कर्णिक यांना दाखविला. तो पाहून कर्णिकांनी अत्यंत मोकळ्या मनाने या कथेवर चित्रपट बनविण्यास शेखरला परवानगी दिली. देवकी या कथेचे शीर्षक चित्रपट बनविताना झाले निर्माल्य. मामी इंटरनँशनल फेस्टिव्हलमध्ये निर्माल्य या चित्रपटाने जाणकारांचे लक्ष वेधून घेतले. या चित्रपटाने आणखी काही आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात माननीय उपस्थिती लावली. हा चित्रपट रसिकांनाही सुखावून गेला.
शेखर त्यानंतर वळला आँटिस्टिक मुले व त्यांना निगुतीने वाढविणार्या त्यांच्या पालकांच्या मनोविश्वाकडे. आँटिस्टिक मुलगा व त्याचे आईबाबा हे चित्र रंगविताना बाबा अशा मुलाची जबाबदारी कदाचित सहजी टाळू शकतो. पण आपला असा हा मुलगा वाढविण्याचे आव्हान आई पेलते व त्या मुलाला चांगले दिवस दाखविते हा गाभा असलेला माय डिअर यश शेखर सरतांडेलने दिग्दर्शित केला. तो चित्रपट पाहून अनेकांना आँटिस्टिक या विकाराचे स्वरुप खर्या अर्थाने कळले. या चित्रपटात लोकेश गुप्ते, सुखदा यश यांच्या भूमिका टची होत्या. आँटिस्टिक असलेल्या लहान मुलाचे काम अथर्व बेडेकरने केले होते. त्याच्यावर मानसोपचार करणार्याचे काम उमेश कामतने केले होते. या चित्रपटाने शेखरला अधिक प्रगल्भ दिग्दर्शकाच्या यादीत नेऊन बसविले.
शेखर सरतांडेलवर मराठी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक व अभिनेता म्हणून जो अमीट ठसा आहे तो राजा परांजपे यांचा. त्यांच्या जगाच्या पाठीवर, ऊन-पाऊससारख्या चित्रपटांवर बोलताना शेखर अजिबात थकत नाही. राजा परांजपे हे त्याचे आवडते दिग्दर्शक हा माझ्यासाठी सुखद धक्का होता. कारण राजाभाऊ यांचे माझ्या पत्नीच्या माहेरुन नाते आहे. त्यांच्या पुण्यातील घरी मी जेव्हा जेव्हा जातो तेव्हा स्वर्गीय राजाभाऊंना विविध चित्रपटांसाठी मिळालेले पुरस्कार, मानपत्रे तेथे एका शोकेसमध्ये ठेवली आहेत ते पाहून मन सुखावते. राजाभाऊ यांच्या पु्ण्यातील घरात ग.दि. माडगुळकर, सुधीर फडके यांच्या मैफली होऊन अनेक गाणी लिहिली गेली आहेत. त्यांना तिथेच चाली दिल्या गेल्या आहेत. त्या सगळ्या आठवणी समोर उभ्या राहातात. शेखर जेव्हा राजाभाऊंबद्दल बोलतो तेव्हा मलाही राजाभाऊंची पुण्यातील ही वास्तू आठवायला लागते. शेखर हा उत्तम लेखकही आहे. त्याने आपल्या आयुष्यात वर्तमानपत्रासाठी पहिल्यांदाच लेख लिहिला होता तो म्हणजे दै. दिव्य मराठीसाठी. मराठी चित्रपटांना सरकारने दिलेल्या अनुदानासंदर्भातील हा परखड लेख होता.
रामदास बोट बुडाल्याच्या दुर्घटनेला ६० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त काय लिहायचे असा प्रश्न मला पडला होता. त्यावेळी शेखरच मदतीला धावून आला. शेखर सरतांडेलचे काका हे दर्यावर्दी हे खास मच्छिमारांसाठी मासिक चालवायचे. त्या दर्यावर्दी मासिकाने रामदास बोट बुडाल्यानंतर काही अप्रतिम लेख छापले होते. त्या जिवंत लेखांचा आधार घेऊन मी माझा लेख दै. दिव्य मराठीत लिहिला होता. व तसे लेखाखाली नमुदही केले होते.
शेखर सरतांडेल हा बोलण्यात खूप मिश्किल आहे. कधी कोणाची टोपी उडवेल सांगता येत नाही. माझीही तो कळत-नकळत गंमत करत असतो. शेखर आहे स्वभावाने उमदा...त्यामुळे तो व त्याच्या चित्रपटांबद्दल खूप उत्सुकता असते लोकांमध्ये.
शेखरबद्दल अनेक उत्तम गोष्टी सांगता येतील पण कुठेतरी थांबायला हे हवेच. शेखर आता काही दिवसांत एका महत्वाच्या प्रकल्पात सक्रिय होणार आहे. तो नेमका काय आहे हे प्रसारमाध्यमांतून आपल्याला योग्य वेळी कळेलच. शेखर तू विद्यार्थीप्रिय शिक्षक आहेस. हे गुण तुझ्यात आलेत ते पेशाने शिक्षक असलेल्या आईवडिलांकडून. तुझे वडील नाटकात मुंबईत काम करायचे. तो कलेचा वारसा शेखर सरतांडेल याच्याकडे आलेला आहे. ती कला आता त्याच्या अंगवळणी पडली आहे.
त्यामुळे तुम्ही त्याला शेखर सरतांडेल म्हणा किंवा शेखरसर तांडेल, डोळ्यापुढे मूर्ती उभी राहाते ती एका कसलेल्या दिग्दर्शकाची...तीच ओळख तर त्याला प्रिय आहे आणि आम्हा त्याच्या फँन्सनाही... शेखरची गेली अनेक वर्षे ज्याच्याशी नाळ जुळली आहे तो रुईया काँलेजचा नाकाही या ओळखीला साक्षी आहे....त्या वास्तूलाच विचारा ती शेखरबद्दल अनेक किस्से सांगू लागेल...मा. भगवान यांच्या जीवनावर आधारित मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शनाच्या निमित्ताने शेखर सरतांडेलच्या कारकिर्दीत आणखी एक मानाचा तुरा खोवला जाईल. शेखर, तुझ्या भावी कारकिर्दीस माझ्या शुभेच्छा......
-----
चळवळ्या नार्वेकर
----
हवेत च कर आणि हवे तेच कर
अशा दोन जमाती असतात, काही तरी करु पाहाणार्यांच्या.
त्यापैकी पहिली जमात नुसती हवेतच इमले बांधत असते.
दुसरी जमात आपल्याला हवे तेच व तसेच करतानाही जमिनीशी नाते घट्ट ठेवून आपले मेणाचे किंवा शेणाचे जे काही असेल ते घर बांधते.
या हवे तेच कर जमातीमध्ये श्रीनिवास नार्वेकर मोडतो.
तो मुंबईतील गिरगावचा असला तरी वयपरत्वे सावंतवाडीमध्ये गेला...माणूस मोठा झाला की, कोकणात जातो. कोकणात तसा प्रत्येक माणूसच मोठा पण हा त्यांच्यातही मोठा...स्वकर्तृत्वाने..हे शेवटचे जास्त महत्वाचे आहे.
निखळ कलारसिक असलेल्या, सिनेमा, नाटक यांची उत्तम पारख व जाणकारी राखणार्या रमाकांत नार्वेकर यांचे हे सुपुत्र लहानपणी भयंकर भूमिकांमध्ये वावरायचे.
दरो़डेखोर, जुलुम अशा कुलदीप पवार नायक असलेल्या चित्रपटांमध्ये नायकाच्या बालपणीची भूमिका श्रीनिवासने केलेली. त्यामुळे त्या भूमिका मोठ्या होऊन किती भयंकर कामे करतात हे सांगायला नको...
पण हा लहानपणी भयंकर भूमिका करणारा मुलगा पुढे अभ्यंकर चुकलो अभयंकर झाला.
एका ध्येयाने पछाडलेला ( अखिल जगात कोकणातच सर्वात जास्त संख्येने विविध प्रकारची भूते-खेते आहेत. त्यातील कोणत्याने याला पछाडले माहित नाही.) श्रीनिवास मग सावंतवाडीच्या कर्मभूमीत विविध रंग उधळू लागला म्हणजे नाट्यरंगांबद्दल बोलतोय मी...
सावंतवावाडीला असताना त्याने तिथे अर्धवेळ वार्ताहर म्हणून पत्रकारिता केली. (आणि आता त्याच्यावर हे लिहिणारा तर अर्धवट पत्रकार आहे.)
त्यानंतर नाट्यविलास नावाची संस्था काढून एकांकिकांचा संसार मांडला. त्या एकांकिका तो वेळप्रसंगी लिहित होता. दिग्दर्शित करीत होता. किंवा इतरांनी लिहिलेल्या एकांकिकांना दिग्दर्शनाचा साज चढवत होता.
सावंतवाडीसारख्या मुंबईपासून लांब असलेल्या ठिकाणी राहून नाट्यविलास वगैरे करणे तसे सोप्पे नाही.
अस्सल कोकण्याचे स्वप्न असते मुंबईत येऊन काहीतरी करणे....
पण या श्रीनिवासला ही स्वप्ने पडली नाहीत इतका तो तिथल्या जांभा दगडाशी व लाल मातीशी एकरुप झाला होता.
नाट्यहौस पुरवता पुरवता त्याने बालरंग नावाची संस्था काढली. लहान मुलांसाठी बालनाट्ये, तसेच शिबिरे असे भले जंगी उपक्रम सुरु केले. त्यानंतर बालरंग नावाचे मासिक काढून दीड-दोन वर्षे चालविले.
त्यानंतर गुढकथा लिहिण्याचा त्याला नाद लागला. या दाढी राखणार्यांचे तसेही सगळे गुढ असते. मग तो श्रीनिवास असेल, समीर सुर्वे असेल नाहीतर नरेंद्र मोदी...ही माणसे मोठी आहेत हे आपल्याला कळत असते, पण तरीही ती आपल्यासारखीच वाटत राहातात.
श्रीनिवासला दाढी असली तरी तिच्यात तिनका वगैरे काही नाही. सगळे सरळसोट...कोकणी माणूस...काय होणार दुसरे? गुढकथा लिहिण्यात प्रगती इतकी की त्याचे पुस्तक आले. रत्नाकर मतकरी खुश या कथांमुळे श्रीनिवासवर....
त्यानंतर त्याची नऊ इ-बुक्स आली. बुकगंगा यांनी दोन प्रकाशित केली तर विक्रम भागवत यांच्या सृजन पोर्टलवर ७ इ-बुक्स प्रसिद्ध झाली आहेत आजवर त्याची....श्रीनिवासला कार्यकर्ता तसेच लेखक म्हणून अनेक पुरस्कार मिळाले आहेत. धडपड्या रंगकर्मीचा असा गौरव होणे उचितच असते. वर्तमानपत्र, मासिके, -मासिकांमधून जागतिक चित्रपट, राजकीय-सामाजिक विषयांवर श्रीनिवासने सटायरिकल स्तंभ लेखन केले आहे. त्याने लोकमत वृत्तपत्रात चालविलेल्या सदराचे सृजन'तर्फे इ-बुक प्रकाशित झाले.
कविता, साहित्य सर्वांपर्यंत पोहोचावे यासाठी अभिवाचनाचे कार्यक्रमही करतो तो...
असे बरेच काही त्याच्या पोतडीत आहे. अरे हो सांगायचे राहिले जादूगार बनून त्याने जादूचे खेळही रसिकांसमोर सादर केले होते....
त्याच्या पोतडीत काय काय आहे याचा सगळाच तपशील इथे सांगत बसत नाही...त्यातील आशय व विषय महत्वाचा...
हा दाढीवाला मला २००२ सालानंतर भेटायला लागला. दादर पूर्वेच्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात मी काहीबाही वाचायला जायचो. तर तिथे श्रीनिवास खूप सारे वाचत बसलेला असायचा.
रामायण मालिकेतील साधूची भूमिका करणारा कलाकार रोज ग्रंथसंग्रहालयात येऊन बसतो असे त्यावेळी मी कोणाला तरी सांगितले होते.
संघर्षाचे दिवस असूनही त्याबाबत कधीच कटुता दिसली नाही त्याच्या तोंडी...
कोकणी माणूस...सहनशील असणारच...
मुद्दा हा की, आपल्या अटीवर तो नाटके, एकांकिका, चित्रपट, मालिका करीत राहिला....तद्दन व्यावसायिक होणे, पाणी घालून कलाकृती पातळ करणे त्याला जमले नाही....म्हणून मोठे यश जे व्यावहारिक दुनियेला हवेहवेसे वाटते ते मिळण्यास वेळ लागतोय याची त्याला खंतही नाही.
मस्तमौला आहे तो....
त्याची अलीकडेच गाजलेली मालिका म्हणजे भेटी लागी जीवा
त्याच्याशी गप्पा मारताना तो अशा काही जीवघेण्या गप्पा मारतो की त्या भेटीत या गोष्टी मनाला लागतातच...
त्याला सिनेमा, नाटक, मालिंकामधील खोटेपणाची चीड आहे. तो कोकणी माणूस म्हणजे गुणसूत्रांमधूनच घेऊन आलेल्या वैशिष्ट्याप्रमाणे चळवळ्या असल्याने सतत नाटकाविषयी वेगळा विचार करत बसतो. सध्या आवाजाची संस्कृती सर्वांना नीट कळावी व त्यांनी ती अंगिकारावी म्हणून व्हाँइस कल्चरचे उत्तम प्रशिक्षणवर्गही घेतो...
मेडिकलपासून ते लिगल पर्यंत अनेक कंपन्यांच्या मजकूराचा अनुवाद करणे, अनेक जाहिरातींसाठी काँपीरायटिग करणे हे कुटिरोद्योग चालू असतात जगण्यासाठी ज्या दिडक्या लागतात त्यासाठी...महाराष्ट्रातील जे इंग्रजीतून मराठी किंवा मराठीतून इंग्रजी सहजसुंदर अनुवाद करणारे अव्वल दर्जाचे अनुवादक आहेत त्यात हे नार्वेकर महाशय आहेत. सध्या महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता वृत्तपत्रात अनेक बिल्डिंग प्राँजेक्टच्या जाहिराती येतात. त्यात त्या प्रकल्पांचा माहिती देणारा सुंदर मजकूर असतो. त्या मजकुराचे लेखन म्हणजे काँपीरायटिंग श्रीनिवासनेच केलेले असते.
बाकी उरलेला वेळ त्याचा कुटीलउद्योगात जातो. ते म्हणजे चित्रपट, नाटक. मालिका वगैरेंचे लेखन करण्यात...
त्याच्या आजवरच्या वाटचालीतील महत्वाचे मार्गदर्शक म्हणजे नाटककार प्र. . मयेकर...मुंबईच्या व्यावसायिक कलाक्षेत्रात नार्वेकरांचा श्रीनिवास नंतर कधीतरी प्रवेशता झालाच असता पण मयेकरांमुळे त्याचा हा प्रवेश लवकर झाला. मयेकरांबद्दल बोलताना तो हरखून जातो....ते त्याच्या डोळ्यातही दिसते.
एकांकिका, नाटक, चित्रपट, मालिका अशी विविध माध्यमे हाताळणारा श्रीनिवास नार्वेकर हा तत्ववादी आहे. त्यामुळेच त्याला परखडपणाचे वैभव लाभले आहे. त्या बळावरच ज्ञान मिळवून तो जागतिक चित्रपटांविषयी काँलम लिहू शकतो. असे दोन-तीन काँलम त्याने आधी वर्तमानपत्रात लिहिले आहेत.
अशा अनेक गोष्टी एकाचवेळी करुनही तो मनाने जितका नाटकाचा राहिला आहे. तेवढाच मालिका. चित्रपटांचाही राहिला आहे. चळवळ्या श्रीनिवास नार्वेकरला स्वस्थ बसवत नाही. अकाली पांढरी झालेली दाढी, डोक्यावरचे पांढरे केस यामुळे तो खूप स्काँलर वाटतो. मला बोलायला भ्या वाटते आणि त्याच्या विषयी अधिक लिहायला....
पण श्रीनिवास तू असाच चळवळ्या राहा...कारण असे लागते कुणीतरी धाक दाखविणारे...
तुझे उत्कर्षाचे दिवस आता सुरु झालेत (त्याच्या सहचारिणीचे नाव उत्कर्षा असे आहे). त्याची पत्नी डॉ. उत्कर्षा बिर्जेचे त्याच्याविषयीचे खास मत तिने ही पोस्ट वाचल्यानंतर दिले ते असे `ऑलटाईम परफ़ॉर्मर आहे तो ! कथा कविता गीत संगीत चित्र शिल्प ...काही असूदे त्याला रंगमंचीय अविष्कारच दिसत असतो !(तोही गिमिक्स विरहित !!)...पंतप्रधानांना पत्र ,Hana ची सूटकेस यांची रंगावृत्ती... कोकणी कवितांवर सादर केलेले रंगाविष्कार , voice culture .. यातली त्याची 'व्हिजन' मीही सहकर्मी म्हणून अनुभवलीय...अनुभवतेय म्हणून सांगावं वाटलं इतकंच !`. श्रीनिवासला या उत्कर्षांच्या दिवसात अधिक यश त्याच्या कामाच्या मेहनतीतून नक्कीच मिळणार यात शंकाच नाही.
श्रीनिवास तू आहेस तसाच मला आवडतोस. अशीच नाटके करत राहा...म्हणजे नाटकी वागणार्यांना त्यात कोणतीही भूमिका मिळणार नाही....चळवळ्या नार्वेकर असे तुला गावात म्हणत असतील...ते मीही तुला इथे म्हणून घेतो.
---
ऐका ना...
---
गोपीनाथ मुंडेजी धक्कातंत्र हा तुमची खास शैली होती. तुमच्या निधनाची बातमी हा बहुधा या धक्कातंत्राचा अखेरचा अविष्कार असावा. बातमी ऐकल्यानंतर काही क्षण सुन्न झालो. तुम्ही नुकतेच केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री झालात, त्याबद्दल अभिनंदनाचा दूरध्वनी केला असताना दिल्लीत यायचे निमंत्रण दिले होते. हा खात्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ग्रामीण विकासाच्या कोणत्या नवीन योजना राबविता येतील याविषयी तुमच्या मनात विचार घोळत होते. त्यातल्या काही गोष्टी तुम्ही दूरध्वनीवर सांगितल्यातही. महाराष्ट्राचे दिल्लीत प्रतिनिधीत्व कायम कमी असते. तुमच्या पक्षाचे सरकार केंद्रात आल्यानंतर मंत्री म्हणून तुम्ही दिल्लीत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व बुलंद किल्ल्यासारखे कराल यात कोणालाच शंका नव्हती. अगदी शरद पवारांनाही याबाबत विश्वास होता.
२०१४च्या ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुका होण्याच्या चार महिने आधी तुमचे अर्धे लक्ष राज्यात व अर्धे लक्ष केंद्रात विभागले गेले होते. राज्य विधानसभा निवडणुका तुमच्या नेतृत्त्वाखालीच भाजप लढणार होता. तुम्ही मुख्यमंत्रीपदाचे दावेदार अाहात अशी चर्चाही प्रसारमाध्यमांनी सुरु केली होती. हा सारा डाव सुरु होऊन रंगण्याआधीच तुम्हाला मृत्यूने गाठून हा सारा पटच उधळून लावला. मृत्यू हा किती क्रूर, निर्दयी असतो याचे भयाण दर्शन याहून अधिक ते कोणते असेल? गोपीनाथजी तुमच्या तमाम चाहत्यांना सोडून कायमचे निघून जाण्याचे वय तरी होते का तुमचे? अवघे नव्वदीचे वयोमान असे म्हणत सत्तेला चिटकून राहाण्याचा सोस असलेल्या लोकांच्या तुलनेत तुम्ही तरुणच होतात. दिल्लीत आपल्या कार्यशैलीने आगळे स्थान निर्माण करण्याची आलेली सुवर्णसंधी काळाने तुमच्यावर झडप घालून हिरावून घेतली. तुम्ही सत्तेत असा वा नसा तुमच्या उमद्या स्वभाव नेहमी तजेलदार होता. कार्यकर्ते, पत्रकार, राजकीय नेते, सामान्य माणसे यांच्याशी समभावाने वागणारा नेता म्हणून तुमची ओळख होती. गावपातळीच्या राजकारणात रुजून देशपातळीवर स्वकर्तृत्वाने फुलारलेला नेता, आंदोलनातील भाजपला महाराष्ट्रव्यापी करणारा नेता म्हणून तुमची ओळख ही भाजपच्या संस्कृतीसाठीही नवीन होती. केंद्रात भाजप सत्तेवर आल्यानंतर हे कर्तृत्व अधिक वृद्धिंगत झाले असते पण आता ते होणे नाही. फार वैयक्तिक आठवणी इथे लिहिवत नाही. ती मानसिक स्थितीही आता नाही.
एक आठवण फक्त सांगावीशी वाटते. तुम्ही कोणाशीही बोलताना ऐका ना...असे म्हणायची तुम्हाला सवय होती. तसेच बोलताना हातातील कोणतीही वस्तू टेबलावर आदळत बोलायची तुमची लकब होती. मग तो तुमचा चष्मा असो वा चष्म्याचे घर. एकदा विधिमंडळाच्या तुमच्या दालनात तुमच्यासमोर गप्पा मारायला बसलेलो असताना, डोळ्यात काहीतरी गेले म्हणून चष्मा काढून मी तो तुमच्या टेबलावर ठेवला व डोळे चोळून आत काही कचरा गेलाय का बघत होतो. ते झाल्यानंतर मी पुन्हा चष्मा उचलून तो घालायला गेलो तर तो ठेवल्या जागी सापडेना. तेव्हा तुमच्याकडे बघितले तर माझा चष्मा तुमच्या हातात. आणि ऐका ना म्हणत तो चष्मा हलकेच टेबलावर आदळला जात होता. मी हे लक्षात आणून देताच ते खळाळून हसले. चष्मा परत दिला व पुन्हा ऐका ना म्हणत बोलणे सुरु केले. आज सकाळी तुमच्या निधनाची बातमी ऐकताना तोच चष्मा मी खणातून काढून बघितला. आता नवीन फ्रेम असल्याने हा जुना चष्मा वापरत नाही. पण तो जुना चष्मा पाहाताना या गंमतीदार प्रसंगाची मला आठवण झाली. त्या जुन्या चष्म्यातून मला दिसलेले गोपीनाथराव तुम्ही, आजही तसेच होतात. चष्मा बदलला होता पण समोरचा माणूस तोच होता....पण आता निष्टेच मृतदेहाच्या रुपात होता...डोळ्याच्या कडा पाणावल्या माझ्या....राजकारणी नेत्यापेक्षा माणूस अधिक मोलाचे होतात तुम्ही...फार लिहिवत नाही...
---
चिमुकल्या जोरीचे अवेळी जाणे...
---
मृत्यू हा किती वेदनादायी ठरु शकतो, याचे प्रत्यंतर पिनॅकल क्लबची बालगिर्यारोहक जोरी भालेराव हिच्या अवेळी जाण्याने मला आले. ती लहानगी मुलगी माझी अत्यंत आवडती गिर्यारोहक होती. जोरी ही आपल्यासारखीच मध्यमवर्गीय घरात उमलणारी मुलगी, पण भालेरावांच्या घराने वेगळाच वसा घेतलेला आहे. या कुटुंबाला अशी समाजकार्याची जोड आहे, तसेच गिर्यारोहण या साहसी क्षेत्राविषयी असीम अशी श्रद्धा आहे.
जोरीचे वडील विजय भालेराव हे गिर्यारोहण क्षेत्रातील एक उत्कृष्ट छायाचित्रकार सह्याद्री-हिमालयाच्या कडेकपार्यांत मनमुराद भटकून विजय भालेरावांनी आपला गिर्यारोहणाचा छंद जोपासला. हिमालयातले `जोरीहे शिखरही त्यांनी पादाक्रांत केलेले होते. आपल्या या विक्रमाची आठवण जपावी म्हणून आपल्या पहिल्या मुलीचे नाव त्यांनी `जोरीअसेच ठेवले.
गिर्यारोहणाचा असा वारसा घेऊन जोरी दिसामासी वाढू लागली. वयाच्या ६व्या वर्षीच पिनॅकल क्लबतर्फे किल्ले रायगडावरच्या टकमक टोकावरुन आयोजिण्यात येणार्या रॅपलिंगच्या कार्यक्रमात जोरी भालेराव सहभागी झाली होती. प्रथम रॅपलिंग करताना जोरी अजिबात घाबरलेली नव्हती. दरवर्षी जेव्हा टकमक रॅपलिंगचा कार्यक्रम होतो तेव्हा जोरीचे रॅपलिंग हा तेथे उपस्थित असलेल्या लोकांचा आकर्षणाचा विषय असे. टकमक रॅपलिंग करताना, कड्याची खोली पाहून लहानापासून मोठ्यापर्यंत कोणीही घाबरण्याची शक्यता असते. जोरी भालेराव अशा लोकांचे दिल मजबूत करण्यासाठी भक्कम आधार बनत असे. तिच्यासारखी लहान मुलगी हसत खेळत रॅपलिंग करताना बघून मनात धास्तावलेले मन हिंमत करुन टकमक टोकावरुन उतरत असत. जोरीचे व्यक्तिमत्व आश्वासक होते. तिच्या डोळ्यांत नेहमी आनंद फुललेला असायचा.
जोरीला लहानपणापासून पावसाचे तिला अतिशय वेड. निसर्गाच्या सान्निध्यात पावसाचे सपकारे अंगावर घेताना तिला फार आनंद व्हायचा. मुंबईजवळचे अनेक छोटे-मोठे ट्रेक्स तिने आपल्या वडिलांबरोबर केलेले होते. कर्जत-कसाराजवळील किल्ले, दर्याखोर्या येथील पदभ्रमण जोरीला नावीन्याचे राहिलेले नव्हते. तिची दृष्टी नव्या क्षितिजाचा वेध घेत होती. टकमक रॅपलिंग करताना तिचे गिर्यारोहणातील कौशल्य पिनॅकल क्लब या गिर्यारोहण संस्थेच्या राजन घाटगे व  महिबुब मुजावर या निष्णात गिर्यारोहकांनी नजरेने टिपले. जोरी ही बारीक चणीची होती. वजन कमी होते. तिच्या हालचाली चपळ होत्या. जोरीला गिर्यारोहणाचे अधिक शास्त्रशुद्ध शिक्षण द्यायचेच हे दोघांच्याही मनाने घेतले होते.
घाडगे व महिबूबच्या मार्गदर्शनाखाली जोरीने आर्टिफिशियल क्लायबिंगचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. दीड-दोन वर्षांपूर्वी राजस्थानातील बिकानेर येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील आर्टिफिशियल क्लायबिंग स्पर्धेत जोरी भालेराव हिने चौथा क्रमांक पटकाविला होता. जोरी वयाने लहान व ताकदीने कमी होती. या स्पर्धेत चाळीस फुटी वाँलवर १५-१६ फुट उंचीवर ओव्हरहँगला जोरी ताकद कमी पडल्यानेच अडकली. सुमारे वीस मिनिटे तिने चिवटपणे झुंज दिली. पण स्पर्धा संचालकांच्या आदेशामुळे जोरीला वाँल चढून जाण्याचा प्रयत्न शेवटी अर्धवट सोडून द्यावा लागला.
हा प्रसंग आहे तसा छोटा पण त्यात जोरीची जिद्द दिसते. गिर्यारोहण क्षेत्रामध्ये बच्छेंद्री पाल, शरावती प्रभू, संतोष यादव या महिला गिर्यारोहकांनी सुवर्ण कामगिरी करुन ठेवली आहे. जोरी ही देखील त्याच मार्गाने वाटचाल करीत होती. आर्टिफिशियल क्लायबिंगमध्ये जोरी आणखी काही वर्षांत स्वयंतेजाने तळपू लागली असती, ही भावना फक्त पिनॅकल क्लबचीच नव्हती तर जोरी भालेरावचे गिर्यारोहण ज्यांनी पाहिले आहे त्यांचे मन त्यांना हेच सांगत होते.
जोरी अभ्यासतही हुषार होती. शिवाय नृत्य, अभिनय या कलांमध्येही वाकबगार होती. एका चित्रमालिकेत तिने कामही केलेले होते. जोरी ही कॅम्प फायर स्पेशालिस्ट होती. विविध गाणी तसेच व्यक्तींच्या हुबेहुब नकला करुन ती कॅम्प फायरमध्ये जान आणायची. वडिलांनी दिलेले खाऊचे पैसे गरीब मुलांत वाटून टाकायची. आपल्याकडे जे जे म्हणून चांगले आहे ते सर्वांमध्ये वाटून टाकण्याचाच तिचा स्वभाव होता.
जोरी भालेराव या आनंदी फुलपाखराची अखेर मात्र अकस्मात झाली. मलेरिया फाँल्सिफेरम नावाचा ताप तिच्या शरीरात कलीप्रमाणे शिरला. सायन रुग्णालयात जोरीवर उपचार सुरु होते. कधी तिची प्रकृती गंभीर होत असे तर कधी आश्वासक वाटत असे. काळाशी चाललेली ही अविरत झुंज १४ जून २०००च्या रात्री दीड वाजता संपली. त्या क्रूर काळाने जोरीला तिच्या दद्दू-मम्मीपासून, सर्व मित्रांपासून लांब ओढून नेले. पिनॅकल क्लबने अलीकडेच जोरीला पूर्ण सदस्यत्व बहाल केले होते. इतकी ही चिमुरडी गिर्यारोहणात मॅच्युअर्ड होती.
भालेराव कुटुंब चेंबुरच्या ज्या शेल काँलनीत राहाते तेथे १५ जून २००० रोजी दुपारी जोरी भालेरावची भव्य अंतिम यात्रा निघाली. भालेरावांच्या गिर्यारोहक मित्रपरिवाराला हुंदके आवरता आले नाहीत. एव्हरेस्ट पादाक्रांत करणारे सुरेंद्र चव्हाण, नेचर लव्हर्स, भरारी व अनेक गिर्यारोहक संस्थांच्या प्रतिनिधींच्या डोळ्यांतून अश्रूच्या धारा वाहू लागल्या होत्या. एका निरागस बालिकेला वाहिलेली ही मुक श्रद्धांजली होती. जोरीचे वय वर्षे १३ हे काही अनंतकाळच्या प्रवासाला जाण्याचे वय नव्हते. १५ जून २०००च्या संध्याकाळी पिनॅकल क्लबच्या वतीने दादर येथील छबिलदास शाळेत जोरी भालेरावला श्रद्धांजली वाहण्यासाठी एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात अनुभवी गिर्यारोहक अतुल कुलकर्णी, युवा संस्थेची दिपाली शिंदे, नेचर लव्हर्सचे देवरुखकर, छत्रपती पुरस्कार विजेते प्रदीप केळकर, इतिहासाचे अभ्यासक आप्पा परब, पिनॅकल क्लबचे अध्यक्ष विनायक वेंगुर्लेकर यांनी जोरीच्या विविध आठवणी सांगितल्या. एका बालगिर्यारोहकाला श्रद्धांजली वाहण्यासाठी जमण्याचा प्रसंग सर्वांनीच हृद्यावर दगड ठेवून निभावून नेला.
जोरी भालेरावच्या स्मृती आता आपल्यासोबत आहेत, पण तिची स्मृती चिरंतन जपण्यासाठी पिनॅकल क्लबने उमेदीच्या गिर्यारोहकांना एखादी शिष्यवृत्ती किंवा पुरस्कार जाहीर करावा, अशी भावना व्यक्त होत आहे. चिमुकल्या पावलांतील गिर्यारोहणाचे तुफान आता थंडावले आहे अशी प्रतिक्रिया एका गिर्यारोहक मित्राने जोरीच्या अवेळी जाण्यावर व्यक्त केली. ही प्रतिक्रिया अक्षरश: खरी आहे. जोरी तू खरचं आमच्यासाठी स्फूर्तीचा झरा आहेस!
---
स्वत:चेच दोन लेख पाहिले २४ वर्षांनी...
------------------
१ जानेवारी २०१५. वर्षाचा पहिला दिवस. माझ्यासाठी हा दिवस उत्कृष्ट ठरला. २४ वर्षांपूर्वी मी दादर येथील स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकाने प्रसिद्ध केलेल्या संरक्षण दल विशेषांकात सातारा सैनिकी स्कूल व भोसला मिलिटरी स्कूलवर दोन लेख लिहिले होते. त्यावेळी मी शाळेत शिकत होतो. या विशेषांकाच्या तेव्हा माझ्याकडे असलेल्या दोन प्रती कोणीतरी वाचायला नेल्या, त्या शिरस्त्याप्रमाणे परत आणून दिल्याच नाहीत. त्यामुळे गेली २४ वर्षे हा विशेषांक कुठे मिळतोय का याचा खूप शोध घेत होतो. पण यश येत नव्हते. एक जानेवारी रोजी दादरला काही कामानिमित्त गेलो होतो. मनात आले स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या ग्रंथालयात जाऊन या विशेषांकाचा शोध घ्यावा. मग गेलो तडक तिथे. पण नेमके ग्रंथपाल रजेवर गेले होते. त्यामुळे दहा दिवसांनी या असे सांगण्यात आले. तरीही मी मनाचा हिय्या करुन स्मारकाच्या तिथे उपस्थित असलेल्या प्रमुख पदाधिकार्याला भेटलो. त्यांनी ग्रंथालयात तो विशेषांक शोधण्यासाठी माणूस पाठविला. पण हे पदाधिकारी म्हणाले की, तू चार दिवसांनी मला दूरध्वनी कर. मी काहीसा निराश अवस्थेत सावरकर स्मारकातून निघालो. शिवाजी पार्कमधून शिवसेना भवन पर्यंत चालत गेलो असेन नसेन त्या पदाधिकार्याचा दूरध्वनी आला की, तो विशेषांक मिळाला आहे. फक्त दोनच प्रती आहेत. मी अक्षरश: सुसाट धावत पुन्हा स्मारकात गेलो. तिथे तो संरक्षण दल विशेषांक अत्यंत अधीरतेने हातात घेऊन पाहिला. खूप समाधान वाटले आपलेच जुने लेख पाहाताना. त्या पदाधिकार्यांनी मला त्या विशेषांकाच्या दोन प्रतींपैकी एक प्रत भेट दिली. मी अत्यंत आनंदात सावरकर स्मारकातून निघालो. हे दोन्ही लेख मी आता माझ्या प्रस्तावित इ-बुकमध्ये समाविष्ट करणार आहे. त्यानंतर मला माझे काँलेजच्या वर्गातले पाच मित्र अवचितच शिवाजी पार्कमध्ये भेटले. खूप गप्पा झाल्या. अवचित आश्चर्याचे सुखद धक्के देणारा तो दिवस होता.
----
एक मुलाखत
--
एका मराठी चित्रपटाबद्दल एका वृत्तवाहिनीवर नायक व नायिकेची मुलाखत दाखविली जात होती. त्यांना प्रश्न विचारणार्या पत्रकाराचे मराठी व इंग्लीश जेमतेमच असल्याने त्याने अभूतपूर्व भाषेत ही मुलाखत पार पाडली. त्यालाही त्याच्याच भाषेत नायक-नायिकेने उत्तर देऊन समपातळी साधली.पत्रकार (किरट्या आवाजात) - तुमच्या लेटेस्ट सिनेमाबद्दल सांगा. त्यातील तुमची केमेस्ट्री, स्टोरी कन्सेप्ट, सेटवरील टीपीबद्दल आमच्या प्रेक्षकांनाही क्युरिआँसिटी आहेच...नायिका (डोळ्यावरचे केस बाजूला करत) - या मुव्हीमधली आमची केमेस्ट्री इज जस्ट अमेझिंग. माझा ड्रीम रोलच आहे या मुव्हीत. मी व माझा हिरो हे पिक्चरमध्ये फुल आँन टीपी करतोय. लोकांशी हे सगळे मी फेसबुकवरुन शेअर करतेय. थ्रीलिंग एक्स्पिरिअन्सेस आहेत काही..काही इमोशनल...बट इट जस्ट ए फन...लोक लाईक करतील या मुव्हीला....पत्रकार (नायकाकडे वळून) - तुझ्या रोलबद्दलची एक्स्पेक्टेशन, एक्साईटमेंट, एन्जाँयमेंट लोकांमध्ये वाढताना दिसतेय. तुझा सिक्स्थ पँक लुक...माचो मँन असणे....काय वंडरफुल आहे असे गर्ल फँन्सचेही ओपिनयन आहे. तुला काय वाटतेय....नायक - माझी को-आर्टिस्ट खूप को-औपरेटिव्ह आहे. तिच्या को-आँपरेशनमुळे मी या मुव्हीत खूप क्लास काहीतरी करु शकलोय. आमचा डायरेक्टरही तरुण आहे. त्यामुळे यंग जनरेशनच्या अँस्पिरेशनचे क्लास रिफ्लेक्शन मुव्हीत आलेय...सगळ्यांनी हा मुव्ही वाँच करा...आणि एन्जाँय करा....मुलाखत संपली...त्याबरोबर डोक्याचा शाँटही संपला...एकतर धड मराठीत बोला...किंवा मराठी येत नाही सांगून उत्तम इंग्लीशमध्ये बोला..एकतर पैसे मराठी चित्रपटांतून कामे करुन मिळवणार आणि ती भाषा धडपणे बोलता येत नाही. तीच नाही तर इंग्लीशही धडपणे बोलता येत नाही....काहीतरी वाटायला हवे मनाला....कारण तुम्ही कलाकार (परफाँर्मर) आहात. जे सादर करता ते उत्कृष्ट व निर्दोष करण्याचा प्रयत्न हवा.
--
भेट तुझी माझी स्मरते...
---------
कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या कवितांवरील एक कार्यक्रम मगाशी एका मित्राच्या घरी पार पडला. छानच वाटले. मंगेशअण्णांच्या कवितांनी गेली सात-आठ दशके मराठी मनाला रिझविले आहे. त्यावरुन एक आठवण झाली. बरोबर तीन वर्षांपूर्वी माझ्या एका फ्रेंडसह कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या शीव येथील घरी जाण्याचा योग आला होता. तिथे जाण्याआधी थोडा ताण आला होता. कारण कविराज एकदम शिस्तीचे. मराठी कवितांबद्दल चर्चा सुरु झाली तर आपल्याला काही नीट बोलता नाही आले तर कविवर्य मंगेश पाडगावकरांना ते कसे वाटले असे अनेक प्रश्न माझ्या मनात येत होते. प्रत्यक्ष जेव्हा मंगेश पाडगावकरांची भेट झाली तेव्हा त्यांच्या अत्यंत अनौपचारिक बोलण्याने आमच्यावरचा ताण दूर झाला. मग पार बालकवींपासून ते आजच्या नीरजा या कवयित्रीपर्यंत सर्वांच्या कविंतावर छान गप्पा झाल्या. मुंबई व महाराष्ट्रातील मराठी संस्कृतीतील गेल्या शंभर वर्षांतले बदल या विषयावर मग आमची चर्चा सुरु झाली. त्यात मी रुईया महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी असे कळल्यानंतर मंगेशअण्णांची कळी आणखी खुलली. कारण ते काही काळ या महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या आधी व नंतर त्यांचे मित्रवर्य वसंत बापट, सदानंद रेगे, डाँ, सरोजिनी वैद्य आदी प्रतिभावान साहित्यिक हे या महाविद्यालयात मराठी विभागात शिकवायला होते. या कवींच्या सान्निध्याने रुईया महाविद्यालयाचा मराठी विभाग साहित्यवैभव संपन्न झाला होता. त्यांच्या जोडीला काही काळ महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागात शिकविण्यासाठी साक्षात विंदा करंदीकरही होते. या तीनही कवींच्या जाहीर काव्यवाचनाच्या प्राथमिक मैफिली या रुईयाच्या सभागृहांमध्ये रंगलेल्या होत्या याची मलाही कल्पना नव्हती. मंगेश पाडगावकरांच्या ज्या कविता लता मंगेशकर, आशा भोसले व अन्य नामवंत गायकांनी गायल्या आहेत त्याच्याही अनेक आठवणी त्यांनी सांगितल्या. आम्ही बोलत असताना तिथे अचानक कविवर्य शंकर वैद्यही आले. आणि मग आमच्या मैफलीला उत्तररात्रीपर्यंत सर्व प्रकारचा रंग चढला. त्या दिवशी मंगेश पाडगावकरांबरोबर आयुष्यातले पहिले छायाचित्र काढले जे माझ्यासाठी अमुल्य आहे. ते सोबत दिले आहे. अर्ध्या तासाचीच आधी वेळ देणारे मंगेश पाडगावकर त्या दिवशी आमच्या वाट्याला किमान सात तास आले. सलाम मंगेशदा....
--
सिनिअर रुईयावाला...
---
विनय आपटेजी,
तुमचा पहिला स्मृतिदिन. खरच नाही वाटत की, तुम्ही आमच्यात नाही हे. खूप आठवण येतेय तुमची. १९८९ सालापासून तुमच्या संपर्कात आलो. तुम्ही मला खूप सिनिअर असलात वयाने, अनुभवाने तरीही एक साम्य असे होते की, आपण दोघेही रुईया महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी होतो. तुम्ही त्यावेळी रुईयामध्ये नाट्यवलय या काँलेजच्या नाट्यग्रुपच्या कार्यक्रमांसाठी यायचात आणि त्यावेळी तुमच्याशी थोड्या गप्पा करता यायच्या. तुमचा आवाज. अभिनय, दिग्दर्शन यांतला प्रत्येक क्षण पुढे साठवत राहिलो मी. एकदा कवीवर्य नामदेव ढसाळ यांच्याकडे अंधेरीला घरी गेलो असताना अचानक तुम्ही इमारतीच्या खाली भेटलात. त्याच इमारतीत राहात होतात तुम्ही. मग ढसाळांकडून तुमच्याकडे आलो गप्पा मारायला. त्यावेळी मराठी, हिंदी, गुजराती रंगभूमीबद्दल किती वेगवेगळी माहिती सांगून माझे ज्ञानविश्व मोठे केलेत तुम्ही. तुमची ज्योर्तिभास्कर जयंतराव साळगावकर, त्यांचे सुपुत्र व अर्थतज्ज्ञ जयराज साळगावकर यांच्याबरोबर जी गप्पाष्टके रंगायची त्याचाही थोडाफार साक्षीदार आहे मी. एकदा तुम्ही आणि डॉ. रवि बापट व स्मिता तळवलकर या तीनही रुईयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या गप्पांची रुईया कॉलेजच्या ट्रँगलमध्ये मस्त रंगलेली मैफलही मी एन्जॉय केली होती. सार्वजनिक चव्हाट्यावर भावना अशा जाहीरपणे मांडणे कधी जमले नसते मला पण तो बेधडकपणा तुम्ही शिकविलात. आज मिडियामध्ये जो काही नैतिकतेने उभा आहे त्यामागे तुमचेही काही चांगले मार्गदर्शन होते.. ते आजही मला पुरते आहे...तुमची सतत आठवण येतेच. ही शब्दरुपी श्रद्धांजली आम्हा सगळ्या रसिकांतर्फे तुम्हाला...
---
संकलकाचे आकलन
---
प्रिय जयंत ...
नटरंग, बीपी, एवढेसे आभाळ, रमा माधव, यलो. विटी दांडू, हँपी जर्नी असे एकाहून एक सरस मराठी चित्रपट...या चित्रपटांमध्ये एक समान धागा आहे तो म्हणजे या चित्रपटांचा एडिटर म्हणजे संकलक आहे माझा सन्मित्र जयंत जठार. त्याला मी गेल्या चोवीस वर्षांपासून ओळखतो. अगदी तो शालेय विद्यार्थी असल्यापासून. त्यानंतर तो पुणे विद्यापीठाच्या ललित कला विभागामध्ये अभिनयातील मास्टर्स डिग्रीचे शिक्षण घ्यायला गेला. तेथे तो सुवर्णपदक मिळविणारा गुणी विद्यार्थी ठरला. एक उत्तम अभिनेता असलेला जयंत हा उत्तम संकलक म्हणूनही मराठी चित्रपटसृष्टी गाजवत आहे. हिंदी तसेच पुढे इंग्रजी चित्रपटसृष्टीतील संधीही त्याची नक्कीच वाट पाहात आहेत यात शंका नाही. जयंत जठारचे घरगुती नाव म्हणजे शशू...त्याला त्याच नावाने हाक मारणे मला जास्त आवडते. पण आता तो पब्लिक फिगर झाल्याने मी संकोचून त्याला तसे संबोधत नाही. भाषा, साहित्य, कला यांची उत्तम जाण असलेला जयंत हा उत्तम दिग्दर्शकही आहे. त्याचे तेही गुण कालांतराने सर्वांसमोर येतीलच...जयंतला हा कलेचा वारसा त्याच्या आईकडून मिळाला. त्याची आई मराठी नाटकांमध्ये भूमिका करीत असे व ती अत्यंत उत्तम वाचक व साहित्यप्रेमी आहे. त्याचे वडील हे अत्यंत समाजसेवी वृत्तीचे आहेत. जठार घराणेच साहित्य व कलाप्रेमी आहे. जयंतचा मोठा भाऊ ज्ञानेश हा मला रुईया काँलेजमध्ये एक वर्षाने ज्युनिअर. ज्ञानेश आज ख्यातनाम पत्रकार म्हणून प्रसिद्धीस आला असून द वीक सारख्या अत्यंत महत्वाच्या इंग्रजी साप्ताहिकामध्ये अत्यंत जबाबदारीच्या पदावर कार्यरत आहे. यशाची इतकी मोठी शिखरे काबीज करुनही जयंत हा खूप नम्र असून आपुलकीने तो सर्वांशी संवाद साधतो हा त्याचा गुण मला सर्वात भावतो. ज्ञानेशच्या घरी मी जायचो तेव्हा जयंतची थोडी थोडी ओळख होत गेली आणि आता मराठी चित्रपटसृष्टीतला आघाडीचा एडिटर ही ठळक ओळख तर माझे मन सुखावून जाते. जयंतने खूप मराठी चित्रपटांचे संकलन केले आहे. सगळ्यांचीच नावे मला माहित नाहीत. पण तो त्याचे काम अत्यंत काटेकोर शिस्तीने व कलापूर्ण रितीने करतो असे जेव्हा या क्षेत्रातील दिग्गजांकडून ऐकतो त्यावेळी शशू शाब्बास इतकेच म्हणावेसे वाटते. आगामी काळात जयंत तू एकाहून एक सरस मराठी, हिंदी व वेळप्रसंगी इंग्लिश दर्जेदार चित्रपट दिग्दर्शित करावेस व त्यातून रसिकांना भरभरुन आनंद द्यावास एवढीच सदिच्छा....खूप यश लाभो तुला...आज अचानक तुझ्याविषयी तुला न सांगता इथे जाहीरपणे लिहावेसे वाटले त्यातील उत्स्फुर्तता समजून घेशीलच तू...
---
रुईया नाका : रसरशीत रसायन
---
मुंबईतील माटुंगा पूर्व येथील रुईया महाविद्यालयाच्या नाक्यावर तुम्ही संध्याकाळी गेलात तर तिथे डीपी हाँटेलच्या समोरील झाडाच्या कट्ट्यावर समीर सप्तिसकरसारखे युवा संगीतकार (त्यांनी दुनियादारी या चित्रपटामधील जिंदगी ए जिंदगी या गाण्याला संगीत दिले आहे.) हाती गिटार घेऊन विरंगुळ्याच्या क्षणी वेगवेगळ्या धुन वाजवत बसलेले असतात. तिथेच ते आपल्या अागामी गाण्यांच्या चालीही अधूनमधून बनवत असतात अगदी सहजपणे..माधव आजगावकर, नंदू घाणेकर हे नामवंत संगीतकारही रुईयाचेच माजी विद्यार्थी. डीपीसमोरील झाडाच्या शेजारील एका झाडाखालील कट्ट्यावर रुईयाचे माजी विद्यार्थी असलेल्या व आता नामवंत दैनिकांमध्ये पत्रकार म्हणून कार्यरत असलेल्यांचा अड्डा जमलेला असतो. रुईया समोरील ट्रँगल, समोरील दडकर मैदानाचा लांबरुंद कट्टा इथे रुईयाचे माजी विद्यार्थी असलेले मराठी कलावंत, अभिनेत्री, दिग्दर्शक कधी कधी संध्याकाळी गप्पा मारत उभे किंवा बसलेले दिसतील. त्यात मग निशिकांत कामत, अमोल शेटगे, गजेंद्र अहिरे, संजय नार्वेकर, अभिजीत पानसे, प्रिया बापट, अदिती सारंगधर, कधीतरी महेश मांजरेकर, शेखर सरतांडेल अशी बरीचशी मंडळी दिसतील. पत्रकार चंद्रशेखर कुलकर्णी यांचे मोठे बंधू व ख्यातनाम पुरातत्वशास्त्रज्ञ भालचंद्र कुलकर्णी यांनी मुंबईतील अर्थात एकेकाळच्या फिरंगाणातील किल्ले हे ५४० पानांचे पुस्तक लिहिले आहे ते प्रसिद्ध केले आहे महाराष्ट्र शासनाने. त्या पुस्तकाच्या आराखड्याच्या प्राथमिक चर्चेपासून ते पुस्तकलेखनाचे काम पूर्ण होईपर्यंत अनेक गोष्टी डीपी, कॅफे गुलशन हा जवळचा इराणी, किंवा रुईया कट्टा इथेच झालेल्या आहेत. त्याचा मी जवळचा साक्षीदार अशासाठी की, त्या पुस्तकाचे प्रुफ रिडिंग व संपादनातील सहाय्य माझ्या नजरेखालून गेलेले अाहे. अशा अनेक कलात्मक गोष्टी दर पिढीमध्ये महाविद्यालयाच्या वास्तूच्या साक्षीने तयार झाल्या आहेत. रुईयाची वास्तू ही अनेक विद्यार्थ्यांसाठी त्यांचे आई-वडिल, दोस्त, कुटुंबीय अशा स्नेहशील अनेक भूमिका बजावते. त्याच परिसरात जयराज साळगावकर, डाँ. रवी बापट यांच्यासारखे नामवंतही इथे दिसले तर आश्चर्य वाटायचे कारण नाही. कारण या सगळ्यांमध्ये एकच समान धागा आहे तो म्हणजे रुईयामध्ये हे सारे शिकलेले आहेत...कधीतरी रुईया महाविद्यालयाच्या नाक्याला भेट द्या. एक जिवंत, रसरसते सांस्कृतिक केंद्र, टीपी करण्याचा मस्त स्पाँट तुम्हाला अनुभवता येईल....
---
मेट्रो रेल्वे मुंबईत सुरु झाली त्यामुळे काय काय होईल?
---
मुंबईत अखेर घाटकोपर ते अंधेरी या मार्गावर मेट्रो रेल्वे सुरु झाली. एक नवीन प्रवासी साधन मुंबईकराला मिळाले. आता या मेट्रोमुळे मुंबईतील चळवळ्या लोकांना एक नवीन गोष्ट हाती लागली आहे आपला आनंद, राग, लोभ, मत्सर व्यक्त करण्यासाठी....मेट्रो रेल्वे मुंबईत दाखल झाल्यानंतर भविष्यात काय काय घडू शकते याचा हा कल्पनामय प्रवास...
() मेट्रो रेल्वे सुरु झाल्यानंतर काही महिन्यांतच दादरच्या छबिलदास शाळेत किंवा वनमाळी हॉलमध्ये शंभर एक मराठी माणसे जमून मुंबई मेट्रो रेल्वे प्रवासी संघाची स्थापना करतील. त्याच्या पुढच्या महिन्यात या शंभरामधील चाळीस मराठी माणसे या संघटनेतून तत्वनिष्ठेशी तडजोड करणार नाही असे सांगत बाहेर पडतील अाणि महामुंबई मेट्रो रेल्वे प्रवासी संघाची स्थापना करतील
() आमच्यासाठी स्वतंत्र महिला स्पेशल मेट्रो सकाळी आठ वाजता व संध्याकाळी सहा वाजता सोडलीच पाहिजे अशी मागणी महिला प्रवासी करतील.
() मेट्रो रेल्वेमध्ये बसण्यासाठी आसने खूप कमी असतात. मात्र अपंग, वृद्ध, कॅन्सरग्रस्त, महिला यांच्यासाठी राखीव अासने ठेवा अशी मागणी झाल्यास ती पूर्ण कशी करायची ही चिंता मेट्रो चालक कंपनीला सतावेल
() मेट्रोमध्ये भीक मागणारी मुले, गाणी गाऊन, एकतारी वाजवून पैसे मागणारे वादक यांना आपल्या पारंपारिक वेषात शिरता येणार नाही. मग ते बर्यापैकी कपडे घालून एअरकंडिशण्ड मेट्रो रेल्वे डब्यांमध्ये चढतील. आपल्या बॅगेमधून कटोरा, एकतारी वगैरे साहित्य काढून आपल्या पारंपारिक धंद्याला सुरुवात करतील.
() हिजड्यांसाठी तर मोठी समस्याच आहे. मेट्रोमध्ये स्त्री-पुरुष असे वेगळे डबेच नसल्याने त्यांना सर्रास कुठेही संचार करायला मिळेल. पण त्यांना आपले अस्तित्व काही लपविता येणार नसल्याने त्यांना आधी मेट्रोमध्ये चढून देतील का हा प्रश्न सतावतो आहे.
() मेट्रो रेल्वेमध्ये लगेजचा डबा नाही त्यामुळे वर्सोव्याच्या मासळी घेऊन जाणार्यांची पंचाईत होईल. मासे नेताना टोपलीतले खारट पाणी सांडून सांडून लोकलचे पत्रे सडविणार्यांना मेट्रोमध्ये प्रवेश माशांविनाच करावा लागेल. त्यामुळे मेट्रोची प्रवासींसंख्या घटेल असा अंदाज आहे.
() मेट्रो रेल्वेमध्ये सध्या वर्सोवा ते घाटकोपर या मार्गावरच वाहतूक सुरु राहाणार आहे. गुजराती बंधू जसे चर्नीरोडपासून उलटे बसून चर्चगेट ते बोरिवली-विरारपर्यंत लोकलने राजेशाही प्रवास करतात तसे ते इथेही वर्सोवा वा घाटकोपरच्या आधीच्या स्टेशनला उलटे बसून आपल्याला जिथे जायचे तिथपर्यंत प्रवास करण्याचा बेत एव्हाना आखत असतील. व मराठी माणूस नेहमीप्रमाणे उभ्या उभ्याच प्रवास करत जात राहिल.
() मेट्रो रेल्वेमध्ये गर्दी इतकी होईल की, तिचे आपोअाप उघडमीट करणारे दरवाजे काढून लोकल ट्रेनसारखे सताड उघड दरवाजे बसवावे लागतील. या ट्रेनच्या फुटबोर्डावर उभे राहून लटकता येत नाही, स्टेशनवरच्या फुलपाखरांना बघून शिट्या मारत हवेवर डोईवरचे केस सावरायची सवलत मिळत नाही तो काय प्रवास झाला?
() मेट्रो रेल्वेच्या खिडक्यांना संपूर्ण काच आहे. तिथे खिडक्यांना जाळ्या नाहीत. त्यामुळे जलारामबापा, आणि कोणकोणते संत-महंत यांचे फोटो तात्पुरते लटकाविण्याची सोय नाही. या संतांची भजने म्हणताना जोरजोरात गाडीचा पत्रा बडवायची सोय नाही. ही असली काय ट्रेन असते का, त्यामुळे डोकेबाज भक्त काहीतरी युक्ती काढून कुठेतरी बाप्पांचे फोटो लटकावतील आणि झांजा वगैरे घेऊन मेट्रोमध्ये जोरजोरात भजने सुरु करतील. त्यांच्या शेजारी पत्तेवाले बँग मध्ये धरुन आपला गेम साजरा करतील.
(१०) पान, गुटका खाणार्यांसाठी मेट्रोमध्ये पिकदाणी ठेवा अशी सूचनाही पुढे येईल...
(११) बंगाली बाबा, कमी व्याजावर कर्ज मिळेल, भूतखेत प्रेत पिच्छा सोडविणार अशा जाहिरातींसाठी मेट्रो रेल्वेमध्ये नक्कीच चांगली जागा मिळेल. कारण प्रत्येक डब्यात जाहिरातींचे फलक लावण्याची चांगली सोय आहे. तरीही गनिमी काव्याने या जाहिरातींची पोस्टर कोणी ना कोणी मेट्रोमध्ये चिटकवूनच जाईल व मेट्रोवाल्यांना काम वाढवून ठेवेल.
(१२) मेट्रो रेल रोको आंदोलन उद्या राजकीय पक्षांना करायचे झाले तर मेट्रो किंवा मोनो रेल्वेच्या रुळावर त्यांच्या कार्यकर्त्यांना झोपता येणार नाही. कारण एकतर हेे मार्ग उंचावर आहेत. मोनो रेल्वेच्या रुळांत तर मोठी पोकळी असते. तर मेट्रो रेल्वेच्या रुळांमध्येही फारशी जागा नसते. लई पंचाईत होणार आहे राजकीय कार्यकर्त्यांची.
असे बरेच काय एका मेट्रोरेल्वेच्या मुंबईतील अागमनाने घडू पाहातेय..
मोनो रेल सध्या हार्बरला एकांतवासात धावत असल्याने अजून तिला हा जाच सुरु झालेला नाही. पण ज्यांच्या ज्यांच्या नावापुढे रेल्वे हा शब्द लागलेला आहे त्यांना हा वनवास काही चुकलेला नाही.....
---
बाळासाहेब, तुमच्या ऋणातच राहू द्या.
----------------------------------
बाळासाहेब, आज तुमचा प्रथम स्मृतिदिन....तुमची आठवण या काळात अधिक तीव्रतेने येते आहे. किंबहुना ती वाढीला लागली आहे. दैनिक सामनामध्ये उपसंपादक म्हणून सुमारे सहा वर्षे काम करताना मला तुमचा विविध प्रसंगी जो थोडा सहवास लाभला त्यातून तुमच्या राजस स्वभावाचे अनेक पैलू दिसले. डाँ. रमेश प्रभू विरुद्ध प्रभाकर कुंटे यांच्या खटल्यात मी एक साक्षीदार होतो. रमेश प्रभू यांच्या विलेपार्ले येथील पोटनिवडणुकीत रमेश प्रभू यांच्या प्रचारासाठी तुम्ही केलेल्या भाषणाचे मी `नवाकाळ' या वृत्तपत्रासाठी वृत्तांकन केले तेंव्हा मी फक्त दहावी इयत्तेत शिकत होतो. त्या वृत्तांकनामुळे साक्षीदार म्हणून हजर राहाण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे समन्स त्यावेळी मला मिळताच काही सुचेना. कारण माझे वय लहान होते. पण तुमचे मित्र दिग्गज पत्रकार दि. वि. गोखले यांनी मला धीर दिला व त्यानंतर मी मुंबई उच्च न्यायालयात साक्ष दिली. हा छोटा मुलगा पत्रकार म्हणून साक्ष द्यायला आला हे पाहून न्यायमूर्तीही आश्चर्यचकित झाले होते. मी हिंदुत्त्व विचारसरणीविरोधातच त्यावेळी साक्ष दिली होती. माझे एमए पूर्ण झाल्यानंतर सामनात नोकरी करणार का असे जेव्हा मला विचारण्यात आले तेव्हा तुम्हाला भेटून मी `हा खटल्याचा वृत्तांत पुन्हा एकदा सांगितला होता. त्यावेळी अरे तू प्रभू खटल्यात न्यायालयात साक्ष दिली ती पत्रकार म्हणून. त्यात तुझे वैयक्तिक काही नव्हते. त्यावेळी झाले ते झाले आता सामनात नोकरी करायची आहे तुला. फक्त आता तुला आमच्या धोरणाप्रमाणे लिहावे लागेल. मागचे विसरुन जा.' अशा आश्वासक शब्दांत त्यांनी मला समजाविले होते. बाळासाहेब, हा मनाचा उमदेपणा फारच कमी राजकीय नेत्यांकडे आहे. आम्ही सामनामध्ये काम करत असताना एखादी बातमी अशीच लिहा किंवा लिहू नका असा तुम्ही कधी कोणाही करवी दबाव आणला नाहीत. एखाद्या कुटुंबप्रमुखांप्रमाणे आमची काळजी घेतलीत त्यावेळी. तुम्ही जे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष जे प्रेम दिलेत त्यांचा उतराई कसा होणार? बाळासाहेब, तुमच्या ऋणातच मला राहू द्या.
---
गॉड इज ग्रेट....सचिन अल्सो...
--------------
प्रख्यात अभिनेते सचिन पिळगांवकर यांचे `हा माझा मार्ग' हे आत्मचरित्र वाचल्यानंतर त्यांच्याशी प्रत्यक्ष दूरध्वनीवर चर्चा झाली. त्यावेळी मी माझ्या भावना त्यांना पुढील शब्दांत कळविल्या...`सचिन सर, थँक्स फॉर एव्हरीथिंग. माझ्याशी बोलल्याबद्दल. तुम्ही माझ्या वडिलांचे अतिशय आवडते कलाकार होतात. माझे वडिल मी नववी इयत्तेत शिकत असतानाच वारले. त्यांनी तुमचे आत्मचरित्र वाचणे शक्यच नाही. पण त्यांचा व माझा आवडता कलाकार म्हणून मी दोघांच्याही वतीने तुमचे आत्मचरित्र वाचले. त्यामुळे या माझ्या प्रयत्नांनी माझ्या वडिलांना थोडा आनंद मिळाला असावा असे समजतो.
या तुमच्या आत्मचरित्राबद्दल मी काही दिवसांपूर्वीच टाइम्स ऑफ इंडियाचे ख्यातनाम पत्रकार अंबरीश मिश्र यांना या पुस्तकाविषयी सांगितले होते. काल हे पुस्तक त्यांनाही मी वाचायला दिले आहे.
तुमच्या पुस्तकामध्ये दादर, माटुंगा परिसरात जे तुमचे बालपण गेले त्याचा जो तपशील आहे, त्यातील अनेक गोष्टींशी एक माजी दादरकर म्हणून माझाही संबंध आलेला आहे. तुम्ही नमुद केलेले दादर परिसरातील अनेक कलाकार लहानपणी माझ्याही बघण्यात आलेले होते. त्यामुळे माजी दादरकर या नात्यानेही या पुस्तकावर प्रेम जडले. आपल्यातील अभिनेता, दिग्दर्शकाच्या संपूर्ण मर्यादांचे भान ठेवून तुम्ही आपला प्रवास मांडलेला आहे. तो कुठेही अतिशयोक्त होत नाही हेच तर या लेखनाचे यश आहे.
तुमचे आत्मचरित्र अतिशय नितळ, पारदर्शी आहे. `सांगत्ये ऐका' या हंसा वाडकर लिखित आत्मचरित्रानंतर इतके पारदर्शी आत्मचरित्र चित्रपट कलावंताचे क्वचितच आले असेल. म्हणून तुमच्या आत्मचरित्रात सचिन बरोबरच सच्चेपणाचा आत्माही आहे. म्हणून या पुस्तकाला स्वत:चे सुंदर चरित्रही आहे. तुमची उर्दू भाषेची जाण, सिनेमावरील प्रभुत्व, कुटुंबाप्रती असलेला अपार स्नेह हे गुण सर्वांनाच भावणारे आहेत. फोनवर फार बोलून तुमचा वेळ घेऊ इच्छित नाही. पण इतकेच सांगतो की, तुमच्या पुस्तकामुळे चांगले वाचण्याचा आनंद मिळाला. यासाठी पुनश्च धन्यवाद.'
या माझ्या प्रतिक्रियेवर सचिन म्हणाले की, एसएमएस किंवा व्हॉट अॅप्सवर प्रतिक्रिया कळविण्यापेक्षा प्रत्यक्ष फोनवर तू मला प्रतिक्रिया कळवलीस. त्याबद्दल तुझे आभार...वाचकांच्या अशा लाइव्ह प्रतिक्रियाच लिहिणाऱ्याला अधिक उर्जा देतात. थँक्स.'
मी हे खासगी संभाषण इथे जाहीरपणे याचसाठी दिले की, ही वाचक म्हणून माझी प्रतिक्रिया होती. `हा माझा मार्ग' या पुस्तकाची ही काही मी करत असलेली जाहिरात नाही. पण जे मनापासून आवडले ते मनात आलेल्या विचारांसह थेट सांगावे या भूमिकेतून लिहिले. ज्यांना शक्य होईल त्यांनी अभिनेता सचिन यांचे हे आत्मचरित्र मिळवून वाचावेच...मनाला आनंद देणारा तो वाचनप्रवास असेल.
प्रत्यक्ष दूरध्वनीवरुन झालेल्या बोलण्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा माझा मार्ग या आत्मचरित्राची दादर सार्वजनिक वाचनालयातून मी आणलेली प्रत मी प्रख्यात पत्रकार अंबरीष मिश्र यांना वाचायला दिली. पुस्तक त्यांना दिल्याच्या दुसऱ्या दिवशी मी जेव्हा त्यांना भेटलो तेव्हा हे पुस्तक वाचायला सुरुवात केली का असे मिश्र यांना मी विचारले. त्यावेळी आम्हा दोघांत जे संभाषण झाले त्यातून सचिन यांच्या आठवणींचा वेगळाच खजिना माझ्या हाती लागला. मला तीव्रतेने असे वाटू लागले की या गोड आठवणी सचिन यांना कळविल्या पाहिजेत. म्हणून मी त्याच रात्री व्हॉट अॅप्सवर सचिन यांना मिश्र यांच्याबरोबरील भेटीचा प्रसंग जसाच्या तसा कळविला.
अभिनेते सचिन यांना मी पाठविलेला तो व्हॉट अॅप्स संदेश असा होता ` मी दादर सार्वजनिक वाचनालयातून आणलेली तुमच्या आत्मचरित्राची प्रत पत्रकार अंबरिश मिश्र यांना काल वाचायला दिली होती. काल ते भेटल्यावर मी सहजच विचारले की, कसे वाटतेय तुम्हाला हे पुस्तक? त्यावर अंबरिश मिश्र म्हणाले की, मी एकटा कुठे वाचतोय? माझ्याकडे सचिन यांचे आत्मचरित्र आहे हे पाहून माझ्या आईनेही ते पुस्तक वाचायला घेतले. जवळजवळ असे समजा की, आम्ही दोघे मिळून हे पुस्तक वाचतोय. मिश्र यांचे हे उद्गार ऐकून मी अवाक!
`अंबरिश मिश्र यांच्या आईचे माहेरचे नाव सुशीला लोटलीकर. तर सासरचे नाव वंदना मिश्र. वंदनाताईंचे आता वय आहे ८९ वर्षे. प्रख्यात नाटककार मो. . रांगणेकर यांची नाटके तसेच पारशी, गुजराती, मारवाडी रंगभूमीवरील त्या प्रख्यात अभिनेत्री होत्या. त्यांचा नाट्यकारकिर्दीचा कालावधी होता १९४० ते १९६५ इतका. वंदनाताईंचे पती व अंबरिश मिश्र यांचे वडील हे देखील सिनेपटकथाकार, दिग्दर्शक होते. वंदनाताई मिश्र यांचे मी मिठाची बाहुली हे आत्मचरित्र राजहंस प्रकाशनने नुकतेच प्रसिद्ध केले असून त्या पुस्तकाचा इंग्रजी अनुवादही लवकरच प्रसिद्ध होणार आहे.
वंदनाताई मिश्र व तुमच्या आईची कदाचित जुनी ओळख असावी असे वाटते. मी हे सारे अशासाठी लिहिले की, वंदनाताई सध्या त्यांच्या अत्यंत आवडत्या कलाकाराचे आत्मचरित्र वाचण्यात रंगून गेल्या आहेत. काल अंबरिश यांच्या बोलण्यात एक गंमतीदार उल्लेख आला. ते म्हणाले की, एखाद्या प्रसंगात माझी व सचिन यापैकी कोणा एकाची बाजू घेण्याची वेळ आली तर त्यांची आई सचिन या आपल्या आवडत्या कलाकाराचीच बाजू घेईल!!
आपण एखादे पुस्तक किंवा कोणतीही कलाकृती बनवितो, त्याकडे प्रेक्षक, वाचक आपापल्या दृष्टिकोनातून पाहात असतो. त्यामध्ये आपल्या अनुभवांची भर घालून त्या कलाकृतीचा अर्थ लावत असतो. गेल्या चार दिवसांतील पहिले दोन दिवस मी तुमचे पुस्तक अधाशासारखे वाचून काढले. त्यानंतरचे दोन दिवस अंबरिश मिश्र व त्यांची आई यांना हे पुस्तक वाचत असताना त्यांच्या मनात नेमक्या काय प्रतिक्रिया काय उमटल्या हे जाणून घेण्यात गेले. त्यामुळेच वंदनाताईंचे या पुस्तकाविषयीची पहिली प्रतिक्रिया मी तुम्हाला वर कळवली ती म्हणजे त्यांच्या अतिशय आवडत्या कलाकाराचे हे पुस्तक अशी. यात मोठी गंमत अशी आहे की, मी हे सारे हितगुज तुमच्याशी करतोय याची अंबरिष मिश्र यांना साधी कल्पनाही नाही.'
अभिनेते सचिन यांना मी व्हॉट अॅप्सवर पाठविलेला हा संदेश म्हटले तर खूपच मोठा होता. तो वाचून बिचारे कंटाळलेही असतील! पण व्हर्च्युअल मिडियावर समोरच्याच्या चेहऱ्यावरील भाव दिसत नाहीत ना? त्यामुळे काही कळायला मार्ग नव्हता. हा संदेश पाठवून दोन तास होऊन गेले. त्यावर सचिन यांचा मला रिप्लाय आला की, गॉड इज ग्रेट..आणि त्यापुढे दोन स्माइली होते....
---


No comments:

Post a Comment