Thursday, June 19, 2014

यादवीचे चरक - दै. दिव्य मराठीच्या १५ जून २०१४च्या अंकातील रविवारच्या रसिक पुरवणीत प्रसिद्ध झालेला लेख.



आफ्रिकेतील कोंगो या देशात सुरु असलेल्या यादवी संघर्षाचे विश्लेषण करणारा माझा लेख दै. दिव्य मराठीच्या १५ जून २०१४च्या अंकातील रविवारच्या रसिक पुरवणीत प्रसिद्ध झाला आहे. त्या लेखाच्या पेज व टेक्स्ट लिंक्स व जेपीजी फोटो.
http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-samir-paranjpe-about-africa-congo-4647455-PHO.html
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/magazine/rasik/244/15062014/0/4/
-----
यादवीचे चरक
-------
- समीर परांजपे
----
गेली अनेक दशके यादवी युद्धाच्या चरकात पिळून निघालेला आफ्रिका खंडातील कोंगो हा देश. दुसर्‍या महायुद्धानंतर ते आजवरच्या काळात यादवी युद्धामुळे सगळ्यात जास्त मानवी संहार जिथे झाला तोच हा देश. आजपावेतो तेथील 54 लाख लोक या संघर्षात ठार झाले आहेत.
रवांडामध्ये झालेल्या यादवी युद्धानंतर भयभीत झालेल्या हजारो नागरिकांनी स्थलांतर करून शेजारच्या कोंगोमध्ये आश्रय घेतला. रवांडातील हुतू व तुत्सी यांच्या संघर्षात 1994मध्ये सुमारे 80 हजार तुत्सींची कत्तल झाली. रवांडातील हुतू राज्यकर्त्यांचे पाठबळ लाभलेली एक सशस्त्र संघटना, रवांडा लष्कर यांचा यामागे हात होता. 1994मधील जून-जुलै महिन्यात रवांडाची राजधानी किगालीवर तुत्सी जमातीच्या रवांडा पेट्रिऑटिक फ्रंट या संघटनेचा वरचश्मा निर्माण झाला. त्यांनी हुतू यांच्यावर सूड उगवायला सुरुवात केली. त्यामुळे हजारो हुतू रवांडातून परागंदा होऊन कोंगोच्या आश्रयाला गेले. हुतू जमातीचे निर्वासित मग कोंगोच्या भूमीतून रवांडातील तुत्सींच्या विरोधात कारवाया करू लागले. कोंगोमध्ये ज्या भागात हे हुतू निर्वासित स्थायिक झाले, तो भाग आधीपासूनच हिंसाचारग्रस्त होता. त्यामुळे कोंगोमध्ये तुत्सी, हुतू यांच्यात यादवी सुरू झाली. याची परिणती म्हणजे कोंगोतील सुमारे 38 हजार तुत्सी रवांडामध्ये आश्रयाला गेले. कोंगो, रवांडामधील वांशिक संघर्षाचे चटके अंगोला, नामिबिया, झिम्बाब्वे यांनाही बसले आहेत.
वांशिक हिंसाचार, लोकांचे विस्थापित होणे, साथींनी घातलेले थैमान या संकटाच्या घेर्‍यात अडकलेल्या कोंगोमध्ये सगळ्यात जास्त धूळधाण उडाली आहे ती तेथील महिलांची. तिथे आजवर हजारो महिलांवर बलात्कार करण्यात आले, प्रसंगी ठारही मारण्यात आले. यादवी युद्धाला या देशात जी लैंगिक अत्याचारांची काळी किनार आहे, ती कोणाचेही मन सुन्न करणारी आहे. कोंगोमध्ये मौल्यवान खनिज संपत्तीचे प्रमाण लक्षणीय आहे. विविध खनिजांच्या खाणी आपल्या कब्जात कशा राहतील, यासाठी कोंगोचे लष्कर, तेथील सत्ताधारी, तसेच परस्परविरोधी गट यांच्यात साठमारी चालते, एकमेकांवर सूड उगवण्यासाठी विरोधी गटातल्या बायकांना पळवले जाते. कोंगोमध्ये दर तासाला किमान 48 महिलांवर बलात्कार होतात. लैंगिक अत्याचारांना आजवर या देशातील चार लाख महिला बळी पडल्या आहेत. ही आकडेवारी व स्थिती कोणाही सुबुद्ध माणसाला हादरवून सोडेल. लैंगिक अत्याचार करताना ती महिला लहान मुलगी आहे की वृद्धा, हे काहीही पाहिले जात नाही. अशा भयंकर दुर्दशेतून जावे लागलेल्या महिलांपैकी अनेक जणी मनोविकारग्रस्त झाल्या आहेत.
ज्या महिलांवर बलात्कार होतो, त्यांना आयुष्यात पुन्हा उभे राहण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांकडून सहकार्य मिळणे दूरच; पण अवहेलनेचे क्षणच अधिक वाट्याला येतात. आपल्या कुटुंबातील महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याने आपली प्रतिष्ठा बुडीत खाती गेली आहे, अशी कोंगोतील बहुतांश कुटुंबांची विचारसरणी असते. अशा पीडित महिलेला पुन्हा कुटुंबात सामावून घेतले गेले तरी तिला एक तर हलक्या दर्जाची वागणूक दिली जाते किंवा तिच्या नवर्‍याने केलेला पुनर्विवाह तिला नाइलाजाने सोसावा लागतो. बलात्कार झालेल्या अविवाहित मुलींची अवस्था तर त्याहूनही वाईट असते. जगात मातृदिन उत्साहाने साजरा होतो. पण असे अनेक दिवस येतात, जातात; कोंगोमधील मातांच्या ललाटी असलेला दुर्दशेचा शाप काही पुसला जात नाही.
बाईला बाईपण निभवणेही या देशात कठीण होऊन बसले आहे. महिलांच्या प्रगतीची ऐशीतैशी झालेलीच आहे. त्याशिवाय कोंगोतील पुरुषप्रधान संस्कृतीने माता बनू इच्छिणार्‍या महिलांच्या मार्गातही अनेक काटे पसरलेले आहेत. कोंगोतील फक्त सहा टक्के महिलाच संततिनियमनाची आधुनिक साधने वापरतात. महिलांना कुटुंब नियोजनासंदर्भातील उपचार करून घेण्यासाठी आपल्या नवर्‍याची परवानगी घ्यावी लागते. महिलांच्या स्वत:च्या इच्छेला काडीचीही किंमत देण्यात येत नाही. या देशातील 64 टक्के महिलांना हिंसाचाराची या ना त्या कारणाने झळ लागलेली आहे. या महिलांच्या हक्करक्षणासाठी कार्यरत असणार्‍यांवरही हल्ले चढवण्यात येतात. कोंगोतील सरकार वांशिक हिंसाचार आटोक्यात आणण्यात जसे अयशस्वी ठरले आहे, तसेच आपल्या देशातील महिलांवर होणारे अनन्वित अत्याचार रोखण्यातही...जगात कुठेही संघर्षाची ठिणगी पडली की पहिला बळी जातो तो महिला व लहान मुलांचा... कोंगोसह आफ्रिकेतील काही देश तोच कित्ता दशकानुदशके गिरवताना दिसत आहेत.
(sameer.p@dainikbhaskargroup.com)

No comments:

Post a Comment